CCTV चा फायदा

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन..:

.
.
.
.
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,
चितळे उघडले आहेत का...?"

निसर्ग

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श !

हास हास बाई कलिके एकदा

आपुल्या सुगंधा सोड सोड

लडिवाळपणे केल्या गुदगुल्या

परी काही केल्या हासेना ती

तिला फुलवाया हवा रविकर

वायूची लहर खेळकर

व्यर्थ हे करिती गाण्याचा आग्रह

नाही अनुग्रह देवा, तुझा

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श

गाईन सहर्ष वाडेकोडे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अजुनी चालतोचि वाट

अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना!

त्राण न देहात लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजि होय पुरी दैना!

सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा!

काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी,
हसवाया या केली किती आटाआटी!

हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला,
उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली,
निकट वाटते जीवनसंध्या ही आली!

कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे,
मार्गातच काय सकळ आयु सरुनि जावे!

काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनि जायचे ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धुळीत दगडावर टेकलाच माथा


कवी - ए.पां.रेंदाळकर

दत्ताचा पाळणा

जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥

कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।

सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥

प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।

हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥

पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।

पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥

षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।

कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥

आनंदलोक

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा होऊन.


कवी - कुसुमाग्रज

कोकिळा

कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनी पंख तेव्हा
होउ बघतो कोकिळा

कोकिळा जेव्हा स्वरांची
उघडिते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी

कोकिळा जेव्हा स्वरांची
काश्मिरे करते उभी
हो नदीची नृत्यशाला
रुमझुमे वारा नभी

कोकिळा जेव्हा स्वरांची
माळते सुमनावली
तेधवा वणवा म्हणे मी
चंदनाची सावली

कोकिळा घाली स्वरांचा
मोरपंखी फ़ुल्वरा
जांभळ्या डोही झपूर्झा
खेळती त्या आसरा

कोकिळा जेव्हा ढगांना
आर्ततेने बाहते
धूसरावर स्वप्न त्यांच्या
एक सुंदर वाहते

कोकिळा जेव्हा सुरांचे
गेंद गगनी फ़ेकते
अंचलावर पैठणीच्या
रात्र अत्तर ओतते

कोकिळा स्वरशिल्प असले
बांधता शून्यावरी
आसमंते होत सारी
क्षुब्ध आणिक बावरी

कोकिळा शिशिरात शिरुनी
बर्फ़ जेव्हा होतसे
या जगाला सर्व तेव्हा
जाग थोडी येतसे


कवी - कुसुमाग्रज

एकाकी

’तुझा’ आणि ’तुझ्यासाठी’
शब्द सारे खोटे,
खरी फ़क्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.
दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?


कवियत्री - शांता शेळके