जमेल तितका जुलूम

जमेल तितका जुलूम जो तो करून गेला!
मला खुबीने हरेकजण वापरून गेला!!

किती बघा काळजी तयाला असेल माझी.....
मला गलबतापरीच तो नांगरून गेला!

न थांगपत्ता, अजून त्याची न गंधवार्ता....
वसंत आला कधी? कधी तो सरून गेला?

तुझ्या दुराव्यामधे अशी जाहली अवस्था....
तुझ्या स्मृतींनीच प्राण हा मोहरून गेला!

हरेक वस्तू घरातली ओरडून सांगे....
कुणी तरी वादळापरी वावरून गेला!

कळे न केव्हा असा शिशिर जीवनात आला!
मलाच आतून पूर्ण तो पोखरून गेला!!

विनाशकारी थरार केदारनाथमधला;
दुरून पाहून जीव हा गुदमरून गेला!

पहाड तो उंच एवढा ढासळून गेला!
क्षणात पाऊस त्यास, बघ, कातरून गेला!!

अशा प्रकोपासमोर माणूस काय टिकतो?
कृमीकिड्यांसम हरेकजण चेंगरून गेला!

न राहिली एकही इमारत, सपाट सारे!
अता कुठे पूर तो जरा ओसरून गेला!!

क्षणात काही, प्रलय म्हणे तो निघून गेला....
सडा शवांचा चहूकडे अंथरून गेला!

स्वत: पुरानेच काळजी घेतली शवांची.....
शवांवरी सर्व रेत तो पांघरून गेला!

नशीब होते, तसेच ते धेर्यवान होते!
मुठीत धरूनीच जीव जो तो तरून गेला!!

दिला मला हात एकदा अन् निघून गेला....
तमाम आयुष्य मात्र तो सावरून गेला!

कुणी न डोकावले, तृषा पाहिली न माझी!
जथा  ढगांचा निमूट दारावरून गेला!!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो
जन्मभर मी तुला, 'ये' म्हणत राहिलो

सांत्वनाला तरी, हृदय होते कुठे?
रोज माझेच मी, मन चिणत राहिलो

ऐकणारे तिथे, दगड होते जरी
मीच वेड्यापरी, गुणगुणत राहिलो

शेवटी राहिले, घर सुनेच्या सुने
उंबऱ्यावरच मी, तणतणत राहिलो

ऐनवेळी उभे, गाव झाले मुके
मीच रस्त्यावरी, खणखणत राहिलो

विझत होते जरी, दीप भवतालचे,
आतल्या आत मी, मिणमिणत राहिलो

दूर गेल्या पुन्हा, जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा, रणरणत राहिलो

मज न ताराच तो, गवसला नेमका
अंबरापार मी, वणवणत राहिलो


कवी - सुरेश भट

जगत मी आलो असा

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

व्यर्थ

सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!

तू मला ,मी तुला पाहिले,
एकमेकांस न्याहाळिले;
-दुःख माझातुझा आरसा!

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा;
-खेळलो खेळ झाला जसा!

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
-मी तरीही जसाच्या तसा!

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी
-हिंडतो मीच वेडापिसा!

काय मागून काही मिळे?
का तुला बात माझे कळे?
-व्यर्थ हा अमृताचा वसा


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली!

मला आठवेना...तुला आठवेना...
कशी रात्र गेली कुणाला कळेना.
-तरीही नभाला पुरेशी न लाली!

गडे हे बहाणे,निमित्ते कशाला?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली!

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे,हालचाली!

तुला आण त्या वेचल्या तारकांची,
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची;
लपेटून घे तू मला भोवताली!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

वय निघून गेले

देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले

कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले

एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले


कवी - सुरेश भट
गझलसंग्रह - एल्गार

दर्जेदार

ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!

हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते..
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!

ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

गाढल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्याचा देव ताबेदार होता!

लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी,त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)

चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा.. तो चोर अब्रूदार होता!

पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकऱ्य़ाचा
लोकहो,माझा तरीही खून दर्जेदार होता!


कवी - सुरेश भट