कोकिळा

कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनी पंख तेव्हा
होउ बघतो कोकिळा

कोकिळा जेव्हा स्वरांची
उघडिते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी

कोकिळा जेव्हा स्वरांची
काश्मिरे करते उभी
हो नदीची नृत्यशाला
रुमझुमे वारा नभी

कोकिळा जेव्हा स्वरांची
माळते सुमनावली
तेधवा वणवा म्हणे मी
चंदनाची सावली

कोकिळा घाली स्वरांचा
मोरपंखी फ़ुल्वरा
जांभळ्या डोही झपूर्झा
खेळती त्या आसरा

कोकिळा जेव्हा ढगांना
आर्ततेने बाहते
धूसरावर स्वप्न त्यांच्या
एक सुंदर वाहते

कोकिळा जेव्हा सुरांचे
गेंद गगनी फ़ेकते
अंचलावर पैठणीच्या
रात्र अत्तर ओतते

कोकिळा स्वरशिल्प असले
बांधता शून्यावरी
आसमंते होत सारी
क्षुब्ध आणिक बावरी

कोकिळा शिशिरात शिरुनी
बर्फ़ जेव्हा होतसे
या जगाला सर्व तेव्हा
जाग थोडी येतसे


कवी - कुसुमाग्रज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा