आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥


 -  संत चोखामेळा

 आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
 विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
 उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
 भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
 चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

  - संत सेनान्हावी
माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,
चुलातीले काकी म्हणता अंतर किती पडे,
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभाले निवारा,
सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा,

- बहिणाबाई चौधरी

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही,
हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही,
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही,
नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही,
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही,
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही,
जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही,
एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही,
जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही,
जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही,
ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही


 - बहिणाबाई चौधरी

"टणक ऊस"

स्थळ : पुणे,  वेळ दु. 1 ते 4 मधली..

एक पुण्याबाहेरील माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहिहि अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच. "टणक ऊस" ???

हे नाव का ठेवले असेल?

उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने बेल मारलीच.
एका म्हातार्याने पुणेरी चेहर्‍याने दरवाजा उघडला.

"काय्ये ?" म्हातारा खेकसला

"अहो ते... या बंगल्याचे नाव "टणक ऊस" का ठेवलय ?"

म्हातारा विस्कटलाच... "हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? भामटेगिरी आहे ही"

" साॅरी... पण आता झालीच आहे झोपमोड तर सांगा  ना "टणक ऊस" काय प्रकार आहे?"  चाचरत त्या  माणसाने विचारलं...

"निलाजरे आहात तुम्ही"

"ते झालंच पण "टणक ऊस"....

"अहोssss..." म्हातारा फिस्करला
"अक्षर जुनी झाली की तुटून पडतात..... सगळ्यांना माहिती आहे हे 'पाटणकर हाऊस' आहे....

🔶 दगड 🔶

शब्द एक तो 'दगड' रांगडा
परंतू त्याची रूपे पहा
वृत्ती, दृष्टी जैसी असते
अर्थ लाभतो त्यास महा

अ, आ, इ, ई लिहीण्यासाठी
'दगडा'ची ती पाटी असते
सरस्वती नाखूष ज्यावरी
त्याला जग हे 'दगड'च म्हणते

बालपणी जी केली चोरी
कैर्‍या पाडून दगडांनी
संसाराचा आरंभ होतो
तीन 'दगडां'च्या चुलीतूनी

ऐतिहासिक शिल्पे म्हणजे
दगडावरती कोरीव काम
सेतू बांधिला वानरांनी त्या
'दगड' घेऊनी मुखात राम

'दगडा'ची ती शिला होते
वास्तू बांधण्या आरंभ होतो
अशुभ वार्ता ऐकण्याआधी
हृदयावरती 'दगड ठेवतो

मैलाचा तो 'दगड'च असतो
आयुष्याचे वळण सांगण्या
'दगडा'ची ती भिंत बांधती
नात्यामधले वैर दावण्या

'दगड' घालूनी डोक्यामध्ये
कुणी कुणाचा जीवच घेतो
या 'दगडा'तूनी शिल्पकार तो
सुंदर, मोहक मूर्ती घडवतो

निर्धाराचा शब्द म्हणजे
काळ्या 'दगडा'वरची रेघ
संप, बंद आंदोलन म्हणजे
क्रूर, अमानुष 'दगड'फेक

'दगडा'तूनच जन्मां आले
पाटा-वरवंटा अन् जाते
पाथरवट निर्माते  परंतू
आज त्यांस ना कुणी पुसे

मूर्ख माणसां अर्थ सांगणे
'दगडा'वरती डोके फुटणे
विनाश घेता  ओढवून कधी
पायावरती 'दगड' पाडणे

ज्याचा त्याने विचार करणे
'दगड'घ्यावा हाती कशास
नावच अपुले राहील मागे
'दगडा'वरती कोरून खास.


- सौ.शुभांगी श्री. नाखे (अलिबाग)
कृपा उपजली जयराम स्वामीसी । आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥
देखोनी तयासी आनंद वाटला । कंठ कोंदटला आनंदाने ॥ २ ॥
मनेंचि आरती केला नमस्कार । पूजिला साचार मनामाजीं ॥ ३ ॥
बहिणी म्हणे त्याचे मनांतील हेत । ओळखे निश्चित पांडुरंगा ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई