तूंच भिला तर

कुजबुजतो तो आहे विकृत
मुकाच बसला आहे तो मृत

कर हिरिरीने अन त्वेषाने
आवेशाने उंच तुझा स्वर
गगन धरेला कंपवून तू
प्रतिरोधाचे आवाहन कर

चिडून आता तुझ्या सकलही
शक्तीने अन या दुष्टांवर
न घाबरता न चळताना
घाल तुझा हा घाव अनावर

भिऊ नको रे! तूच भिला तर
बुडेल लवकर जग हे सारे
हे होतीलच विजयी दुर्जन
अगणित सज्जन अगतिक सारे

तूच भिला तर या जगतावर
दिसेल सत्यच खोट्यावाणी
तूच भिला तर कपटी खोटे
ख-याप्रमाणे म्हणेल गाणी

तूच भिला तर बघ वाढेलच
मत्त खळांची रुधिरपिपासा
विश्वजयाची खळ अधमांची
न शमणारी दुष्ट दुराशा

सत्य पुकारत झगडत झगडत
हाका मारत जागोजागी
ही चिरनिद्रा जगदांतर्गत
नीतिमती कर सत्वर जागी

कुजबुजतो तो आहे विकृत
मुकाच बसला आहे तो मृत


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

देवधर्म

तुला न कळले, मला न कळले, तरी वाढली प्रीत अशी
चंद्रकोर शुद्धात जशी!

हळूहळू हळुवार सख्या, तू प्रेमबोल लागला म्हणू
सारंगीचे सूर जणू!

भिरभिर फिरते प्रीत आतली, प्राणसख्या अनिवार अशी
आभाळावर घार जशी!

मनांतले अन जनातले हे दुवे, सख्या, जुळतील कधी?
सांग मळे फुलतील कधी?

मलाही कळते सगळे पण हे मन होते भयभीत तरी
कशी त्यजू जनरीत तरी?

तशात आहे मी कुलवंता पापभीरु सुकुमार अशी
देवधर्म सोडूच कशी?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हसेल रे जग

लगबग लगबग
लगबग लगबग
चल लगबग, साजणा!

फारच आता उशीर झाला
लवकर ने परत घराला
करते तगमग
करते तगमग
चल लगबग, साजणा!

घाबरले मी: झाकड पडली
वीज तश्यातच वर कडकडली
झगमग झगमग
झगमग झगमग
चल लगबग, साजणा!

सूडच साधत वै-यावाणी
थयथय नाचत आले पाणी
मी भिजते, बघ
मी भिजते, बघ
चल लगबग, साजणा!

तूच चुकविली वाट खरोखर
उगाच आले तुझ्या बरोबर
हसेल रे जग
हसेल रे जग
चल लगबग, साजणा!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

नील जलांनो!

ओसाड दऱ्यांतून वहा, नील जलांनो !
रानातच हसून फुला, रानफुलांनो
प्राशून पुराणी मदिरा धुंद रुपेरी
अज्ञात विदेशात फिरा ,चंद्रकलांनो

सौंदर्य, उषे, झाक तुझ्या रम्य तनुचे !
हे रंग, ढगांनो, लपवा इंद्रधनुचे
हे सर्व तुम्ही दूर रहा, दूर रहा, जा !
पापीच निघाले सगळे पुत्र मनुचे

आचार विरोधी सगळे जाचक यांचे
हेतूच मुळाशी सगळे घातक यांचे
यांना नसते कोमलता वा ममताही
जाळील जगाला सगळ्या पातक यांचे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

किती उशीर हा !

किती उशीर हा, किती उशीर हा !

हा प्रणयकाळ ठेपलाच शेवटी;
पाचळा जळून ही विझून शेगटी -
राहिला इथे असा उदास गारवा
किती उशीर हा, किती उशीर हा !

आस सारखी धरून वाट पाहिली
आटली अखेर, हाय, उर्मी आतली !
आज धावलीस तू धरून धीर हा
किती उशीर हा, किती उशीर हा !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

आलीस कशाला?

आलीस कशाला, गऽ,
आलीस कशाला !

चाहूल मलाही,
कळली पण नाही :
बगिच्यातच माझ्या, गऽ, शिरलीस कशाला?

दावून शहाणे
लटकेच बहाणे
जवळून जराशी, गऽ, फिरलीस कशाला?

कलवून फुलारी
जमिनीवर सारी
सांडून फुले तू, गऽ, लवलीस कशाला?

म्हटलेस दिवाणे
मधुसूचक गाणे ;
लडिवाळपणाने, गऽ, हसलीस कशाला?

परतून अखेरी
गेलीस, किशोरी!
हृदयातच, पोरी गऽ, उरलीस कशाला?

आलीस कशाला, गऽ,
आलीस कशाला !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ना. घ. देशपांडे

नागोराव घनश्याम देशपांडे (ऑगस्ट २१, इ.स. १९०९ - इ.स. २०००) हे मराठी कवी होते.

काव्य संग्रह
१. शीळ (इ.स. १९५४)
२. गुंफण (इ.स. १९९६)
३. खूणगाठी (इ.स. १९८५)
४. कंचनीचा महाल (इ.स. १९९६)
५. अभिसार (इ.स. १९६३)