भूपाळी

ती खिन्न भुपाळी
फिकट धुक्याचा घाट
वर संथ निळाइत
नारिंगाची वाट

ती कातर काळी
तमगर्भाची नगरी
तेजात वितळली ,
स्तंभ उभे जरतारी

अन सावट मंथर
कृष्ण घनांची छाया
ओवीत मिसळली
हंबरणारी माया

हा पिवळा शेला
आज तुझ्या अभिसारा
घे गंध फुलांचा
जशी उन्हाची मधुरा


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

दु:ख

घन जमतिल तेव्हा जमतिल
मोकळे केस तू सोड ;
परसात तुझ्या तरि काय .
निष्पर्ण सुरूचे खोड

पाऊसपाखरे जेव्हा
देशांतर करुनी येतिल ;
मग असे सुखाचे सजणे
मेंदूहुन रंगीत खोल…

आटल्या नदीच्या पात्री
हा उभा एकटा बगळा ;
घन करुणाघन होताना
वाळूचा भांग कपाळा …

मृगजळी ऊन स्वप्नांचे
हे कलते कलते पसरे ;
पेशीचे तोवर माझ्या
तू माळ वाळले गजरे …

घन जमतिल तेव्हा जमतिल
वार्‍याचे अलगुज खोटे ;
हे दु:ख मिठीचे तोवर
हाडांना घेऊन पेटे.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

प्रार्थना

उठा दयाघना लावा निरांजने
देहातले सोने काळे झाले
झोपेतले जीव झोपेतच मेले
आभाळचि गेले पंखापाशी
इथे नागव्याने शोधावा आचार
जैसा व्यभिचार जोगिणीचा
उष्टावली पोर हिंडे दारोदारी
तैसे माझे घरी नारायणा
पंढरीचे पेठे रात्र मोठी वाटे
दगडाला काटे फुटलेले
गोंजारून घे ना ! माझे हे लांछन
रक्ताला दूषण देण्यासाठी


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

वारा

जेह्वा अंधारून येतो
सारा अतृप्त पसारा ;
कुण्या अबंध जन्मांचा
पक्षी साठविती चारा ?

जागोजागी पडलेली
गंध नसलेली फुले ;
जसा विश्वात नसावा
तुझ्या दिठीला निवारा !

माझ्या मनापाशी भिंती
मागे ओढती कवाडे ;
जरा उचलता पाय
पुन्हा उसळतो वारा !


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

घोडे

धावती किती वेगाने
हे घोडे माझे वैरी
आवाज धरून लपलेले
आकाश जसे अंधारी
अंधार मुका असतो का?
हे कधीच कळले नाही
घोडयांच्या डोळ्यांमधुनी
रडणारे कोणी नाही …
तू सजुन धरावी हृदये
घोडयांचे कौतुक करता
की जळे पिपासा अवघी
ही घागर भरता भरता ?
वादळी अनावर राने
धावले जिथुन हे घोडे
तो प्रदेश टापांखाली
पसरुन वितळली हाडे …
धावती किती वेगाने
देहाची रचना प्याया
रचनेच्या खोल तळाशी
यांच्याच उतरल्या छाया


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

हिमगंध

नको मोजू माझ्या
मुक्तीची अंतरे ;
ब्रह्मांडांची दारे
               बंद झाली.
माझ्या आसवांना
फुटे हिमगंध,
मागे-पुढे बंध
              पापण्यांचे.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

बहार

पान पान सोडती सहिष्णु वृक्ष येथले
चक्र ओंजळीतले वर्तुळांत नादलें
ऐकतो कुठेतरी तमांत झांकली घरें
दिशादिशांत गात हा फकीर एकटा फिरे !
पहाड शब्द वेढती तसा सतंद्र गारवा
नि रक्तवाहिन्यांतुनी उडे सुसाट पारवा …

तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी...
वेदनेतली फुले नि चांदण्यातल्या सरी…
तुझेच अंग चंदनात अंतराळ ओढते
पुरात आणखी असे सजून ओल मागते…
दुक्ख लागता मला सभोवती जसेंजसें
दयार्द्र होउनी तसें क्षितीज दृष्टिला दिसे …


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता