निद्रामग्न मुलीस !

सुमारे १२-१३ वर्षांच्या एका निजलेल्या मुलीस पाहून सुचलेले विचार

निद्रामग्र मुली! तुझें मुख अहा! हें रम्य आहे किती! –
तें साधेपण, नम्रता, मधुरता, शान्ती, तिथें शोभती !
कौमार्य नवयौवना न अजुनी थारा दिला वाटतें.
स्वर्गातील तरीच मुग्धतरता या त्वन्मुखीं राहतें !              १

कोणी येथ जरी मनुष्य नसतें, किंवा तुझा हा लय
ब्रह्मानंदनिमग्र-यास नसतें नासावयाचें भय,
तुझे कोमल हे कपोल – मधुनी जे भासतें हांसती,
होतों मी तर त्यांस वत्सलपणें चुम्बूनी बाले! कृती.           २

ऐसें मी म्हणतों म्हणूनि ठपका कोणी न ठेवो मला,
कांकी फारच ओढितें तव गडे ! कौमार्य मद्दुष्टिला !
यासाठींच तसें वदूनि चुकलों तूतें स्वसा मानुन,
पापेच्छेस शिवाय चोदक नसे देहीं तुझे यौवन.                 ३

हा जो मी कवितेंत गे द्रवुनियां गेलों तुला पाहतां,
याचें कारण फार भिन्नच असें ते सांगतो मी अतां:-
ताई गे! तव या अनिश्चित जगीं होईल कैशी दशा,
मी शोकाकुल होऊनी गढुनियां गेलों विचारीं अशा.            ४

थोड्याशां दिवसांमधेंच तव हें कौमार्य गे जाइल;
लज्जारोधितलोललोचन असें तारुण्य तें येइल;
त्यांची फुल्ल विलोकुनी विकसनें डोळे दिपूनी तव,
या लोकविषयीं विचार तुजला येतील कैसे नव?-            ५

‘नानाभोगनियुक्त गोड किती हा संसार आहे बरें ?
जन्मापासूनि कां न तो वितसिला आम्हांवरी ईश्वरे ?”
नानाक्लुप्ति अशा कदाचित तुझ्या चित्तांत त्या येतिल;
जातांना परि लौकिकानुभव तो तूं कायसा नेशिल ?         ६

ज्या ह्या आज अजाणतेपण असे गालीं तुझे शोभतें,
ही शोभा अथवा अजाणपण ज्या गालीं भलें दावितें,
त्य गालीं कटु जाणतेपण पुढें ओढील ना नांगर ! –
त्या तासांवर जाणतेपण तसें बैसेल ना भेसूर !              ७

ह्या तुझ्या मुधरे ! मुर्खी मधुरशा, त्या सर्वही भासती   
चेतोवृत्ति समप्रमाण, न दिसे भारी अशी कोणती;
कांहीका दिवशीं तुला जर गडे ! ठेलों पहाया जरा,
सद्ववृत्तींसह  या तुझा फिरुनि मी वाचीन का चेहरा ?          ८

राहो हें सगळें, अशी कुळकथा नाहीं मुळीं संपणें.
तूं माझी भगिनी ! म्हणून तुजला आशी असे अर्पणें :-
हे माझे भगिनी ! दिनानुदिन गे दु:खें अम्हां घेरिती,
त्यांतें हाणुनियां सुखें तुज सदा भेटोत ती राखितीं !        ९


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
डिसेंबर १८८९

आई! आई!

विद्यार्जनार्थ अपुल्या प्रिय जन्मदेला
आलास सोडुनि घरास जिवा ! पुण्याला;
‘आई ! म्हणून तिज साम्प्रत बाहतोसी,
ती उत्तरास तुज देइल येथ कैशी !                 १

ही हांक ती परिसती जननी जरी का,
धांवून येउनि तुला धरिती उरीं गा;
“बा बहिलें मज कशास निजेंत बाळा?
भ्यालासि रे!” म्हणुनि घेतिच चुम्बनाला !      २

“माझा पुता करित काय असेल आतां!
कोठें असेल निजला! हरि तूं पहाता !
तो काय हाय! इतुक्यांतचि दूर जावा !
नाहीं तयास अजुनी परवास ठावा!”               ३

माते! असें म्हणत तूं असशील, धांवा
पुत्रार्थ गे करित तू असशील देवा !
नेत्रांस अश्रुसर तो सुटला असेल !
पान्हा स्तनीं खचित गे फुटला असेल !          ४

आहे तुझा पहुडला सुत येथ माते,
निद्रा परी स्थिर न येत असे तयातें;
स्वप्नांत मारित असे तुज हांक ‘आई!’
कोणी परी अहह ! उत्तर देत नाही!                ५

खोलींत या सकल त्यास नवे पदार्थ,
त्याचेविशीं अलग हें दिसतात मठ्ठ;
बाहेर चन्द्र दुसराच निशेंत आहे,
हा आंत दीपहि उदासिन पेंगताहे !               ६


कवी - केशवसुत
वृत्त - वसंततिलका
६ नोव्हेंबर १८८९

कोठें जातोस?

“कुठें जाशी?” – शर्करा घ्यावयाला;
अमुक पंताला पुत्र असे झाला,
म्हणुनि आतां इष्टांस वांटण्यास
हवी आहे शर्करा बहू त्यास”                  १

“कुठें जाशी तूं?”- “फुलें आणण्यातें;
तमुक रावाच्या असे लग्न येथें,
वधुवरांला त्या गळां घालण्याला
करायाच्या आहेत तेथ माळा,”              २

“आणि कोठे तूं ?” – “नविन पसारा तो
संसृतीचा मांडीत आज आहें;
म्हणुनि बाजारा करायास जातों;-
घरीं जिवलग ती वाट बघत आहे !”        ३

“आणि तूं रे?” – “जातसें आणण्यासी
वैद्यबोवाला, अमुक वृद्ध यासी
वायु झालाहे!” – “जा ! परेतवस्त्रें
विकत घेउनि शोध तूं गोवर्‍या रे !”        ४

पुढुनि दिसतें मग मढें एक येतां.
“कुठें बाबा जातोस सांग आतां?” –
हवेंतुनि हे पडतात शब्द पाहीं
“कुठें जातों हें मला कळत नाही!”         ५


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

जाति - दिंडी
१२ जून १८८९

मुलांस झोडपणार्‍या एका पंतोजीस

कोणें मूर्खपणें गुरुपण तुला क्रूरा ! असे रे दिलें !
कां खाटीक न जाहलास? – तुजला तें शोभतें चांगलें !
या बाळांप्रत फार निर्दयपणें कां तूं असा मारिसी ?
केला रे अपराध काय असला यांनी ? – वदें रे मशीं.                १

पाहोनी प्रतिकार-अक्षम अशीं ही बालकें, यांवर
घ्यावें हातसुखा ! – तुझ्या गुरुपणा हा डाग मोठा तर !
हातांला तुझिया जरी खुमखुमी होती, तरी ते मुके
धोंडे आणिक वृक्ष काय नव्हते ? – तांडी तयांला सुखें !           २

यांचें न्यून असेल ( हें मज कळे) कांही स्वपाठान्तरीं,
काढायास परन्तु ते भरुनियां, ही रीति नोहे बरी.
केव्हां धाकहि, पारितोषिक कधीं, गोडीगुलाबी कधीं,
शिक्षा योग्य कधीं करुनि गुरु ते नांवास येती सुधी                 ३

कोंबायास घशांत मूठभर रे बाळांचिया मृत्तिका,
त्यांचा स्वर्ग समग्रही झडपितां चोपून त्यांला फुंका !
-हें केव्हां शिवतें तरी तुमचिया का रुक्ष रे अन्तरीं ?
कांपा ! मुग्ध मुलें समोर बघुनी, जेव्हां छडी घ्या करीं !          ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
- एप्रिल १८८९

जगामधी गा तुला कशाला परमेशं धाडिलें?

जगामधी गा तुला कशाला परमेशें धाडिलें ? –
कराया श्रम तुजला योजिलें ।। ध्रु ।।
मधुर माधवीकुंज आपुले विस्तृत करणे कधीं
देऊं नको सोडुनि गा तूं मधीं;
।। चाल ।। घाम उन्हाचा फार येइल बा तुला,
पण धीर धरीं, जों अस्तसमय पातला,
जों कालाच्या मंजुल घण्टाटंकारें सुचिवलें –
चला रे काम अतां संपलें.                                    १

देवें उटाणीं तुला चर्चिलीं काय म्हणुनि सांग की? –
झगडण्या, नच पडण्या मंचकी !
।।चाल।। स्फटिक ते धवल जेंवि शोभले,
अश्रु जे तेंवि तुवां ढाळिले
तुझ्या धाकल्या उद्यबन्धूंकरिता, देव भले
भुजालंकरणीं ते गोविले,                                    २

धैर्य आणि ती कार्यनिरतता दावुनि तूं आपुली,
बांधवी स्फूर्ति पसर चांगली;
तुझें बघुनि ते हृदयिं धीरता घेतिल मग लागली,
करीं ही धरितिल कृत्यें भलीं;
।।चाल।। मग-काय सांगणें ! द्वारें तुझिया तयां
देइल पुष्पही ईश्वर हरिकूनियां.
अल्प पुष्पही बिन्दु हिमाचे अपुल्या पेल्यांतले
वांटितें भावंडीं आपले!                                      ३


कवी - केशवसुत

जायाचें जग का असेंच?

“Doth then the world go thus, doth all thus move?” - W. Drummond

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

जायाचें जग का असेंच ? सगळें ऐसेंच का चालणें ?
ऐसा न्यायच का जगामधिं अम्हांलागीं सदा लाभणें ?
सर्वाला नियमीतसे दृढ असें ते हेंच का शासन ?
देवांनो ! असलेंच काय तुमचें सामर्थ्य द्या सांगुन ?            १

जे आत्मे अपनीतिच्या निबीड त्या धुंदीमुळें आंधळे
त्यांशीं अन्घ विधी सदैव करितो सख्यत्व कीं आपुलें;
ते कीं, आणिक हे सुनीति ! धरिती भक्ती तुझीयावरी
जाती लोटत वादळामधिं अहा ! ते जीर्ण पर्णांपरी !            २

सर्वांचा अवघ्या नियामक असे का हो कुठें ईश्वर ? –
तो आहे, मग सन्मनें हळळती दु:खामधें कां तर ?
नम्रत्वावरि हाय ! उद्धटपणा वर्चस्व कां तें करी ?
कां हो हाल तुटूनि हंत ! पडती निर्दोषितेच्यावरी ?            ३

(वृत्त-उपजाती)
बा धांव देवा ! तर ये त्वरेनें !
ही दुर्दशा थांबिव रे दयेनें;
वा, साधु आणीक असाधु यांचें
समप्रकर्षी युग आण साचें !


कवी - केशवसुत

कामान्धत्व

“ O me ! what eyes hath love put in may head” - Shakespeare

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

कामानें मजला अहो ! कुठुनि हे डोळे दिले कायसे ! –
वस्तूंची स्थिती ती खऱी न मजला योगें तयांच्या दिसे;
किंवा ते बघती खरें जर म्हणूं, कोठें पळाली मति?-
जी दे दोष मदीय नेत्रविषया, जाणूं कशी सत्य ती ?            १

खोटे नेत्र मदीय जें बघति तें आहे जरी सुन्दर,
तैसे तें न असे, म्हणोनि जग हे बोले बरें कां तर ?
ते नाहीं रमणीय हें जर खरें, आहे खरें हे तरी –
लोकांची नयनें तशीं न असती कामी जनाची खरी;            २

त्रस्तें जीं अवलोकनें, भरुनि जीं बाष्पांमुळें राहिलीं,
तथ्यालोकनदक्ष कामिनयनें व्हावींत तीं कोठलीं ?
माझ्या या नयनां दिसे न, म्हणुनी आश्चर्य नाहीं मुळीं,
आभ्राच्छादित तें बघूं न शकतो आदित्यही तो बळी.         ३

(वृत्त-इन्द्रवंशा)
व्यंगें प्रियेचीं बघतील, मोकळे
कामी जनाचे जर नेत्र राहिले,
म्हणूनि का आणुनि त्यांत आसवें,
ते धूर्त कामा ! करितोस आंधळे ?                              ४


कवी - केशवसुत
नोव्हेंबर १८८८