चिन्हीकरण अर्थात् भाव आणि मूर्ति यांचे लग्न

भूचक्राची घरघर जिथें ती न ये आयकाया,
आहे ध्यानाभिध रुचिर तो कुंज त्या शांत ठायां,
त्याचे द्वारीं उपवर वधू मूर्तिनाम्नी विराजे
तीचे संगें वर परम तो भावशर्माहि साजे !                १

होती पर्युत्सुक बहुत ती शीघ्र पाणिग्रहाला,
तेथें आत्मा भ्रमत कविचा तो उपाध्याय आला;
स्फूर्तिज्वालेवरि मग तयें होमुनी जीविताला,
लग्नाला त्या शुभकर अशा लाविता तो जहाला !       २

गेलें कुंजीं त्वरित मग तें जोडपें दैवशाली
केली त्यांहीं बहुविध सुखें त्या स्थलीं प्रेम-केली;
झालीं त्यांना बहुत मधुरें बालकें दिव्य फार,
तीं जाणा हीं-सुरस कविच्या क्लृप्ति तैसे विचार !       ३


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
वृत्त - मंदाक्रांता
करमणूक, १६ फेब्रुवारी १८९५

फुलांतले गुण

बांधावरि झुडुप एक,
पुष्प तयावरि सुरेख
पाहुनि, मी निजहृदयीं मुदित जाहलों,
त्याजवळि चाललों !                       १

जाउनियां, त्या सुमनीं
काय असे, हें स्वमनीं
मनन करित, उन्मन मी तेथ ठाकलों,
या पंक्ति बोललों !-                         २

पुष्पीं या सुन्दरता
फार असे, ती चिता
वेधुनि, संसारताप सारिते दुरी,
उल्लसित त्या करी !                      ३

पुष्पीं या प्रीति असे,
ती मीपण हाणितसे,
परविषयीं तन्मयता प्रेरिते उरीं,
ने द्दष्टि अन्तरीं !                           ४

मार्दवही यांत फार
कारण, निज मधुतुषार
ढाळितसे स्वलतेच्या पल्लवीं अहा !
तें द्रवतसे पहा !                           ५

सद्गगुणही यांत वसे,
कारण, कीं, तेज असे
तेथें, स्मित करित सदा आढळे पुढें,
त्या तम न आवडे !                       ६

जादूही यांत भरुनि
दिव्य असे, ती पसरुनि
निज धूपा वार्‍यावरि, दश दिशा भरी,
बेहोष कीं करी !                           ७

यापरि मी उन्मनींत
होतों आलाप घेत;
आणिक या फुलांमधीं काय हो असे ?
तें काय हो असे ?-                        ८

तों जवळुनि मधमाशी
आली गुणगुणत अशी
“गाणें तें फुलामधें आणखी असे !”
ती बोलली असें !                         ९

पेल्यामधिं पुष्पाच्या,
गुंगत ती त्यात वचा,
शिरली; त्या वचनाची सार्थता भली
तों व्यक्त जाहली !                        १०

गुणगुणली मधमाशी
“पुष्पीं गुण जे तुजसी
आढळले, तुजमध्ये कितिक त्यांतुनी ?-
बा, घेई पाहुनी !”                        ११


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति - उन्मती
मुंबई, ३१ मार्च १८९३

(खाणावळीतील) धृतधारा!

सुवर्णाची वल्लि प्रचलित जणूं काय गमते !
नभांतूनी भूमीवरति चपला वा उतरते !
पडे खालीं केव्हां त्वरित, नयनांला न दिसते !
नभीं वा पातालीं लपलि धृतधारा न कळते !                १


कवी - केशवसुत
वृत्त – शिखरिणी
करमणूक, ११ मार्च १८९३,

“माझे चित्त ठेवुनि घे”

( करमणुकीतला हितचिंतकाचा “माझें धाडुनि चित्त दे” हा चुटका वाचल्यावरुन)

“माझें धाडुनि चित्त दे” लिहुनि हें मी धाडिलें कां तुला ? –
पश्चात्ताप असा बळावुनि अतां जातीतसे गे मला !
तूं काहीं मजपासुनी हृदय हें मागूनि नेलें नसे;
गेलें तें तुजमागुनी तर तुझा अन्याय का हा असे ?              १

गेलें तें तुजमागुनी, सहृदये ! येऊं दिलें तूं तया,
हा तुझा उपकार मीं विसरुनी जावें न मानावया;
तें राहूनि दुरी, स्वकीय मजला देसी न तूं चित्त तें,
हा मानूनि विषाद, मी चुकुनियां गेलों भ्रमाच्या पथें !           २

चित्ताचा तव लाभ यास घडुनी येणार नाहीं जरी,
पायापासुनि तूझिया चळुनियां जाणार नाहीं तरी –
माझें चित्त दुरी; - असुनि पुरतें हें ठाउकें गे मला –
“माझें धाडुनि चित्त दे” म्हणुनि मीं कैसें लिहावें तुला ?        ३

झाली चुक खरी, परन्तु सदयें ! मातें क्षमा तूं करी,
मच्चित्तावरतीं यथेष्ट कर गे स्वामित्व तूं सुन्दरीं !
अव्हेरुनि मदीय चित्त परतें देऊं नको लावुन,
माझें ठेवुनि चित्त घे ! – मग जगीं धन्यत्व मी मानिन !      ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
मुंबई १ मार्च १८२१

मरणानंतर

If thou survive my well contented day - Shakespeare

मातें निर्दय अंतकें लवकरी नेऊन लोकांतरी
मागें सुंदरि ! राहलीस जर का तूं एकली भूवरी,
या तूं आपुलियि गतप्रियकर श्लोकांस साध्या तरी
वाचायास मला स्मरुन फिरुनी घेशील ना गे करीं ?

त्यातें घेउनियां सखे ! सरस त्या भावी कृतींशीं तुळीं,
ते त्या आणि जरी, तुळेंत ठरले नादान ऐसे मुळीं,
मत्प्रीतीकरितां तयां जप, न त्यां तत्सौष्ठवाकारणें,
जें तत्सौष्ठव पाडितील पुढले मोठे कवी ते उणें.

प्रेमें आण मनांत हें – “जर सखा माझा पुढें वांचता,
काव्यस्फूर्ति तदीत उन्नत अशी होती न का तत्त्वतां ?
या पद्मांहुनि फास सुन्दर : अशी पद्में अहा ! तो गुणी
प्रीतीप्रेरित होउनी विरचिता; वाटे असे मन्मनी.

“हा ! हा ! तो मजपासूनी परि यमें नेला असे कीं वरी !
आतांचे कवि हे वरिष्ठ गमती त्याच्याहुनी अन्तरी;
यांच्या पद्धतिला, म्हणूनि भुलुनी यांच्या कृती वाचितें,
त्याची वाचितसें परी स्मरुनि मी त्याचे अहा ! प्रीतितें!”


कवी - केशवसुत
वृत्त – शार्दूलविक्रीडित
- जानेवारी १८९२

पर्जन्याप्रत

ग्रीष्मानें तपली धऱा करपली ही काय कीं, वाटतें;
चारा व्यर्थ गुरें पहा हुडकती; नेत्रीं धुळी दाटतें;
छायेला जल तें असे जर कुठें, फेंसास त्या गाळित
त्या ठायीं जमती गुरें, पथिकही धापांस ते टाकित.               १

ऐशी होउनियां दशा दिवस ते झाले बहु, पावसा !
ये आतां तर तूं त्वरा करुनियां लंकेवरुनी असा.
तूझ्या आगमनार्थ दर्दूरपती वापीतळापासुनी
रात्रीचे निज कंठशोष करिती हांका तुला मारुनी.                 २

काकांही अपुलीं पहा घरकुलीं झाडावरी डाळिलीं,
दाण्यानें घऱटीं भरुनि चिमण्या यांहीं तशीं टाकिलीं;
तूं येणार म्हणूनियां वळचणींखाली गड्या ! सम्प्रती
पाकोळ्याहि ‘फडक् फडक्’ करित या वस्तीत धुंडाळिती.        ३

रात्रीच्या दिवट्याच ज्या तव अशा खद्योतिका या पुढें
झाल्या दाखल; पावसा ! विसमसी तूं सांग कोणीकडे?
रात्रीं त्या झुडुपांमधीं फिरकती जेव्हां तयांच्या तति,
उत्कण्ठा तुझियाविशीं अमुचिया चित्तामधें प्रेरिती.              ४

भेटायास तुला समुत्सुक अशा मुंग्या उडूं लागती,
पर्जन्या ! तर ये ! कृषीवल तुझ्या मार्गाप्रती ईक्षती;
झंझावातह्यावरी बसुनियां, या पश्चिमाब्धीवरी
लाटा झोडित, गर्जना करित ये, बा मेघराजा, तरी !            ५


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
जून १८९१

कवि (पाठान्तर)

जो संसारपथावरी पसरितो मस्तिष्कपुष्पें निजें,
आहे अद्भुत रम्य का अधिक तें त्याहून कांही दुजें ?
चाले तो धरणीवरी, तर पहा ! येथून तो जातसे
धूली लागुनि त्या सुवर्णमयता तेथील कीं येतसे !            १

तो गंभीर वदे रवा, तर मुक्या पृथ्वीस लक्ष श्रुती
होती प्राप्त नव्या, समुत्सुकतया ती ऐकते मागुती ;
दृष्टी तो फिरवी वरी, तर लवे आकाश तें खालती,
तारांचे गण गावयास वरुन स्तोत्रें अहा ! लागती !           २

एकान्तांत निकुंज जो विलसतो त्याचा, तयाच्यावरी
शाखा उत्तम आपुली सुरतरु विस्तारुनी तो धरी;
आश्चर्यें अमितें सलील निघती तेथून लोकाधिकें,
तीं घ्याया अवलोकुनी कळतसे त्रैलौक्यही कौतुकें !         ३

त्या कुंजीं निजवाद्य घेउनि जधीं तद्वादनीं तो गढे
नृत्यालागुनि ऋद्धिसिद्धि करिती सानन्द त्याचेपुढें !
उत्तान ध्वनि जे नितान्त घुमुती जाती तधीं अंबरीं
ते गन्धर्व अगर्व कीं परिसती आकाशयानीं वरी !            ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
मे १९१९