कामगार आहे मी, तळपती तलवार आहे.....

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,

थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखीलेले आहे
माझ्या जगाची एक गन्धवेनाही त्यात आहे
केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे
जसा जगात आहे मी तसाच शब्दातही आहे,

रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे
याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे,

एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरवात आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे,


कवी - नारायण सुर्वे

1 टिप्पणी: