महाराष्ट्रास!

महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा शत्रुमर्मी रोवुनी
सिंहसा तू साज शौर्य ठाक तेजे खवळुनी।।

दिव्य गाणी विक्रमाची दुर्ग तूझे गाउनी
अंबरस्थां निर्जरांना हर्षवीती निशिदिनी।। महाराष्ट्रा...।।

दरीखोरी खोल, गेली वीररक्ते रंगुनी
शेष ती संतोषवीती त्वद्यशाला गाउनी।। महाराष्ट्रा...।।

अंबुराशी करित सेवा त्वत्पदा प्रक्षाळुनी
त्वत्कथेला दशदिशांना ऐकवीतो गर्जुनी।। महाराष्ट्रा...।।

म्लानता ही दीनता ही स्वत्त्वदाही दवडुनी
स्वप्रतापे तळप तरणी अखिल धरणी दिपवुनी।। महाराष्ट्रा...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८

भारतमाता माझी लावण्याची खाण!

(नाचून म्हणावयाचे गाणे)

भारतमाता माझी लावण्याची खाण
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान
करिन तिचे ध्यान, मी करिन तिचे ध्यान
भारतमाता माझी लावण्याची खाण
प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण
भारतमाता माझी लावण्याची खाण।।

मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, मी देइन माझे प्राण
हातात घेतले आहे सतिचे मी वाण।। गाइन...।।

जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रुढिरान, मी छाटिन रुढिरान
हसवीन आइचे जे मुख झाले म्लान।। गाइन...।।

उडविन दाणादाण, मी उडविन दाणादाण
करिन धूळधाण, मी करिन धूळधाण
स्वातंत्र्य-विरोधकां देतो मी आव्हान।। गाइन...।।

विसरेन देहभान, मी विसरेन देहभान
कापुन देइन मान, मी कापुन देइन मान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान।। गाइन...।।

नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, मी काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्नान।। गाइन...।।

सर्वस्वाचे दान, करिन सर्वस्वाचे दान
घेतो आज आण, मी घेतो आज आण
मातेला घडविन माझ्या मोक्षामृतपान।। गाइन...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

राणा प्रताप

स्वातंत्र्यसूर्य राणा। चित्ती प्रताप आणा
चारित्र्य दिव्य त्याचे। त्याचा अभंग बाणा
रजपूत पूतकीर्ती। कुळशील बाटवीत
परि थोर पूर्वजांची। राखी प्रताप नीती
तो मानसिंग तैसे। दुसरेहि अन्य मोठे
स्वार्थांध होउनीया। ठरले जगात खोटे
अभिमानशून्य झाले। रिपुगौरवास गाती
स्वकरीच पूज्य धर्मा। देतात मूठमाती
स्वार्थांदि नीचवृत्ति। याचाच पंक माजे
परि त्यामधून दिव्य। रमणीय पुष्प साजे
रजपूतभूमिपंकी। कमनीय दिव्य गंध
कमल प्रताप एक। दे भूस सौख्यकंद
सर्वत्र अंधकार। भरला भयाण घोर
त्यात प्रताप शोभे। शुभकांति चंद्रकोर
रिपु-सैन्यसागरात। भूमाय तारण्याला
धैर्य प्रताप एक। नौका अभंग झाला
जयमत्त शत्रु मागे। लोटावया न कोणी
परि एकटा प्रताप। ठाके सुरेंद्रवाणी
समरात सेलिमाला। दावून दिव्य भाला
तत्तेज हारवीले। निस्तेज शत्रु केला
हळदीत खळखळाट। रिपु-रक्त वाहवीले
निज अल्प सैन्य तरिही। आश्चर्य थोर केले
केले अनंत कष्ट। रानावनात गेला
निज शत्रुशी सदैव। लढण्यात जन्म नेला
विख्यात सत्कुलाची। ती कीर्ति निष्कलंक
राहो, म्हणून मानी। झाला प्रताप रंक
घेईन ना जरी मी। मत्प्राण तो चितोड
पेंढ्यावरी निजेन। कोंडाच अन्न गोड
सुखभोग सर्व वर्ज्य। रिपु जो धरी चितोड
करुनी अशी प्रतिज्ञा। पाळी न त्यास तोड
सिंहासमान शूर। मेरुपरी सुधीर
भीष्मापरी प्रतिज्ञा। पाळीत थोर वीर
आपत्ति घोर आल्या। तरि त्या न तो जुमानी
तारामती पतीच्या। सम सत्त्व स्वत्व मानी
निजा-मायभूमि-सेवा। करिता, न ते कुटुंब
स्मरले, सदैव हृदय। भू-भक्तिने तुडुंब
स्वातंत्र्य-रक्त वीरा। रिपु-दुर्जया सुधीरा
देवी-स्वतंत्रतेच्या। कंठामधील हिरा
स्मरण प्रभावशाली। तेजस्वि त्वत्कृतीचे
देशास जोवरी रे। भय तो न ते मृतीचे
त्वन्नाम दिव्य-मंत्र। उठवील भारताला
देईल दिव्य शक्ति। अर्पील वैभवाला
स्वातंत्र्यरक्त जीवा। त्वन्नाम स्फूर्ति देई
स्वार्थादि नीच वृत्ति। सगळ्या लयास नेई
भ्याडां करील शूर। नि:सत्त्व चेतवील
उठवील धूलीपतिता। त्वन्नाम दिव्य-शील
तू लाज भारताची। तू आस भारताची
चंद्रार्क जोवरी तो। तू कीर्ती भारताची


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८

महात्माजींस

विश्वाला दिधला तुम्हीच भगवन् संदेश मोठा नवा
ज्याने जीवन सौख्यपूर्ण करणे साधेल या मानवा
ते वैराग्य किती! क्षमा किति! तपश्चर्या किती! थोरवी
कैशी एकमुखे स्तवू? मिरवता भास्वान् जसा तो रवी।।

आशा तुम्हि अम्हां सदभ्युदयही तुम्हीच आधार हो
ते चारित्र्य सुदिव्य पाहुनि अम्हां कर्तव्यसंस्फूर्ति हो
तुम्ही भूषण भारता, तुमचिया सत्कीर्तिची भूषणे
हे त्रैलोक्य धरील, धन्य तुमचे लोकार्तिहारी जिणे।।

बुद्धाचे अवतार आज गमता, येशूच किंवा नवे
प्रेमाभोधि तुम्ही, भवद्यश मला देवा! न ते वानवे
इच्छा एक मनी सदा मम भवत्पादांबुजा चिंतणे
त्याने उन्नति अल्प होइल, अशी आशा मनी राखणे।।

गीता माझि तुम्ही श्रुतिस्मृति तुम्ही तुम्हीच सत्संस्कृति
त्यांचा अर्थ मला विशंक शिकवी तो आपुली सत्कृती
पुण्याई तुम्हि मूर्त आज दिसता या भारताची शुभ
धावे दिव्य म्हणुनी आज भुवनी या भूमिचा सौरभ।।

तुम्ही दीपच भारता अविचल, प्रक्षुब्ध या सागरी
श्रद्धा निर्मितसा तुम्हीच अमुच्या निर्जीव या अंतरी
तुम्ही जीवन देतसा नव तसा उत्साह आम्हां मृतां
राष्ट्रा जागविले तुम्ही प्रभु खरे पाजूनिया अमृता।।

तुम्ही दृष्टी दिली, तुम्ही पथ दिला, आशाहि तुम्ही दिली
राष्ट्रा तेजकळा तुम्ही चळविली मार्गी प्रजा लाविली
त्या मार्गे जरि राष्ट्र सतत उभे सश्रद्ध हे जाइल
भाग्याला मिळवील, भव्य विमल स्वातंत्र्य संपादिल।।

विश्रांति क्षण ना तुम्ही जळतसा सूर्यापरी सतत
आम्हाला जगवावया झिजविता हाडे, सदा राबत
सारे जीवन होमकुंड तुमचे ते पेटलेले सदा
चिंता एक तुम्हां कशी परिहरु ही घोर दीनापदा।।

होळी पेटलिसे दिसे हृदयि ती त्या आपुल्या कोमल
देऊ पोटभरी कसा कवळ मदबंधूंस या निर्मळ
ह्याची एक अहर्निश प्रभु तुम्हां ती घोर चिंता असे
चिंताचिंतन नित्य नूतन असे उद्योग दावीतसे।।

कर्मे नित्य भवत्करी विवध ती होती सहस्त्रावधी
ती शांति स्मित ते न लोपत नसे आसक्ति चित्तामधी
शेषी शांत हरी तसेच दिसता तुम्ही पसा-यात या
सिंधु क्षुब्ध वरी न शांति परि ती आतील जाई लया।।

गाभा-यात जिवाशिवाजवळ ते संगीत जाले सदा
वीणा वाजतसे अखंड हृदयी तो थांबतो ना कदा
झोपे पार्थ तरी सुरुच भजन श्रीकृष्ण श्रीकृष्णसे
देवाचा तुमचा वियोग न कदा तो रोमरोमी वसे।।

वर्णू मी किति काय मूल जणु मी वेडावते मन्मती
पायांना प्रणति प्रभो भरति हे डोळ्यांत अश्रू किती
ज्या या भारति आपुल्यापरि महा होती विभूती, तया
आहे उज्ज्वल तो भविष्य, दिसते विश्वंभराची दया।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-अमळनेर, १९२६

खरे सनातनी

मी मांडितसे विचार साधे सरळ
हे अमृत नसे हे गरळ
मी सनातनी धर्माचा सदभक्त
मी पूजितसे ऋषिसंत
निज संस्कृतिचा अभिमान असे माते
मी पूजित भूमातेते
निज संस्कृति व्हावी थोर
ती होवो ना अनुदार
हो एकच मजला घोर
मी नम्रपणे वदतो ओतुन हृदय
तुम्हि ऐका सारे सदय।।

ज्या नवनव हो सतत पल्लव फुटती
त्या सनातन असे म्हणती
जे नवनव हो ज्ञान शुभंकर येते
तो वेदच माते गमते
तो वेद असे अनंत, हळुहळु मूर्त
होऊन दिसे जगतात
नवविचार मी घेईन
मी पुढतिपुढति जाईन
सौंदर्यसिंधु जोडीन
जो ज्ञानाला सादर सतत घेई
तो खरा सनातनी होई।।

जे नित्य नवे सनातन तया वदती
जीर्णा न सनातन म्हणती
श्रीगीतेचे नित्य नवीनच सार
ज्ञानेश्वर म्हणती थोर
ती वाढ पुरी ज्याची झाली त्याते
मरण्याचे केवळ उरते
सद्धर्म सदा वाढेल
नवनविन रंग दावील
नव अर्थ अंगिकारील
हे वाढतसे सदैव जीवनशास्त्र
तद्विकास असतो होत।।

त्या शब्दांचा अर्थ वाढतो नित्य
तो अनंत असतो अर्थ
त्या यज्ञाचा बघा तुम्ही इतिहास
किति झाला अर्थ-विकास
जन मरताती कल्पना न परि मरते
ती सतत वाढत जाते
ते विचार होती खोल
होतील कल्पना विमल
हा विकास सकक सकल
जगि चालतसे मानव जातो पुढती
मुंगीपरि जरि ती प्रगती।।

ते ठरले ना अजुनि जीवनी काही
सिद्धांत ना एकहि पाही
जगि हितकर ती हिंसा अथवा प्रेम
ना झाला अजुनि नेम
ते सत्य सदा पूजावे वा अनृत
अद्याप न मत निश्चित
हे प्रयोग सारे अजुनी
करितात महात्मे झटुनी
का बिळात बसता घुसुनी
निजबुद्धीला स्वतंत्र करुनी उठणे
नवरंगे उत्कट नटणे।।

हे बाल्यदशेमाजी जीवनशास्त्र
ना निश्चित काही त्यात
ज्याबद्दल ना शंका तिळभर कोणा
जगि ऐसे काहि दिसे ना
तो घेउनिया सादर पूर्वानुभव
संपदा ज्ञानास नव
ते पूर्वज सर्वज्ञानी
जरि म्हणाल तुम्ही कोणी
ते हसतिल तुम्हां वरुनी
ते फरक सदा होते देखा करित
ऋषि ऋषिला नाही मिळत।।

तो मागतसे देवा विश्वामित्र
मति सतेज निर्भय मुक्त
तो गायत्रीमंत्र सनातन दिव्य
मागतसे बुद्धी भव्य
तो धर्माचा पाया म्हणता वेद
वेदार्थे ज्ञानच सिद्ध
ज्ञानासम पावन नान्य
ते मिळवुन व्हा रे धन्य
परि घरात बसता घुसुन
जो घरि बसला त्यास मिळे ना काही
त्या एकच मरणे राही।।

तुम्हि उघडा रे बंधूंनो निज डोळे
ना अंध असावे भोळे
जे इतर जगी थोर विचारा करिती
जे प्रयोग नव दाखविती
तुम्हि त्याचाही विचार सादर करणे
उपयुक्त असे ते घेणे
ज्ञानाचा मक्ता न कुणा
अधिकार सर्व राष्ट्रांना
अभिमान देतसे मरणा
ते ऋषिमुनि ना केवळ येथे झाले
हे बघणे उघडुन डोळे।।

हे कलियुग ना सत्ययुगचि हे माना
प्रभुच्या न करा अपमाना
जो रवि उगवे तारा ज्या लखलखती
ते तेज न त्यांचे कमती
हे कलियुग ना गंगा पावन तीच
फळपुष्प तरु हे तेच
प्रत्येक दिवस जो दिसतो
तो अनंततेतुन येतो
पावित्र्ये तिळ ना कमि तो
तो मूर्खपणा बाष्कळपण ते सोडा
सद्विचार नवनव जोडा।।

ते ऋषिमुनि हो काय एकदा झाले
ते काय आज ना उरले
ते पुन:पुन्हा ऋषिमुनि अवतरतात
भुवनात सदा सर्वत्र
तो लेनिन तो तैसा सन्यत्सेन
हे ऋषीच जनतामान्य
नव मंत्र जगा जो देई
नव तेज जगा जो देई
वैषम्य लयाला नेई
तो ऋषि जाणा जाणा तोची संत
तुम्हि उघडा अपुले नेत्र।।

श्रीज्ञानेशे संस्कृतातले ज्ञान
सर्वांस दिले वाटून
श्रीनाथांनी चालविले ते काम
परि त्यांना छळिती अधम
ती ज्ञानाची खुली कराया दारे
झगडले संत ते सारे
तुम्हि अनंत छळिले त्यांना
परि आज देतसा माना
ह्या गोष्टी ध्यानी आणा
त्या संतांचे काम चालवा पुढती
सर्वांना देण्या मुक्ती।

ह्या भारतभूमाजी आजहि संत
आहेत करु नका खंत
हे संत खरे गांधी पावनचरित
दीनास्तव सतत झिजत
तो धर्म खरे त्यांनाच कळे सत्य
जे गीता आचरतात
अंबरांबुधीचे कळते
गांभीर्य कुणाला जगि ते
बुडि घेत उडत वा त्याते
सद्धर्माचा गाभा संतच मिळवी
तो पंडित साली चघळी।।

ती पांघरुनी शालजोडि जे बसती
प्रेमा न जगा जे देती
जगि अन्याया पाहुन जे ना उठती
जे वैषम्ये ना जळती
जगि दास्याला दंभा दैन्य बघुन
उठतात न जे पेटून
त्या जडां कळे का धर्म?
त्या मृता कळे का वर्म?
जे घोकित बसती धर्म
तो धर्म कळे आचरतो जो त्यास
ना धर्म कळे इतरांस।।

निज धर्माला ओठावर ना मिरवा
सतत्त्वे जीवनि जिरवा
तुम्हि प्रेम करा विचार करणे नित्य
जगतात बघा सर्वत्र
या देशाला दिवस चांगले आणा
नव मंगल मिरवा बाणा
बंधुता जीवनी येवो
तो विचार हृदयी येवो
ते धैर्य कृतीचे येवो
सतज्ञानाने सत्करणीने मिळवा
गेलेल्या अपुल्या विभवा।।

निजधर्माचे करा मुख तुम्ही उजळ
मति उदार होवो विमल
ज्या बंधूंचे छळण आजवर केले
पशुहून नीच ज्या गणिले
त्या अस्पृश्या हरजन पावन म्हणणे
प्रेमाने हृदयी धरणे
आचारी येवो समता
प्रेमाची वाहो सरिता
दंभाची न उरो वार्ता
तुम्हि संसारी अंध-धी न रे व्हावे
मति हृदय निज न मारावे।।

ती सोडावी क्षुद्र सकल आसक्ती
ध्येयाची लागो भक्ती
तुम्हि मानव्या उठणे पूजायास
निज मोक्षहि मिळवायास
निज कातडिला न कुणी कुरवाळावे
ध्येयास्तव सर्वहि द्यावे
सत्तेज भारती भरु दे
सदभाव भारती भरु दे
सदविचार रवि उगवू दे
ती संपू दे कार्पण्याची रजनी
राहोत कुणी ना निजुनी।।

हे सनातनी सकळ खरे होवोत
ज्ञानाते मिठि मारोत
नव ऐकुनिया विचार हे नाचोत
नव करणीस्तव जागोत
हे वैषम्या दंभा दुरि नेवोत
त्यागाने हे तळपोत
यज्ञ हे सनातन तत्त्व
ज्ञान हे सनातन तत्त्व
मोक्ष हे सनातन तत्त्व
तुम्हि त्याग करा, ज्ञान वरा, व्हा मुक्त
व्हा खरे सनातन-भक्त।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-पुणे, फेब्रुवारी १९३५

सत्याग्रही (खंडकाव्य)

सत्याग्रही या नावाचे एक खंडकाव्य गुरुजींनी १९३० मध्ये त्रिचनापल्लीस असताना लिहिले होते. त्यातील जो भाग मबळ आवृत्तीमध्ये होतो तो येथे देत आहे.

थोडा संदर्भ : श्रीमंत आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वय अठरा वर्षांचे होते. त्याचं आठ-नऊ वर्षांच्या एका मुलीशी लग्न लागलेले होते. तो सत्याग्रहात स्वयंसेवक झाला होता. तो तुरुंगात

अतिसाराने मरण पावला. त्याच्या आजारपणाची तारही खेड्यात वेळेवर पोहचली नाही. मरणाचीच तार एकदम घरी गेली. आईबापांना जबर धक्का बसला. तो मृतपुत्र रात्रीच्या वेळी दिव्य वेष धारण करुन

आईबापांची समजूत काढण्यास येतो. रात्रभर विचारवार्ता करुन त्यांचे समाधान करुन प्रभात होताच परत जातो.

मातेचा शोक

कैसा बाळ निमाला
न दया भगवंताला।। कैसा....।।

‘लडिवाळा बाळा
बाळा वेल्हाळा
ये भेटायाला।।
तुजविण कोणि न मजला।। कैसा....।।

येशिल माघारा
माझ्या पाखरा
राजस राजकुमारा
धीर असा रे धरिला।। कैसा....।।

येशिल भेटाया
आशा ही सखया
होती मम हृदया
काळ कसा परि फिरला।। कैसा....।।

बाळा काय करू
प्राणा केवि धरू
शोका केवि करू
शोक सखा मम ठरला।। कैसा....।।

हे क्रूरा काळा
कैसा रे नेला
पाझर ना फुटला
घालिशि घोर घाला।। कैसा....।।

एकुलता बाळ
माणिक बिनमोल
मोती तेजाळ
दुर्दैवी मी अबला।। कैसा....।।

शून्य दिसे सृष्टी
माता मी कष्टी
भरते ही दृष्टि
अंत न पार न दु:खाला।। कैसा....।।

घेउ कुणा जवळ
देउ कुणा कवळ
बोलु कुणा जवळ
तव मुखचंद्र अंतरला।। कैसा....।।

मुख शशि न हसेल
हृदय न सुखवील
बोल ना रिझावील
राम न जीवनि उरला।। कैसा....।।

वत्साविण गाय
मोकलिते धाय
तळमळते गाय
प्राण जावया सजला।। कैसा....।।

सुख सगळे आटे
कंठ तिचा दाटे
हृदय तिचे फाटे
शरणागत ती मरणाला।। कैसा....।।

हंबरडा फोडी
सुस्कारे सोडी
बुडते हो होडी
करुणासागर भरला।। कैसा....।।

डोळे डबडबले
मानस गजबजले
अंतर गहिवरले
माता पडली धरणीला।। कैसा....।।