हार तुरे तुला धीरा मी गुंफितें

हार तुरे तुला धीरा मी गुंफिते । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा धिरा धिरा तुझ्यावरी आधीं रंग शिंपितें ॥ध्रु०॥

होळिला तुम्ही घरीं असतां कधीं ? ॥ मी आपुल्या स्वहस्तें का निजमस्तकीं गुलाल फेकीन दयानिघी ।

रंग खेळणें होऊं द्या आधीं । मग हो सारे रात्र घेऊनि बसा मला तुम्ही रंगमहालामधीं ।

शरीर हें तुला आज वोपिंतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिल भरा धिरा० ॥१॥

दध्धराजभरा लई दिसा आला । होऊनि स्थीर धीर धरी, अधीर नका वस्त्र तरी नेसूं द्या मला ।

क्षणभरी उशीर लागला । ठीक ठाक चाकपाक झाक साबना उद्यां दिदार चांगला ।

वेणी मोकळी चापचोपिनें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥२॥

चाहते तुझ्यावर रंग टाकीन । त्या हातें फुलले तेल रेलचेल करुन आंग मर्दीन ।

भरभरु मुठी गुलाल फेंकीन । गोकुळीं जसा श्रीकृष्ण फाग खेळतो तसें तुम्हा मी लेखीन ।

तो हरी जसा त्या प्रीय गोपीतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा०॥३॥

बनून फाकडी राहिली उभी । रंग राग पाग खेळूनि तुफंग मार करितसे खुबी । खुप देखणी लहानशी छबी ।

चोळी तंग घे पचंग आंग संग करीं निसंग मग कोणा न भी । तुज मी आपल्या ह्रदयीं स्थापितें ।

छंद फंदी आनंदाचे कटिबंध ते प्रबंध यामुखें अलाफितें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥४॥


कवी- अनंत फंदी

तुज नाहींरे माझी काळजी

तुज नाहींरे माझी काळजी ॥ध्रु०॥

आपण तरि जीव द्यावा । नाहिं तरि शुद्ध हातामधिं घ्यावा विणा टाळ जी । तुज नाहींरे० ॥१॥

कोण मिळाली ठकणी । माझा रांवा उडविला गगनीं ।
केली राळ जी । झाली राळ जी । तुज नाहींरे० ॥२॥

कोण मिळाली विवशी । कोणीकडे नेला राजबनसी ।
पिटी भाळ जी । आपटी भाळ जी । तुज । नाहींरे ॥३॥

घरास आले फंदी । तेव्हां सुंदर चरणा वंदी ।
घाली माळ जी । सख्याला माळ जी । तुज नाहींरे० ॥४॥


कवी - अनंत फंदी

एका राजाला कन्या झाली

एका राजाला कन्या झाली तिच्या उरावर तीन थान । जाईल आंधळ्याची तिथें लाग लाविला कुबडयानं ॥ध्रु०॥

तेथोनाची वाईट झाली कोणी करिना मग तिजला । तिला एका आंधळ्याला देऊन आपल्याच गांवामधिं ठिवला ।

तिला एका कुबडयानं फितवलं रोज घरामधिं आणि त्याला । कवाड वाजतां आंधळा म्हणे घरामधि कोण आला ।

ती म्हणे कुत्रें आले घरामधिं बाहेर घालितें पिटून । अशी कुबडयाला रोज आणिती पुढें ऐका त्याचें कथन । एका० ॥१॥

एके दिवशीं कुबडा बोले तिथानिशीं ऐकतां । कोण येतो म्हून उगाच आंधळा । सारा वेळ लावितो कथा ।

हा मरतां म्हणजे बरें गडे होत । तुझा आपला संग बरा होता । कुबडयानें एक सर्प मारुन बाहेरुन आणला ताथा ।

तिथानीचे केला हवाला घाल याला रांधुनशेन । दे आंधळ्याला खाया म्हणजे जवळ आल याचें मरण । एका० ॥२॥

तेव्हां तो सर्प चिरुनशेन तवली ठेविली चुलीवर । आंधळ्याला शिजवाया बसविले कुबडा होई तिजवर स्वार ।

गतका आला तवलिला तेव्हां तो पाहे कानाच्या सुमार । जहराचा कडका जो बसला आंधळ्याचा नेत्रावर ।

जहराच्या कडक्यान डोळ्यांच्या टिकाच गेल्या उडून । पहा उलटयाच सुलटें झालें त्याला रक्षिता भगवान । एका० ॥३॥

डोळे उघडून पाहे आंधळा कुबढा आणि तीनथानी । कुबडा वरती खालीं दोहींच्या आंगाचें पाणी पाणी ।

जळत लांकूड घेऊन झणी आंधळा उठला तत्क्षणीं । कुबडयाला माराया चालला आंधळा आहे त्याचे मनीं ।

जळत लांकूड उचलून झणी त्यान घातलं कुडवण ।


कवी - अनंत फंदी

आषाढबन

इथलेच पाणी,
इथलाच घडा,
मातीमध्ये -
तुट्ला चुडा.

इथलीच कमळण,
इथलीच  टिंबे
पाण्यामध्ये -
फुटली बिंबे.

इथलेच उ:शाप,
इथलेच शाप,
माझ्यापशी -
वितळे पाप.

इथलीच उल्का,
आषाढ-बनात,
मावलतीची -
राधा उन्हांत.

दि. २३.१.५८, 

पाऊस

देवळाजवळचा ;
पाराजवळचा
पाऊस.
... देवळापलीकडचा
परापलीकडचा
पाऊस
सर्व ................................
......................................
........................................

पाऊस
रस्तोरस्ती
रस्त्याच्या पलीकडचा
पाऊस
रस्त्यात
सर्व काळोखात
वस्त्यात ....................................
...........................................
...........................................
आयुष्यात
गल्लीबोळात
जुनेरात
आठवणींच्या
पातळात
समईत ................................
........................................
पाऊस
डोळ्यांत
सर्व.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

भूपाळी

ती खिन्न भुपाळी
फिकट धुक्याचा घाट
वर संथ निळाइत
नारिंगाची वाट

ती कातर काळी
तमगर्भाची नगरी
तेजात वितळली ,
स्तंभ उभे जरतारी

अन सावट मंथर
कृष्ण घनांची छाया
ओवीत मिसळली
हंबरणारी माया

हा पिवळा शेला
आज तुझ्या अभिसारा
घे गंध फुलांचा
जशी उन्हाची मधुरा


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

दु:ख

घन जमतिल तेव्हा जमतिल
मोकळे केस तू सोड ;
परसात तुझ्या तरि काय .
निष्पर्ण सुरूचे खोड

पाऊसपाखरे जेव्हा
देशांतर करुनी येतिल ;
मग असे सुखाचे सजणे
मेंदूहुन रंगीत खोल…

आटल्या नदीच्या पात्री
हा उभा एकटा बगळा ;
घन करुणाघन होताना
वाळूचा भांग कपाळा …

मृगजळी ऊन स्वप्नांचे
हे कलते कलते पसरे ;
पेशीचे तोवर माझ्या
तू माळ वाळले गजरे …

घन जमतिल तेव्हा जमतिल
वार्‍याचे अलगुज खोटे ;
हे दु:ख मिठीचे तोवर
हाडांना घेऊन पेटे.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश