पानं

पानं फाटलेली: वार्‍याचे
सारे अतिप्रसंग सहन केलेली.

पानं भुईवर विखुरलेली : झाडानेच
अपरात्री घराबाहेर काढलेली.

पानं मूक, स्तब्ध : अतर्क्य उत्पातात
वाचा गमावून बसलेली.

पानं हीन-दीन : कुणावरही
सावली धरण्याची पुण्याई संपलेली.

पानं असहाय्य : सीतेसारखी शेवटी
मातीच्या गरीब आश्रयाला आलेली. . .


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

नास्तिक

माणसांचे संघटित क्रौर्य पाहून
त्याच्या डोळ्यांत पाणी आले;
त्यांच्या उथळ ज्ञानाने तो व्यथित झाला
आणि त्यांच्या मूर्ख श्रद्धांनी त्याला
खराखुरा दैवी मनस्ताप दिला…

मग, त्याने हृदयातील सारी कणवच
हृदयासह फुंकून टाकली एका
सतत जागणार्‍या मेंदूच्या मोबदल्यात; आणि
हातातील बुद्धिवादाचा दंडुका परजीत तो
आव्हान देत सुटला धर्मग्रंथातील
निर्दय ईश्वरी सत्तेला…

बंधुभाव शिकवणार्‍यांनीच
माणसामाणसांत उभारलेल्या भितींवर त्याने
मनसोक्त प्रहार केले आणि
आमचे ज्ञानचक्षू कायमचे मिटावेत म्हणून राबणार्‍या
शिक्षणव्यवस्थेवर तो दांडूका हाणत राहिला…

आत्मघातकी वेगाने जन्मणारी
गरीब देशांतील मुले पाहताना अचानक
सर्व मानवजातच एखाद्या अणुयुद्धात
संपवून टाकण्याची शक्यता त्याला दिसली
आणि एका कल्पित सुखाचे हासू त्याच्या गालांचे
स्नायू प्रसरण पाववून गेले.

मानवाचा निर्वंश तसा वाईट नाही हे
त्याने दंडुक्याशिवायही पटवून दिले असते;
प्रश्न परंतु पृथ्वीवरच्या
इतर समजूतदार, सुंदर प्राण्यांचाही होता -
खारी, मोर, ससे, वाघ, हरणे इत्यादी इत्यादी.

त्यांचा विचार करताना त्याची
दंडुक्याची पकड सैल झाली आणि
एका दयाळू अनिवार्यतेने
फक्त माणसांच्याच विनाशाची
नवीन शक्यता तो शोधू लागला….


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

परिपक्व झाडे

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत…


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

साधना

तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे….तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही…

कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही…


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

अनंताचे फूल

तुझ्या केसात
अनंताचे फूल आहे म्हणजे
तुझ्याही अंगणात अनंताचे
झाड आहे, ह्या जाणिवेने मी
मोहरुन जातो.
नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात
एक तरल संबंध रुजून
आलेला मी पाहतो...


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

प्रेमाचा गुलकंद

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित 'तिज'ला नियमाने!

कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!

गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!

प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!

कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!

या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगत करी मग मनातले बोल!

अशा तर्‍हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!

अखेर थकला! ढळली त्याचि प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!

धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, 'देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)

'बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तांचे काज?

गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?'

तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी'

असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!

म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!

कशास डोळे असे फिरविता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!'

क्षणैक दिसले तारांगण त्या,-परि शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!

'प्रेमापायी भरला' बोले, 'भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?'

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रदय थांबुनी कधीच नातरि तो असता 'खपला'!

तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
'प्रेमाचा गुलकंद' तयांनी चाटुनि हा बघणे!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

मोडीसाठी धाव

दे रे हरि, दोन आण्याची मोड!
मोडीसाठी भटकुन आले तळपायाला फोड ॥ध्रु०॥

काडि मिळेना, विडी मिळेना, इतर गोष्ट तर सोड!
मीठही नाही, पीठहि नाही, मिळे न काही गोड!

पै पैशाचे धंदे बसले, झाली कुतरेओढ!
'मोड नाही,' चे जेथे तेथे दुकानावरी बोर्ड!

ट्रँम गाडितहि मोड न म्हणुनी, करितो तंगडतोड!
कुणी 'कूपने' घेउनि काढी नोटांवरती तोड!

मोडीवाचुनि 'धर्म' थांबला, भिकार झाले रोड!
दिडकि कशी तुज देऊ देवा, प्रश्न पडे बिनतोड!

श्रीमंतांचे कोड पुरवुनी मोडिशि अमुची खोड!
पाड दयाळा, खुर्द्याची रे आता पाऊसझोड!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें