लिलाव

उभा दारी कर लावुनी कपाळा

दीन शेतकरी दावुनी उमाळा,

दूत दाराशी पुकारी लिलाव,

शब्द कसले ते-घणाचेच घाव !

पोसलेले प्राशून रक्त दाणे

उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे

निघत मागुनि वाजले आणि थाळि,

गाडग्यांची ये अखेरीस पाळी !

वस्तुवस्तूवर घालुनिया धाड

करित घटकेतच झोपडे उजाड

स्तब्ध बाजूला बसे घरधनीण

लाल डोळ्यातिल आटले उधाण

भुके अर्भक अन् कवळुनी उरास

पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास

ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी

थोर थैलीतिल वाजवीत नाणी

"आणि ही रे !" पुसतसे सावकार,

उडे हास्याचा चहुकडे विखार


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

बळी

दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे !

बापुडा अन् आज येथे पायवाटेला पडे !

शोधण्याला भाकरीचा घास आला योजने

आणि अन्ती मृत्युच्या घासात वेडा सापडे !

लाज झाकाया कटीला लावलेली लक्तरे

अन् धुळीने माखलेले तापलेले कातडे !

आर्त डोळ्यांतून सारी आटलेली आसवे

आत दावाग्नीच पेटे ओढ घेई आतडे !

झाकल्या डोळ्यास होती भास, दोही लेकरे

हात घालोनी गळ्याला ओढती खोप्याकडे

नादला झंकार कानीं कंकणांचा कोठुनी

काळजाला तो ध्वनी भिंगापरी पाडी तडे !

भोवतीचे उंच वाडे क्रूरतेने हासती

मत्त शेजारून कोठे आगगाडी ओरडे !

आणि चक्रे चालली ती-हो महाली गल्बला

चाललाही प्राण याचा, पापणी खाली पडे !

थांबल्या त्या हालचाली, थांबले काळीज हो

आणि माशांचा थवा मुद्रेवरोनी बागडे !

ना भुकेचा यापुढे आक्रोश पोटी चालणे

याचनेचे दीन डोळे बंद झाले यापुढे !

यापुढे ना स्वाभिमाना लागणे आता चुडा

अन्तराला आसुडाचे घाव माथी जोखडॆ !

मानवांच्या संस्कृतीची काय लागे ही ध्वजा

तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !

मूक झालेल्या मुखाने गर्जते का प्रेत हे

घालिती हे बंद डोळे का निखार्‍याचे सडे !

अन् अजुनी हासती उन्मत्त हो प्रासाद ते

वेग-वेड्या वाहनांचा घोष ये चोहीकडे

भेकडांनो, या इथे ही साधण्याला पर्वणी

पेटवा येथे मशाली अन् झडू द्या चौघडे !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

आस

करि मुक्त विहंगम हा रमणी !

रहावया मज प्रिये, मनोहर

कनकाचा घडविलास पंजर

छतास बिलगे मोत्यांचा सर

या सलत शृंखला तरि चरणीं !

करि मुक्त विहंगम हा रमणी !

तुझ्या कराचा विळखा पडता

तव वृक्षाच्या उबेत दडता

गमे जिण्याची क्षण सार्थकता

परि अंतरि करि आक्रोश कुणी

करि मुक्त विहंगम हा रमणी

नकोस पसरूं मोहक बाहू

मृदुल बंध हे कुठवर साहू

नभ-नाविक मी कुठवर राहू

या आकुंचित जगि गुदमरुनी

करि मुक्त विहंगम हा रमणी !

जावे गगनी आणिक गावे

मेघांच्या जलधीत नहावे

हिरव्या तरुराजीत रहावे

ही आस सदा अंतःकरणी

करि मुक्त विहंगम हा रमणी !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

मूर्तिभंजक

जगाचा गल्बला

जगात सोडुन

प्रेमाची मृणाल-

बंधने तोडून-

होता तो भ्रमिष्ट

भ्रमत एकला

नादात अगम्य

टाकीत पावला

वर्तले नवल

डोंगर-कपारी

गवसे प्रतिमा

संगमरवरी !

हर्षाचा उन्माद

आला त्या वेड्याला

घेऊन मूर्ति ती

बेहोष चालला,

आढळे पुढती

पहाड उभार

वेड्याच्या मनात

काही ये विचार

थांबवी आपुला

निरर्थ प्रवास

दिवसामागून

उलटे दिवस-

आणिक अखेरी

राबून अखण्ड

वेड्याने खोदले

मंदिर प्रचंड

चढवी कळस

घडवी आसन,

जाहली मंदिरी

मूर्त ती स्थापन !

नंतर सुरू हो

वेड्याचे पूजन

घुमते कड्यात

नर्तन गायन

रान अन् भोतीचे

स्फुंदते सकाळी

ठेवी हा वेलींना

ना फूल, ना कळी !

विचारी आश्चर्ये

तृणाला ओहळ

कोण हा हिरावी

रोजला ओंजळ ?

परन्तु मूर्त ती

बोलेना, हलेना,

वेड्याचे कौतुक

काहीही करीना !

सरले गायन

सरले नर्तन

चालले अखेरी

भीषण क्रंदन

पडून तिच्या त्या

सुन्दर पायाशी

ओरडे रडे तो

उपाशी तापाशी !

खुळाच ! कळे न

पाषाणापासून

अपेक्षा कशाची

उपेक्षेवाचून !

वैतागे, संतापे,

अखेरी क्रोधाने

मूर्तीच्या ठिकर्‍या

केल्या त्या भक्ताने !

रित्या त्या मंदिरी

आता तो दाराशी

बसतो शोधत

काहीसे आकाशी.

वाटेचे प्रवासी

मंदिरी येतात

आणिक शिल्पाची

थोरवी गातात.

पाहून परंतू

मोकळा गाभारा

पाषाणखंडांचा

आतला पसारा-

त्वेषाने बोलती

जाताना रसिक

असेल चांडाळ

हा मूर्तिभंजक !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

तरीही केधवा

दोघांत आजला
अफाट अन्तर
जुळून पाकळ्या
उडाल्या नंतर-
जीवनावाचून
जळला अंकुर
प्रश्नहि राहिला
राहिले उत्तर !

संग्रामी आजला
शोधतो जीवित
उरींचे ओघळ
दाबून उरात-
उठती भोवती
धुळीचे पर्वत
अखण्ड फिरते
वरून कर्वत !
वादळी रणांत
करणे कोठून
नाजूक भावांचे
लालनपालन-
तरीही केधवा
पडता पथारी
थडगी दुभंग
होतात अंतरी-
आठवे तुझ्या ते
प्रीतीचे मोहळ
आणि हो बिछाना
आगीचा ओहळ !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

जा जरा पूर्वेकडे

चीन-जपानी युद्धांत चाललेले राक्षसी अत्याचार या कवीतेत अभिप्रेत आहेत.

जा जरा पूर्वेकडे !

वाळवण्टी कोरता का एक श्वानाचे मढे ?

जा गिधाडांनो, पुढे

जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेताचा पदे,

जा जरा पूर्वेकडे !

आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा

भागवा तेथे तृषा,

ढीग साराया शवांचा तेथ लागे फावडे,

जा जरा पूर्वेकडे !

गात गीते जाउ द्या हो थोर तांडा आपुला,

देव आहे तोषाला

वर्षता त्याचा दयाब्धी राहता का कोरडे ?

जा जरा पूर्वेकडे !

तेथ देखा आग वेगाने विमाने वर्षती,

थोर शास्त्रांची गती

धूळ आणि अग्नि यांच्या दौलती चोहीकडे

जा जरा पुर्वेकडे !

खङ्ग लावूनी उराला बायकांना वेढती,

आणि दारी ओढती,

भोगती बाजार-हाटी मांस आणि कातडे

जा जरा पूर्वेकडे !

आर्त धावा आइचा ऐकून धावे अर्भक

ना जुमानी बंदुक

आणि लोंबे संगिनीला छान छोटे आतडे

जा जरा पूर्वेकडे !

हा दयेने ईश्वराच्या काळ आहे चालता,

व्यर्थ येथे राबता,

व्यर्थ तेथे शोणिताचे वाहुनी जाती सडे

जा जरा पूर्वेकडे !

आणि येताना पवाडे संस्कृतीचे गा जरा,

डोलु द्या सारी धरा,

मेघमालेतून आम्हा शांततेचे द्या धडे

जा जरा पूर्वेकडे !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

गोदाकाठचा संधिकाल

गर्द वनी वा गिरीकंदरी

लपलेला दिनि तम, गरुडापरि

पंख आपुले विशाल पसरुन ये विश्वावरती.

पश्चिम-वारा वाहे झुळझुळ

कंपित होउनि हेलावे जळ

दूर तरूंच्या काळ्या छाया हळुहळु थरथरती.

जीर्ण वडाच्या पारंब्यातुनि

पंखांची क्षण फडफड करुनी

शब्द न करता रातपाखरे नदीकडे उडती.

कपारीत अन् दूर कुठोनी

सांदीमध्ये लपुनी बसुनी

अखंड काढी रातकिडा स्वर ते कानी पडती.

वळणाच्या वाटेवर चाले,

आतुर अंतर कातर डोळे,

झपझप पाउल टाकित कोणी खेड्यातिल युवती.

निळसर काळे वरती अंबर,

धूसर धूराच्या रेषा वर

पलिकडच्या घन राईमधुनी चढुनी मावळती.

अभ्रखंड तो अचल पांढरा

पडे पारवा झडुनि पिसारा

तेजहीन अन् दोन चांदण्या डोकावुनि बघती.

परि शुक्राचा सतेज तारा

पसरित गगनी प्रकाश-धारा

वीरापरि आत्मार्पण करण्या आलेला पुढती.

आणिक इकडे क्षितिजावरती

विडंबण्या शुक्राची दीप्ती

शहरामधल्या क्षीण दिव्यांच्या मिणमिणती ज्योति.

वाडा पडका नदीतटावर

भग्न आपुल्या प्रतिबिंबावर

गंगेमधल्या, खिन्नपणाने लावितसे दृष्टी.

देउळ ते अन् भग्न, हटाने ध्येयनिष्ठ जणु जनाप्रमाणे

पडले तरिही जपुनी ठेवी ह्रदयातिल मूर्ति.

पाचोळ्यावर का ही सळसळ

कसली डोहावरती खळबळ

पाउल वाजे रजनीचे का येताना जगती ?


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा