कामगार आहे मी, तळपती तलवार आहे.....

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,

थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखीलेले आहे
माझ्या जगाची एक गन्धवेनाही त्यात आहे
केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे
जसा जगात आहे मी तसाच शब्दातही आहे,

रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे
याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे,

एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरवात आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे,


कवी - नारायण सुर्वे

नळाला मासे !

एक वेडा नळाचे पाणी ओंजळीने घेउन बादलीत टाकत असतो. तर एक डॉक्टर त्याला विचारतो काय रे काय करतोस ?
वेडा : दिसत नाही का मी मासे पकडतोय.
काही वेळाने तो डॉक्टर त्याला पुन्हा विचारतो : काय रे किती मासे पकडलेत ?
वेडा : काय वेडा डॉक्टर आहे राव नळाला कधी मासे येतात कां ?

कंचनीचा महाल

१. कंचनीचा महाल
२. गिरिजेचा संसार
३. निःश्वास गीतावली
४. जुईची कळी 

शीळ

रानारानांत गेली बाई शीळ,
रानारानांत गेली बाई शीळ!

राया, तुला रे, काळयेळ नाही,
राया, तुला रे, ताळमेळ नाही,
थोर राया, तुझं रे कुळशीळ,

येडयावानी फिरे रानोवना,
जसा काही ग मोहन कान्हा,
हांसे जसा ग, राम घननीळ,

वाहे झरा ग झुळझुळवाणी,
तिथं वारयाची गोड गोड गाणी,
तिथं राया तुं उभा असशील,

तिथं रायाचे पिकले मळे,
वर आकाश शोभे निळे,
शरदाच्या ढगाची त्याला झील,

गेले धावून सोडुन सुगी,
दुर राहून राहिली उगी,
शोभे रायाच्या गालावर तीळ,

रानीं राया जसा फुलावाणी,
रानीं फुलेन मी फुलराणी,
बाई, सुवास रानीं भरतील,

फिरु गळ्यात घालून गळा,
मग घुमव मोहन शीळा,
रानीं कोकिळ सुर धरतील,
“रानारानांत गेली बाई शीळ!”



कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कंचनी

झाले आज मी बावरी, बाई, भागले लोचन !
कोठे हालली वल्लरी, कोठे नाचले नंदन ?

होती एक आशा मला : सारे धुंडले मी वन;
गेले प्राजक्ताच्या तळी : तेथे दिसे ना तो पण.

सारी हालली ही फुले; सारे नाचले हे बन;
बाई, लाजली ही कळी : तिचे घेऊ का चुंबन ?

हाका घालते का कुणी ? माझे धुंदले हे मन :
वेड्या लाघवाने क्शी करु फुलांची गुंफण ?

खाली सारखे आणतो वारा परागांचे कण;
त्यांनी माखले हे असे माझे हि-यांचे कंकण.

झाले एक मी साजणी : कुठे माझा गऽ साजण ?
झाले एक मी कंचनी : करु कोणाचे रंजन ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

निद्रा

चंद्रप्रकाशातून ही कादंबिनीपुंजातूनी
सौंदर्यशाली श्यामला धुंदित ये वातायनी :

निद्रिस्त दोन्ही लोचने; ही मुक्त सोडी कुंतला;
भाली चकाके चांदणी; कंठात नाचे चंचला.

उत्फुल्ल या ह्रदपंकजी चालून आली मोहना :
गेले मिटूनी पद्म : तो माझी विरे संवेदना !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुझ्या माझ्यात गं

आज आहे सखे
बहुरंगी अपार
नजरेचे जुगार
तुझ्या माझ्यात गं !

आज आहे सखे
निशिगंधास गंध
श्वसनाचा प्रबंध
तुझ्या माझ्यात गं !

आज आल्यात गं
पावसाच्या सरी
भावनेच्या भरी
तुझ्या माझ्यात गं !

आज नाही सखे
येथ कोणी दुजे
आणि ‘माझे-तुझे’
तुझ्या माझ्यात गं !

आज पाहु नको
विस्मयाने अशी
प्रीत आहे पिशी
तुझ्या माझ्यात गं !

तुझ्या माझ्यात गं !
तुझ्या माझ्यात गं !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ