विटाळ

काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥
विटाळी विटाळ चवदाही भुवनीं । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दु:खासी विटाळ । विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचे अंगी विटाळाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥

कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणासी विटाळ कशाचा जाहला। मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचाचा विटाळ येकचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपें आगळा विटेवरी ॥४॥

उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥
रडती पडती ते ही वेगें मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । अंती यम फांसा गळां पडे ॥४॥

नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥
मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥
सोवळ्यांचे ठाई सोंवळा आहे । वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा । तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥४॥

पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥


  -  संत चोखामेळा
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें ठाकें ॥१॥

साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्‍ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥

चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥


  -  संत चोखामेळा
धांव घाली विठू आता चालू नको मंद। बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला। शिव्या देती म्हणती महारा देव बाटविला ॥२॥

अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा। नकाजी मोकलू चक्रपाणि जिमेदारा ॥३॥

जोडुनिया कर चोखा विनवितो देवा। बोलिला उतरी परि राग नसावा ॥४॥


  -  संत चोखामेळा
सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥

संसार सुखाचा होईल निर्धार । नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥

कामक्रोधांचें न चलेचि कांही । आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥

आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि । म्हणतसे महारी चोखियाची ॥४ ॥


  -  संत चोखामेळा
सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥

तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥

संसारी आसक्‍त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥

चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥


   -  संत चोखामेळा
चोखा माझा जीव चोखा माझा भाव।
कुलधर्म देव चोखा माझा।।

काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति।
मोही आलो व्यक्ति तयासाठी।।

माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान।
तया कधी विघ्न पडो नदी।।

नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी।
घेत चक्रपाणी पितांबर।।


   -  संत नामदेव
श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट ।
उभा असे नीट विटेवर ॥१॥

कर दोनीं कटीं कुंडल झळकती ।
तेज हे फाकती दशदिशां ॥२॥

वैजयंती माळा चंदनाची उटी ।
टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥

चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु ।
पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥

    -  संत चोखामेळा