देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥१॥

मन बुद्धीची कातरी ।
रामनाम सोने चोरी ॥२॥

नरहरी सोनार हरीचा दास ।
भजन करी रात्रंदिवस ॥३॥


रचना    -    संत नरहरी सोनार
संगीत    -    यशवंत देव
स्वर    -    रामदास कामत
तुकारामरूपे घेउनी प्रत्यक्ष l
म्हणे पूर्वसक्ष साम्भाहीजे l

ठेविनिया कर मस्तकी बोलिला l
मंत्र सांगितला कर्णरंध्री ll

तुषितांची जैसे आवड जीवन l
तैसा पिंड प्राणविण त्या l

बहिणी म्हणे हेतू तुकोबाचे ठायी l
ऐकोनिया देही पदे त्यांची ll


- संत बहिणाबाई

ऑपरेशनची भीती

एका रुग्णाला ऑपरेशनची भयंकर भीती वाटत होती. भीतीने त्याची छाती ध़डध़डत होती. कसेबेसे थोडे अवसान आणून तो डॉक्टरांना म्हणाला, “डॉक्टर, हे माझ्या आयुष्यातले पहिलेच ऑपरेशन आहे हो, मला खूप भीती वाटते आहे.”
डॉक्टरने त्याला शांतपणे सांगितले, “अहो माझ्याकडे पहाना, माझ्यासाठी सुध्दा हे पहिलेच ऑपरेशन आहे. पण मी जरा सुध्दा घाबरलेलो नाही.”

हमाली

विझल्या  कालांतराने  पोरक्या  मशाली
कालचा  कार्यकर्ता  पुन्हा  बने  मवाली

विरल्या  हवेत फ़सव्या  घोषणा  कधीच्या
पुनश्च  लोक आता  ईश्वराच्या  हवाली

ल्यालें  राजवस्त्रें ते गावगुंड  सारे
जनता- जनार्दनाला  ही  लक्तरें  मिळाली

उजवें  अथवा  डावें , भगवें  वा  निधर्मी
कोणी  पुसें  न  आता  दीनांची  खुशाली

आपल्या  दु:खाचा  वाहतो  भार जो तो
चुकली  कुणास  येथे  ही रोजची  हमाली


कवी - मिलिंद फणसे

शिल्पकार

झेलावयास माझी छाती तयार आता
घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता

मी एकटाच गातो या उत्सवात माझ्या
माझ्याच गायकीवर माझी मदार आता

विझलो जरी कितीही, मी संपणार नाही
हृदयातल्या आगीशी माझा करार आता

गावात  चोरट्यांच्या दिवसा उजेड नाही
तो सूर्यही कुठेसा झाला फरार आता

नाही अता उदासी, नाही अता निराशा
माझ्याच जीवनाचा मी शिल्पकार आता


कवी - प्रसाद

वसुधैव कुटुम्बकम

देशाचे पेय, पेप्सीकोला.
देशाचे जेवण, पित्जा-बर्गर.
देशात शिक्षण, आंग्ल भाषा.
देशाची बैंक, स्विस बैंक.
प्रेमाचा दिवस, वेलेंटाईन डे.
देशाची नेता, विदेशी मूळ.
स्वदेशी भारत, ग्लोबल इण्डिया.
यालाच म्हणतात, वसुधैव कुटुम्बकम.


- विवेक पटाईत

परमेश्वराची प्रार्थना

श्लोक : कामदाछंद

आस ही तुझी फार लागली।
दे दयानिधे बुद्धि चांगली॥
देउं तूं नको दुष्ट वासना।
तूंच आंवरीं माझिया मना॥१॥

देह देउनी तूंच रक्षिसी।
अन्न देउनी तूच पोसिशी॥
बुद्धि देउनी काम सांगशी।
ज्ञान देउनी तूच तारिशी॥२॥

वागवावया सर्व सृष्टिला।
शक्ति बा असे तूच एकला॥
सर्वशक्ति तूं सर्वदेखणा।
कोण जाणिजे तूझिया गुणा॥३॥

नाम रूप हें तूजला नसे।
त्या तुला मुखें वर्णवे कसें॥
आदि अंत ना मध्यही तुला।
तूंच दाविशी मार्ग आपुला॥४॥

माणसें अम्हीं सर्व लेकरें।
माय बाप तूं हें असे खरें॥
तूझिया कृपेवीण ईश्वरा।
आसरा अम्हां नाहिं दूसरा॥५॥

तूंच आहसी आमुची गती।
देइं आमुतें उत्तमा मती॥
प्रार्थितों तुला जोडुनी करां।
हे दयानिधे कीं कृपा करा॥६॥