स्वातंत्र्यदेवीचे शुभ आगमन

आनंदाचा।
उगवला दिवस सोन्याचा।।

मालिन्यरात्र लोपली
सौभाग्यउषा उजळली
सत्कीर्तिगुढी उभविली
चला रे नाचा।। उगवला....।।

गंभीर भेरिगर्जन
शंखादि मंगलस्वर
देवता येतसे दुरुन
मांगल्याचा।। उगवला....।।

ते पहा मराठी भाले
चपळेपरि चमकत आले
मंदील पाठिवर खेळे
तच्छौर्याचा।। उगवला....।।

शत्रुच्या पिऊन रक्ताला
यज्जीव निरंतर घाला
तो आला रजपुत भाला
तत्तेजाचा।। उगवला....।।

ते पहा शिवाजी राजे
तो प्रतापसिंहही साजे
पृथ्विराजहि तेथ विराजे
धन्यत्वाचा।। उगवला....।।

ती जिजा तुम्हां दिसली का
ती उमा तुम्हां दिसली का
लक्ष्मीहि तुम्हां दिसली का
पावित्र्याचा।। उगवला....।।

दुंदुभी नभी दुमदुमली
माणिकमोती उधळिली
स्वातंत्र्यदेवता आली
जयघोषाचा।। उगवला....।।

सर्वैक्य-सुंदरासन
मांडिले बहुत सजवून
देवता दिसतसे खुलुन
मोक्षश्रीचा।। उगवला....।।

सुखसिंधु किति उचंबळे
भाग्यात चित्त दंगले
मोदात विश्व रंगले
कैवल्याचा।। उगवला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

स्वातंत्र्यानंदाचे गाणे

(लाहोरला स्वातंत्र्याचा ठराव पास झाला ती वार्ता ऐकून केलेले गाणे.)

मंगल मंगल त्रिवार मंगल पावन दिन हा धन्य अहो
भारत प्यारा स्वतंत्र झाला जय बोला जय बोला हो।।

मेवाडाच्या रणशार्दूला उठा, उठा शिवराया हो
माता अपुली स्वतंत्र झाली जय बोला जय बोला हो।।

दिशा आज का प्रसन्न दिसती निर्मळ दिसती सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पवन आजचा पावन वाटे कारण मजला सांगा हो
भारतमाता मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पाषाणांची फुले जाहली का ते मजसी सांगा हो
गतबंधन भू झाली म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

मातीची ही माणिकमोती झाली का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

काट्यांची मखमल मृदू झाली चमत्कार का झाला हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

सतेज आजी अधिकच दिसतो दिनमणि का मज सांगा हो
आई झाली मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पर्वतातुनी खो-यांतूनिही दुर्गांतुन का गाणी हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

नद्या आज का तुडुंब भरल्या वाहावयाचे विसरुन हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

उचंबळे का अपार सागर सीमा सोडुनी आज अहो
भारत झाला मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

गगनमंडपी विमानगर्दी झाली का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

स्वर्गातून सुमवृष्टि होतसे अपार का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

नारद तुंबर गाणी गाती सुरमुनि हर्षित ते का हो
भारत झाला मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

कैलासावर डमरु वाजतो नाचे शिवशंकर का हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

चार मुखांनी चतुरानन की सामगायना करितो हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

सृष्टी नाचते विश्व हासते चराचर भरे मोदे हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पाहा पाहा ते विश्वजन बघा, भेट घेउनी आले हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

चिनी जपानी अमेरिकन ते आले वंदन करण्या हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

तार्तर मोगल अफगाणादी शेजारी ते आले हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

युरोपातले सारे गोरे सविनय साश्रू आले हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

भारतमाता अनाथनाथा प्रेमे कुरवाळीत अहो
आपपर तिला नाही ठावे जय बोला जय बोला हो।।

आज जगाचे भाग्य उदेले वैभव फुलले अगणित हो
उचंबळे सुखसागर मंगल जय बोला जय बोला हो।।

दैन्य पळाले दु:ख गळाले कलहद्रोह दुरावति हो
नव्या मनूचा उदय जाहला जय बोला जय बोला हो।।

चुकली माकली जगातील ती राष्ट्रे जवळी घेउन हो
प्रेमे न्हाणी त्यांना भारत जय बोला जय बोला हो।।

पिवळी ढवळी काळी सारी भुवनामधली बाळे हो
भारतमातेजवळ नाचती जय बोला जय बोला हो।।

“भलेपणाने खरेपणाने प्रेमे सकळहि वागा हो
सुखास निर्मा” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“शांति नांदु दे अता अखंडित आनंद सहा नांदो हो
विसरा मागिल” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“परमेशाची सकळ लेकरे सुखेन भुवनी खेळू हो
स्वर्ग निर्मु या” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“परस्परांचे हात धरु या फेर धरुनी नाचू हो
शांतिगीत गा” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“थोर भारता! मार्गदर्शका! तूच आमुचा सदगुरु हो”
वदती सारी राष्ट्रे सदगद जय बोला जय बोला हो।।

अनंत झाली सुपुष्पवृष्टी गगनामधुनी तेव्हा हो
थै थै थै थै नाचु लागले गाउ लागले जय जय हो।।
जयजय भारत प्रियतम भारत जयजय भारत बोला हो
जयजय जयजय जयजय जयजय जय भारत जय बोला हो।।

आनंदाने डोला हो
आनंदाश्रू ढाळा हो
जयजय भारत जयजय भारत जयजय भारत बोला हो।।

हृदय कपाटे खोला हो
बांधा चित्सुखझोला हो
नाचा त्यावर नाचत बोला जयजय भारत बोला हो।।

जय बोला जय बोला हो।।
जय भारत जय बोला हो।।
जयशब्दाने अंबर कोंदे जय भारत जय बोला हो।।

भारत प्यारा स्वतंत्र झाला जयजय म्हणुनी बोला हो
सृष्टी सकलही स्वतंत्र झाली जयजय म्हणुनी बोला हो।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, २६ जानेवारी १९३०

भारतास!

मनोहरा भारता! मदंतर देवा! त्वन्मुखकळा
शोभेल कधी दिव्ये तेजे कळे कळेना मला
मोहरात्र संपेल कधी ही उषा कधी येइल
सदभाग्याची सुंदर किरणे कदा बरे पसरिल
स्वार्थ कधी जाईल लयाला, कलह कधी सरतिल
सद्धर्माची परमैक्याची फुले कधी फुलतिल
हे भाइभाइचे परि होतील कधी हिंदिजन
कधी हृदया मिळतिल हृदये, जोडेल मनाला मन
उठतील कधी तेजाने हातात हात घालुन
अलौकिक अपूर्वा कृति करितिल त्वत्सुत कधी निर्मळ
आनंदाश्रू त्वन्नयनांतुन वाहवतिल घळघळ।।

अस्मन्माता करु स्वतंत्रा ध्येय हेच लोचनी
त्वत्पुत्रांच्या दिसुनी केव्हा उठतिल त्वन्मोचना
जपती अजुनी निज शरिरांना अमूल्य ठेव्यापरी
मरणाची ती भीति क्षुद्रा अजुन तदीयांतरी
निज आप्तांच्या निज गेहांच्या मोही हे अडकती
रडती, पडती, प्रखरता न ता पेटवी चित्ताप्रती
तोडितील आई! केव्हा त्वत्सुत हे मायापाश
त्वत्स्वातंत्र्याचा केव्हा लागेल एक त्या ध्यास
त्वदभक्तीचा तो केव्हा दरवळेल तन्मनि वास
देशभक्त तो रक्त एकच व्रती इतर विसरुन
घेइ करी जो वाण सतीचे वज्रमूर्ति होउन।।

नयनी, वदनी, भाळी, ज्यांच्या देशभक्ति रेखिली
नररत्ने ना अशी सहस्त्रावधि अजुनी देखिली
ज्यांचे जीवन तहानलेले स्वातंत्र्यसुधेस्तव
तळमळते जळते मन ज्यांचे, धीर न धरिते लव
उच्चारी आचारी ज्यांच्या अखंडित प्रगटते
स्वातंत्र्याची मंगल गंगा, तरुण असे कितिक ते?
भोगावरती दृष्टि तयांची विलासैकजीवन
अनंतभोगी भ्रमरसम रमे नित्य तयांचे मन
भावना उज्वला नाही मेल्यापरि दिसती तरुण
स्वातंत्र्यरवीचे ज्यांनी आगामी व्हावे अरुण
हसवावे निजजननींचे मुखकमल जयांनी करुण
व्यसनशरण हे तरुण बघोनी जीव किती तडफडे
मदंतराला ठावे, माते! अश्रुसडा मम पडे।।

तुझ्या भारता! वातावरणी जिकडे तिकडे कदा
स्वातंत्र्याचे वारे उठतिल पळावया रिपु-मदा
स्वातंत्र्याचे पुरुषार्थाचे पराक्रमाचे तसे
विचार केव्हा रोमरोमिं ते भरतिल भरपूरसे
देशभक्ति पाजितील केव्हा माता निज लेकरा
देशप्रेमे दिव्ये भरतिल कधी तदीयांतरा
अज्ञानसागरी बुडती, भारतीय माता अजुनी
देशभक्ति पाजील कोण माता जरि पडती निजुनि
देशभक्ती खेळे जो ना मातांच्या नयनी वदनी
तोवरि नाही आशा, देशा! त्वदुद्धृतीची मला
दृश्य असे हे नैराश्याचे पाहुन दाटे गळा

मातापितरे शिक्षक रमतिल देशभक्तिसागरी
जेव्हा तेव्हा आशेला मम पल्लव फुटतिल तरी
जिकडे तिकडे एक दिसावे दृश्य देशभक्तिचे
कानी यावे जिकडे तिकडे शब्द देशभक्तिचे
विचारविद्युत एकच खेळो सर्वांच्या हृन्मनी
ध्येय दिसावे एक सर्वदा सर्वांना निशिदिनी
सर्वांच्या दृष्टीपुढती स्वातंत्र्यचित्र शोभावे
सर्वांनी यत्न करावे त्यासाठी जीवेभावे
प्राणचित्त वित्त असे जे सर्वस्व सुखे वेचावे
लाखो जेव्हा अशा विचारे उठतिल मग तळपला
भाग्यसूर्य तव समज भारता! संशय नाही मला

प्रसन्न होतिल दिशा, निराशानिशा नष्ट होइल
त्वदभाग्याचे जगी पवाडे सत्कवि मग गातिल
त्वन्मुखकंजी लावण्याची दिव्य चढेल प्रभा
गगनमंडपी वृंद सुरांचा राहिल येउन उभा
पुष्पवृष्टि करितील तुझ्यावर मग गंधर्वस्वर
यशोगान तव गातिल डोलत प्रेमाने निर्भर
होईल त्रिभुवनी तेव्हा सोहळा महानंहाचा
बोलतील एकामेका जन सारे नाचा नाचा
शांतीचा मांगल्याचा स्नेहाचा सौभाग्याचा
तो दिन येइल त्वत्पुत्र जरी वेडे त्वदभक्तिने
होतील, करितिल शर्थ जिवाची मरतील स्फूर्तीने।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३०

भारता ऊठ!

ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वला!
अभिनवबलवैभवयुत शोभ मंगला।।
दशदिशांत कीर्तिगंध मधुर दरवळो
त्वत्पावन-नामबळे दुरित ते पळो
धैर्य तुझे शौर्य तुझे अमित ना ढळो
जीर्ण शीर्ण सकळ आज जे तुझे गळो
दास्ये ना फिरुन कधी मुख तुझे मळो
शांता, दाता, कांता
रुचिर थोर कृति कर तू सतत निर्मळा।। ऊठ....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

वंदे मातरम्!

वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

तव गतवैभव पुनरपि मिळवू
तव सत्कीर्ति न पुनरपि मळवू
उज्वल करु तव वदन त्रिभुवनि
करु कष्ट तुझ्यासाठी निशिदिनी
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

तुज पुनरपि जननी गे हसवू
तुज राष्ट्रांच्या शीर्षी बसवू
सकळ जगाची होशिल माता
देलि हतपतिता तू हाता
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

अश्रु न आई! आता ढाळी
आइ! नआता पाही खाली
त्वत्सुत आम्ही पराक्रमाने
मिरवू तुज जगि सन्मानाने
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

ऊठ, पहा आम्हि सारे भाई
एक जाहलो द्रोह न राही
घसरु पुढती मिळवू विजया
दास्य झणी तव नेऊ विलया
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।

विद्यावैभवविकास येइल
तववदनांबुज, आइ! फुलेल
तुज भाग्यगिरीवरि बघ नेऊ
त्वच्चरणी रत सतत राहू
वंदे मातरम् वंदे मातरम्
वंदे मातरम् वंदे मातरम्।।



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

भारतजननी तव शरणम्!

भारतजननी तव शरणम्। भारतमाते तव शरणम्
मोददायिनी बोधदायिनी अन्नदायिनी तव शरणम्।।

विद्यावंते तव शरणम्
वैभववंते तव शरणम्
अनंत-तेज:प्रसवे अस्मन्मानससुखदे तव शरणम्

विक्रमकारिणि तव शरणम्
पवित्रकारिणि तव शरणम्
पुण्यकर्मसत्प्रभावतंसे हे ज्ञानरसे तव शरणम्

लावण्यमये तव शरणम्
अनाद्यनंते तव शरणम्
अति-रुचिरे सुचिरस्थिरकीर्ते परमोदारे तव शरणम्

अति-महनीये तव शरणम्
अति-रमणीये तव शरणम्
सुरवर-मुनिवर-नरवर-प्रत्यह-नमनीये हे तव शरणम्

विमले कमले तव शरणम्
नित्यानंदे तव शरणम्
शरणागतजन-अभयदायिनी तापहारिणी तव शरणम्

सुजले सुफले तव शरणम्
अजरे अमरे तव शरणम्
भक्तिज्ञानामृतलेविनि हे शांतरुपिणी तव शरणम्

तपस्विनी हे तव शरणम्
महायोगिनी तव शरणम्
भाग्याभाग्ये विजयापजये सततहासिनी तव शरणम्

प्रभुप्रिये! हे तव शरणम्
प्रभुपरिपाल्ये तव शरणम्
त्वत्पदकंजी रुंझी घालू मिलिंदसम अम्हि तव शरणम्।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
-त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टोबर १९३०

सुसंस्कृत कोण?

अन्यां करील जगती निज जो गुलाम
तो दुष्ट, संस्कृति न त्या शठ तो हराम
तो रानटी मज गमे न मनुष्य खास
जो मानवा करुन ठेवितसे स्व-दास।।

पापी कृतघ्न अतिदांभिक वित्तदेव
अन्यांस नित्य लुटणे कृति ही सदैव
ऐसे असून ‘अम्हि संस्कृत’ बोलतात
ना लाज ती जणु अणूहि तदंतरात।।

जातील तेथ करिती भयद स्मशान
अन्यांस नागवुनिया करितात दीन
जे कोणि या पशुंस संस्कृत नाव देती
त्यांना नसे लव विचार उदार चित्ती।।

अन्यांस जो तुडवितो पशू त्या गणावे
त्या व्याघ्र वा वृक म्हणा, नर ना म्हणावे
तो रानटी पतित, संस्कृति ती न त्याला
न स्थान यन्मनि असे लव बंधुतेला।।

ओतीत तोफ वरती फिरवी विमाने
माने तसा विहरतो मिरवे मदाने
ही संस्कृती जरि असे, वृकव्याघ्ररीस
त्यांना सुसंस्कृत म्हणा मनुजापरीस।।

स्वार्थांध नित्य बनुनी करिती लढाई
शस्त्रे पहा अमुचि! हीच सदा बढाई
रक्तार्थ जे तृषित चाटित ओठ नित्य
माझे सुसंस्कृत तया वदती न ओठ।।

जेथे असे विजय, जेथ असेल वित्त
तेथेच सुसंस्कृत असे, न असेच सत्य
मोठे यदीय मन, सर्व समान मानी
त्यालाच संस्कृति असे, नच ती विमानी।।

मानव्य ना अवगणी न कुणाहि जाची
जो काळजी निज करी करिही पराची
अन्यापदा बघुन धावत शीघ्र जाई
त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणा न दुजा कुणाही।।

कोणी न या जगि असो कधिही गुलाम
नांदो स्वतंत्र सगळे, मनि हाच काम
दीना साहाय्य करण्या निरपेक्ष धावे
त्याला ‘सुसंस्कृत’ विशेषण हे मिळावे।।

ज्याला समस्त जग हे अपुलेच वाटे
दु:खी कुणीहि बघुन स्वमनात दाटे
ज्यालास्वदेश सगळे निजबंधु सारे
त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणाल तरी खरे रे।।

पोळी तुपात भिजवील न आपुलीच
संसार जो करि न अन्य लुटून नीच
मोदे मरेल इतरां हसवावयाला
तुम्ही ‘सुसंस्कृत’ खरा म्हणणे तयाला।।

ना आढ्यता, सरलता मधुरा समीप
डोळे यदीय गमती अनुराग-दीप
कापट्य ना मनि, विनम्र विशुद्ध शील
त्याला ‘सुसंस्कृत’ अशी पदवी खुलेल।।

लावीत शोध म्हणुनी न सुधारलेला
ओतील तोफ म्हणुनी न सुधारलेला
ज्याचे उदार मन अंतर ते विशाल
त्याला ‘सुसंस्कृत’ असे म्हणणे खुशाल।।

जाईन मी मरुन, ना दुसरे मरोत
जाईन मी शिणुन ना दुसरे शिणोत
ऐसे म्हणे, हृदयि जो धरि दीनरंक
त्याला ‘सुसंस्कृत’ तुम्ही म्हणणे विशंक।।



कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१