एक पुरुष हवा आहे

एक पुरुष हवा आहे.
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.
बटनं सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा करत घर डोक्यावर घेणारा,
आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून हुशारुन जाणारा,
केसातून बोटे फिरली की बाळ होऊन कुशीत घुसणारा,
दमदार पावलांनी तिन्हीसांजेचा केविलवाणा अंधार उधळून टाकणारा
पुरुष हवा आहे
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.

नाही..
हे मी म्हणत नाहीये,
या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून


कवियत्री - अनुराधा पोतदार

आई कामाहून येता

आई कामाहून येता
पोरं बिलगली तिला
फुलं शोभतात चार
जशी हिरव्या वेलीला

कुणी गळा कुणी मांडी
जागा पोरांनी घेतली
लळा पाहताना असा
पृथ्वी सारी सुखावली

नाही वाडग्यात आज
शिळ्या भाताचाही दाणा
तिला भुकेल्या बाळांचा
प्रश्न पडलेला पुन्हा

उगीउगी पेटवली
चूल तिने भकभक
पाणी भांड्यात ठेवून
केला खोटाच सैपाक

पाणी उकळे नुस्तेच
नाही अंशही भाजीचा
आई म्हणते पोरांना,
"वास येतो ना सोजीचा?"

गाढ झोपली पाखरे
सैपाकाच्या नादामंदी
बांध मोडून वाहते
तिच्या डोळ्यांमधली नदी


- अंजूम मोमीन

जाणीव

क्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला,
भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला

समुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,
भरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची

रात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,
काळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची

गरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,
श्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची

श्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,
चढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची

श्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,
मनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शून जाते

ठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,
कधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते

गोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने
भावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने

जाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले
आता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...

कवियत्री - वैशाली राजवाडे

पर्गती

धानू शिरपती,
कुठं कशाची झाली रं पर्गती?

गाडी बी तीच
गडी बी तेच
बैल बी तेच
कासरा त्योच सैल
मग बदललं ते काय?
बैलाचं पाय?

उजव्या अंगाचा भादा बैल,
डाव्या अंगाला आला
पर,
त्यानं बदल रं काय झाला?
आता बसणाराना वाटतंय
जत्रा माघारी निघाली

माझ म्हननं
ही मजलच अवघड हाय
हे वझं जीवापरीस जड हाय

गाडी बी नवी बांधाय हुवी
रस्ता बी नवा कराय होवा
ताजीतवानी खोंडं जुपली
'त' कुणाला ठावं
जाईल गाडी सरळ
पण हे कुणी करायचं?
कसं करायचं?

पयला गाडीवान म्हनायचा
जल्दी जल्दी
आताचा बी म्हनतोय
जल्दी जल्दी
वाट बदलत न्हाई
बैल हालत नाही
धानू शिरपती,
ही कसली गा क्रांती?

कवी - ग.दि.माडगूळकर (गदिमा)
कवितासंग्रह - पूरिया

मृत्युत कोणि हासे

मृत्युत कोणि हासे,मृत्युस कोणि हसतो
कोणि हसून मरतो, मरत्यास कोणि हसतो

अश्रुत कोणि बुडतो,लपवित कोणि अश्रु
सोयीनुसार अपुल्या,कोणि सुरात रडतो

जनता धरी न पोटी,साक्षात् जनार्दनाला
जनतेस कोणि पोटी,पचवून हार घेतो

विजनी कुणी सुखी न् भरल्या घरात कोणि
वनवास भोगनारा, दु:खात शांत गातो

कोणि जुनेपुराने विसरे पीळधागे
कोणि तुटून पडला सगळ्याच पार जातो

कोणास मेघपंक्ति दाटून गच्च येता
लागे तहान, कोणि नाचून तृप्त होतो

कोणि दिव्याशिवाय होतो स्वत:च दीप
कोणि दिव्यवारी अन् टाकुन झेप देतो


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

स्वगत

एका रिमझिम गावी
भरुन आहे हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरुन तिथे
जातां आलं पाहिजे

चालून ज़ाता येण्यासारखी
पायतळी आहे माती
पण
जाणें न जाणें तरी कुणाच्या हाती?


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 

तर काय करायचं?

परक्या देशात
दिवसाढवळ्या सुनसान रस्त्यावरुन चालताना....
आपल्या देशातले गजबजलेले रस्ते आठवले
                                                         तर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस  सोबत असताना
एकटं वाटलं  तर काय करायचं
परक्या देशात
आपलं माणूस सोबत असताना
एकटं ’नाही’ वाटलं  तर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस सोबत असताना
’त्याला’ एकटं वाटू लागलं  तर काय करायचं....
परक्या देशात आपलं माणूस
आधीच एकटं असेल तर काय करायचं
आणि परक्या देशात
आपलं माणूस कुणासोबत असेल
                                           तर काय करायचं?
परक्या देशात
लहानपणी गर्दीत हरवलं होतं म्हणून
आपलं माणूस ओळखीची गर्दी सोडून
अनोळखी गर्दीत आलंय उठून
’हे’ कळल्यावर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस
खूपच आपलं वाटू लागल्यावर
आपण आपलीच सोबत सोडून देऊन
हरवून गेलो
आणि सापडलो नाही आपल्यालाच
                                             तर काय करायचं.... 
परक्या देशात
प्रत्येक मिठीसरशी साठवून घेतला सुगंध आपल्या माणसाचा....
आणि आपल्या देशात
कधीतरी अचानक
सुटला घमघमाट त्या सुगंधाचा
तर काय़ करायचं....
आपल्या देशात
परक्या देशातल्या आपल्या माणसाची
आठवण आली अचानक
आणि हरवून गेला साठवलेला सुगंध
                                                तर काय करायचं....  
परक्या देशात
सोबत घालवलेली संध्याकाळ
आपल्या देशात
’संध्याकाळी’ आठवली तर काय करायचं?

खरंच!
परदेशातून
एकटं परतल्यावर
आपल्या देशात
काय करायचं?


कवी - सौमित्र