भारतसेवा

प्रिय भारतभू-सेवा सतत करुन
जाईन सुखाने मरुन
जरि मातेचे कार्य न करितिल हात
तरि झणी झडुन जावोत
जरि मातेचे अश्रु न पुशितिल हात
तरि झणी गळुन जावोत
प्रिय बंधूंच्या उद्धृतिच्या कामात
हे हात सदा राबोत
हातांस एक आनंद
हातांस एकची छंद
तोडणे आइचे बंध
हे ध्येय करी करिता, तनु झिजवीन
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।

जोवरि बंधू पोटभरी ना खाती
ना वस्त्र तदंगावरी
जोवरि त्यांना स्वपरमत्त रडविती
शतमार्गांनी नागविती
जोवरि त्यांना ज्ञानकिरण ना मिळती
अंधारी खितपत पडती
तोवरि न झोप घेईन
अंतरी जळुन जाईन
सौख्यास दूर लोटीन
मी सुखावया झटेन बांधव दीन
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।

या शरिराचे जोडे, भारतमाते!
घालीन त्वत्पदी होते
या बुद्धीला त्वदर्थ मी श्रमवीन
सेवेत हृदय रमवीन
जरि देहाचे करुन, आइ! बलिदान
स्वातंत्र्य येइ धावून
तरि झुगारीन हा जीव
ही तुझीच, आई! ठेव
तव फुलो वदन-राजीव
मी घेत अशी, आइ! तुझिच गे आण
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।

मी प्राशिन गे मृत्युभयाचा घोट
होइन आइ! मी धीट
मी खाइन गे भेदभाव हे दुष्ट
होईन, आइ! गे पुष्ट
मग करण्याते, माते! तुजला मुक्त
सांडिन मी माझे रक्त
त्वच्चिंतन निशिदिन करिन
त्वत्सेवन निशिदिन करिन
सुखगिरिवर तुज चढवीन
मग भाग्याचे अश्रु चार ढाळून
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३२

जा रे पुढे व्हा रे पुढे!

झोपू नको झणि ऊठ रे
पाहे सभोती जे घडे
घनगर्जना उठते नभी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

रणभेरि शिंगे वाजती
ध्वनि काय ना कानी पडे?
पडलास मुर्दडापरी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ललनीहि सजल्या संगरा
नर केवि मागे तो दडे?
चल, ऊठ, जागृत सिंहसा
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ना मेष तू तर मानुष
बें बें करोनी ना रडे
निजकर्मशक्तिस ओळख
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

बांधून, मर्दा! कंबर
तू अंबरी वरती उडे
निजपंख-बल भुललास तू
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जावो खचोनी धीर ना
लंघावयाचे हे कडे
दे हात मर्दासी खुदा
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

हे दुर्ग दुर्गम दुष्पथ
तरि ते फिरोनी तू चढे
पडण्यात ना अपमान रे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

शतदा पडे तो रे चढे
बसुनी न काही ते घडे
पशु तो, न जो यत्ना करी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

पसरुन आ येती जरी
पथि संकटे तरि ना अडे
बलभीम हो तू मारुती
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

गिळि राक्षसी तरि ना डरे
ये पोट फाडुन ना रडे
मग हाक फोडी वीर तो
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

लाटा कितीही आदळो
शतचूर्ण त्या करिती कडे
गिरि ना खचे घन पाऊसे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जरी कष्ट-वृष्टी होइल
डोके करि मारापुढे
अभिमन्यु हो अभिराम तू
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

चैतन्य खेळो जीवनी
तू ना पडे जेवी मढे
हो स्फूर्ति मूर्त प्रज्वला
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कृतिपंथ तू अवलंबुनी
करि बंद हे वाक्बुडबुडे
वाणी पुरे करणी करी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

बाहु स्फुरो ना ओठ ते
तव पिळवटू दे आतडे
हा मृत्यु नाही गंमत
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ओठांवरील प्रेम ते
ज्वाळेपरी ना धडधडे
ना पेटवी ते अंतर
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ती तोंडदेखी आरती
ओवाळ ना तू यापुढे
स्वप्राण करि पंचारती
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

लागे दिव्याने रे दिवा
राखुंडि कामी ना पडे
तो देत जीवन, जो जिता
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

मोक्षामृताचे मंगल
आणी भरोनी रे घडे
पाजी तृषार्ता आइला
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

माते स्वहाते लेववी
स्वातंत्र्यलक्ष्मीचे चुडे
सत्पुत्रधर्मा आचर
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

बघ मोक्षनगरद्वार हे
दिसते पुढे उघडे फुडे
तो भीरु कातर जो नुठे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कर्माबुधीमधि घे बुडी
त्या मुक्तिमौक्तिक सापडे
पापी करंटा जो नुठे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

वरिते जयश्री त्या नरा
कमी निरंतर जो बुडे
ना कर्महीना वैभव
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

नरवीर-वृंद उठावती
निज कर्मतेचे चौघडे
हेएक गंभिर वाजती
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

शिर धूस टिप्पर घाईत
ना वाचवी निज कातडे
सेवेत मरतो तो जगे
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कुरवाळितो स्वप्राण जो
मेलाच तो जरि ना सडे
जो प्राण दे, तो ना मृत
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

काळा कुरोंडी ही तनू
जरि मातृकामी ती पडे
सोने तिचे होई तरी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ज्या स्फूर्ति ना तिळ अंतरी
ती काय जाळावी धुडे
जरि न स्फुल्लिंग, न जीवनी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

ठिणगी पडू दे जीवनी
वीरापरी व्हा रे खडे
रक्तध्वजा धरुनी करी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जरि मूठभर तरि ना भय
व्हा छातिचे ना बापुडे
व्हा सिंह व्हा नरपुंगव
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

खाऊ न केव्हाही कच
माघार शब्द न सापडे
कोशात बोला आमुच्या
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कर्मात आत्मा रंगवा
आत्मा जरी कर्मी जडे
स्वातंत्र्य तरि ते लाभते
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

सेवेत आत्मा ओतणे
मांगल्य-मोक्ष श्रीकडे
हा पंथ एकच जावया
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

स्वार्थी निखारा ठेवुनी
रमतो स्वकर्मी जो मुदे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

शिवते निराशा ज्यास ना
लोभाशि ज्याचे वाकडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

कर्मी अहोरात्र श्रमे
परि मान कीर्ति न आवडे
ते मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

न विलास घे, स्व-विकास घे
निंदादिके जो ना चिडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जे अंबरात उफाळती
ना लोळती शेणी किडे
ते मुक्त होती आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

सर्वत्र करि संचार जो
कोठेच काही ना नडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

करुनी महाकृतिही जया
अवडंबराचे वावडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

शिर घेउनी हातावरी
जो कर्मसमरी या लढे
करि माय अमरा तो निज
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

जरि व्हाल योद्धे संयमी
तरी मोक्षफळ हाता चढे
फाकेल भुवनी सु-प्रभा
जा रे पुढे व्हा रे पुढे।।

नवमंत्र घ्या तेजे नटा
व्हा सिद्ध सारे सौंगडे
चढवा स्वमाता वैभवी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

बलसागर भारत होवो!

बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो।।
बलसागर....।।

हे कंकण करि बांधियले
जनसेवे जीवन दिधले
देशार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मरायाला हो।।
बलसागर....।।

वैभवी देश चढवीन
स्वातंत्र्य त्यासि अर्पीन
हा तिमिर घोर संहरिन
या बंधु साहाय्याला हो।।
बलसागर....।।

हातात हात घेऊन
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो।।
बलसागर....।।

करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो।।
बलसागर....।।

या उठा करु हो शर्थ
संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो।।
बलसागर....।।

ही मुक्त माय होईल
वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल
तो सोन्याचा दिन येवो।।
बलसागर....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री

हा देश वैभवी न्यावा!

जगदीश दयाघन देवा
हा देश वैभवी न्यावा।।

तू सुंदर मंगलमूर्ती
पुरवावी मनीची आर्ती
हे दीन धरावे हाती
तू सकळ सिद्धिचा ठेवा।। हा देश....।।

बलदाता तू मतिदाता
तू गणपती ऐक्य-विधाता
भयहर्ता तू सुखकर्ता
आम्हांस समयि या पावा।। हा देश....।।

तू कलह सकळ हे मिटवी
तू प्रेम आम्हांला शिकवी
तूत्याग तपस्या शिकवी
जनमनि न तिमिर उरवावा।। हा देश....।।

करु देत माय निज मुक्त
उठु देत सर्व सत्पुत्र
ते सकल निज समर्पोत
हा लोभ सकळ हटवावा।। हा देश....।।

जरि होइल भारत मुक्त
तरि होइल जग सुखभरित
पावेल विषमता अस्त
आनंद जगी पिकवावा।। हा देश....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

भूषण जगताला!

भूषण जगताला होइल, भूषण जगताला
भारत मिळवुन श्रेष्ठ पदाला।। भूषण....।।

विद्या येतिल कलाहि येतिल
भारत जरि हा स्वतंत्र झाला।। भूषण....।।

शिकविल समता, स्नेह, सुजनता
देइल जगता शांतिसुखाला।। भूषण....।।

प्रेमाच्या स्वर्गास विनिर्मिल
पूजिल मग शुभ प्रभुपद-कमला।। भूषण....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

भारतजननी सुखखनि साजो

भारतजननी सुखखनि साजो
तद्विभवाने स्वर्गहि लाजो।। भारत....।।

स्वातंत्र्याची अमृतधारा
प्राशुन निशिदिन रुचिर विराजो।। भारत....।।

विद्यावैभववाङमयशास्त्रे
कलादिकांचा डंका वाजो।। भारत....।।

पावन मोहन सुंदर शोभून
नाम तिचे शुभ भुवनी गाजो।। भारत....।।

दिव्य शांतिची अमृत-सु-धारा
संतप्त जगा सतत पाजो।। भारत....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२९

हृदय जणु तुम्हां ते नसे!

हृदय जणु तुम्हां ते नसे।।
बंधु उपाशी लाखो तरिहि
सुचित विलास कसे।। हृदय....।।

परदेशी किति वस्तू घेता
बंधुस घास नसे।। हृदय....।।

बाबू गेनू जरि ते मरती
तरिही सुस्त कसे।। हृदय....।।

खादी साधी तीहि न घेता
असुन सुशिक्षितसे।। हृदय....।।

माणुसकी कशि तीळ ना उरली
बसता स्वस्थ कसे।। हृदय....।।

जगतामध्ये निज आईचे
हरहर होइ हसे।। हृदय....।।

कोट्यावधी तुम्हि पुत्र असोनी
माता रडत बसे।। हृदय....।।

देशभक्त ते हाका मारिति
त्यांचे बसत घसे।। हृदय....।।

स्वदेशिचे ते साधे अजुनी
तत्त्व न चित्ति ठसे।। हृदय....।।

बंधू खरा जो बंधुसाठी
प्राणहि फेकितसे।। हृदय....।।

पुत्र खरा जो मातेसाठी
सर्वहि होमितसे।। हृदय....।।

बंधू रडता आई मरता
कुणि का स्वस्थ बसे।। हृदय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, सप्टेंबर १९३१