तळमळ

मी सुखात घालू हात कुणाच्या गळां ?
राहिलो इथे : पण नाही लागला कुणाचा लळा.

मज एकहि नाही कुणी सखासोबती :
ममतेविण हिंडत आहे हे जीवजात भोवती.

वंचनाच दिसते इथे सदा सारखी;
हे स्नेहशून्य जग: येथे कोठची जिवाची सखी ?

हे वरुन आहे असे, तसे अंतर:
हे उदास जीवा, नाही, बघ, इथे कुणी सुंदर !

विक्राळ घोर अंधार जरी कोंदला
पळ एकच झळकत आली : लोपली वरच चंचला.

पोसून ध्येयशून्यता उथळ अंतरी
शून्यातच वाहत जाते ही मानवता नाचरी.

माझा पण आता पुरा जीव भागला:
मज करमत नाही येथे , ने मला दूर, वादळा!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुम्ही

सुदूरच्या जमिनीचे तुम्ही आहात प्रवासी :
उदार राघव का हो तुम्ही अहां वनवासी ?
तुम्ही दुजी वदता ही अनोळखी परभाषा :
परंतु ती कळण्याला मला नकोत दुभाषी.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

मालन

-१-
इवला झाला गायन गात;
चांदण्यांसवे हासली रात;
हालेना जरा वेलींचे पान;
निजली धरा; निजले रान,
आई, बहिणी झोपल्या घरी;
ये गऽ ये गऽ ये मागल्या दारी!
माथ्यावरती आला चंदीर
सांग, मी कसा धरावा धीर ?
भागले डोळे वाट पाहून :
प्रीतीची माझी ये गऽ मालन !

-२-
पुष्पवारती दवाचे बिंदू;
अंतराळात सुंदर इंदू;
पानोपानी की नाजूक वारा;
झीमझीम की झडीच्या धारा;
तशीच येते मूक, मोहन
अंगणातल्या वेलीमधून
शारदाची की ढवळी रात;
हासली प्रीत आतल्या आत !
दाविते कोण हंसीची मान ?
हासून येते माझी मालन !

-३-
पाहून तुझे काजळी डोळे
माझे गंऽ मन भुलले भोळे !
कपाळावरी चांदणी कोर;
मुक्त सोडला केसांचा भार;
हासणे गोड लावण्यखाणी;
कंठामधून कोकळगाणी ;
फुलांचे हार शोभले गळा;
रानराणीचा शृंगार भोळा.
कोणाचे ध्यान, कोणाचे गान,
प्रीतीचे कोण, सांग, मालन ?

-४-
एकाएकी का थांबली अशी ?
संध्येची दूर चांदणी जशी !
मूर्तच जशी हाले चाले ना !
उभी का दूर अधोवदना ?
कंपन ओठी, लाज नयनी :
बावरू नको रानहरिणी !
काय मनात भीती सारखी ;
नको गंऽ परी – होऊ पारखी !
प्रीतीला नाही भीतीचे भान ;
प्रीतीची माझी देवी मालन.

-५-
एकमेकांच्या आलिंगनात ;
भावनामय चुंबनगीत ;
एकमेकांच्या नयनांवरी
प्रीत मोहक, मूक, नाचरी;
एकमेकांचा हृदयनाद
घालत आहे एकच साद.
इवला झरा गायन गात;
चांदण्यांसवे हासली रात;
हासले जरा वेलीचे पान;
हासली धरा; हासले रान !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तू नि मी

माझा प्रत्येक क्षण तुझ्याबरोबर असावा
तो उगवताच का ? मावळता सूर्य पण मी तुझ्या सवे पाहावा

तुझा हात माझ्या हातात गुंफलेला असावा
फुलांचाच का ? काट्यांचा स्पर्शपण मला कोमल वाटावा

तुझा आनंदी चेहरा डोळ्यात इतका साठवावा
माझा हस्यातूनच का ? माझा अश्रूतून पण दिसावा

तुझा सहवास नि सोबत मंतरलेली असावी
आपल्या आयुष्याच्या सुखातच का ? दुःखात हि ती पुरून उरावी

तुझ्या डोळ्यातलं स्वप्न मी माझ्या डोळ्यातून पहाव
तू एकट्यानेच का ? आपण दोघांनी मिळून ते पूर्ण कराव

तुझा प्रत्येक शब्द न शब्द प्रेमाचा मोती असावा
तो साठवता साठवता कुबेराच खजिना माझ्या खजिन्या पुढे कमी पडावा

प्रेमाचा शब्द तू एक नि मी दोन असा हेवादावा नसावा
अबोल शब्दांनी पण एकमेकांच्या काळजाचा ठाव घ्यावा

तुझीसोबत सातच का अनंत जन्मांची असावी
प्रत्येक जन्मी तू कृष्ण अन मी राधा असावी


कवियत्री - शीतल

एक पुरुष हवा आहे

एक पुरुष हवा आहे.
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.
बटनं सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा करत घर डोक्यावर घेणारा,
आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून हुशारुन जाणारा,
केसातून बोटे फिरली की बाळ होऊन कुशीत घुसणारा,
दमदार पावलांनी तिन्हीसांजेचा केविलवाणा अंधार उधळून टाकणारा
पुरुष हवा आहे
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.

नाही..
हे मी म्हणत नाहीये,
या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून


कवियत्री - अनुराधा पोतदार

आई कामाहून येता

आई कामाहून येता
पोरं बिलगली तिला
फुलं शोभतात चार
जशी हिरव्या वेलीला

कुणी गळा कुणी मांडी
जागा पोरांनी घेतली
लळा पाहताना असा
पृथ्वी सारी सुखावली

नाही वाडग्यात आज
शिळ्या भाताचाही दाणा
तिला भुकेल्या बाळांचा
प्रश्न पडलेला पुन्हा

उगीउगी पेटवली
चूल तिने भकभक
पाणी भांड्यात ठेवून
केला खोटाच सैपाक

पाणी उकळे नुस्तेच
नाही अंशही भाजीचा
आई म्हणते पोरांना,
"वास येतो ना सोजीचा?"

गाढ झोपली पाखरे
सैपाकाच्या नादामंदी
बांध मोडून वाहते
तिच्या डोळ्यांमधली नदी


- अंजूम मोमीन

जाणीव

क्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला,
भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला

समुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,
भरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची

रात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,
काळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची

गरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,
श्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची

श्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,
चढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची

श्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,
मनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शून जाते

ठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,
कधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते

गोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने
भावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने

जाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले
आता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...

कवियत्री - वैशाली राजवाडे