कोण तू----?

ग्रह-भोवर्‍यांचा खेल अधान्तरी

कोण तू गारोडी खेळणारा ?

हंडयाझुंबरांचे अंबराला छत

कोण तू श्रीमंत लावणारा ?

सुगंधी शीतळ वार्‍याचे विंझण

विलासी तू कोण सोडणारा ?

दिव्य रंगाकृति व्योमपटावरी

कोण तू चितारी काढणारा ?

विश्वाचि ही बाग सदा फुललेली

कोण तू गा माळी ठेवणारा ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

लाडावले पोर

लाडावले पोर पुरविता कोड

जन्माची ही खोड त्याला दिली

पुरे आता झाले माझे हे कौतुक

योग्यता ठाऊक माझी मला

दिल्या घेतल्याचा धनी कोण नाही

देवा, सर्व काही लाड तुझे

मळकट तोंड बाळाचे पाहूनी

पुसीते जननी पदराने

मायेच्या हाताने देवा, माझा डाग

लगोलग टाक पुसूनीया


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हवा देवराय, धाक तुझा

लाख गुन्हे माझे झाले आजवरी

आता लाज वरी मन माझे

तोच तोच गुन्हा करी मी कोडगा

म्हणतो, ’कोड गा पुरव तू !’

क्षमाक्षील मला क्षमा करशील

सावराया शील पुन्हा माझे

क्षणाचा परतावा कामाचा तो काय !

हवा देवराय, धाक तुझा

कठोर शासन एकदाच करी

तेच हितकरी परिणामी


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

उजळेल माझे जीवन-सुवर्ण

मोठेपणाचे ते केले होते ढोंग

केवळ ते सोंग वरपांगी

मुलाम्याचे नाणे होते खोटेनाटे

चाले ना ते कोठे बाजारात

बरे झाले देवा, घसरलो खाली

ओळख पटली खरीखुरी

तुझ्या पायापाशी बसुनी मी देवा,

आचरीन सेवा मनोभावे

उजळेल माझे जीवन-सुवर्ण

जाईल झडून हीण सारे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

घरातच माझ्यां उभी होती सुखे

घरातच माझ्यां उभी होती सुखे

नच देखूं शके आंधळा मी

मृगजळामागे दूर दूर गेलो

परतून आलो तान्हेला मी

समाधान नाही, सदा वखवख

सदा रुखरुख मनामाजी

मोलवान ठेवा सोडुनी घरचा

भिकारी दारचा जाहलो मी

असा देव, झालो भ्रष्ट वेडापिसा

शुद्धीवर कसा आणशील ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

तुझी का रे घाई माझ्यामागे ?

परतीरी उभा राहूनी तू हाका

एकसारखा का मारितोस ?

अडथळा होतो मला सदाकदा

लक्ष माझे द्विधा करितोस

अद्यापहि माझे काम झाले नाही

तुझी का रे घाई माझ्यामागे ?

कामकाज माझे पूर्ण झाल्यावर

नाही क्षणभर थांबणार !

थांब थोडा वेळ, करितो विनंती

तुला काकूळती येऊनि मी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

तुझ्या गावचा मी इमानी पाटील

सार्‍या मंडळींना माझा रामराम

चावडीचे काम सुरु करु

आपुली रक्कम देऊनीया टाका

थकबाकी नका ठेवू कुणी

कुलकर्णी, काढा हिशेबाच्या वह्या

जमाखर्च लिहा बिनचूक

वेसकरा, भरी कचेरीत पट्टी

घेऊनि पावती परत ये

तुझ्या गावचा मी इमानी पाटील

देवा, त्या कोठील भीडभाड !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या