भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥

पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळी देवराया ॥२॥

कवणाची असा पाहूं कोणीकडे । जीविचें सांकडें वारीं देवा ॥३॥

गहिंवर नावरे चोखियाचे मनीं । धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥


  - संत चोखामेळा

 धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला । शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥

तुमचे दारीचा कुतरा नका मोकलूं दातारा । अहो चक्रपाणी तुम्ही आहां जीमेदारा ॥३॥

कर जोडोनी चोखा विनवितो देवा । बोलिलो उत्तर याचा राग नसावा ॥४॥


  - संत चोखामेळा

 श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥

तेणें समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥

उच्छिष्ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकाने ॥३॥

चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखें ॥४॥


  - संत चोखामेळा

 मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥

कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥

आणिक तो दुजा नाहीं अधिकार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥

चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढें दिसे ॥४॥


  - संत चोखामेळा

 सुखाचिया लागीं करितों । तो अवघेंचि वाव येतें ॥१॥

करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥

अवघेचि सांकडें दिसोनियां आलें । न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥

चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं । सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥


  - संत चोखामेळा

 माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥

न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥

न घडे देवार्चन संतांचें पूजन । मन समाधान कधीं नव्हे ॥३॥

नसतेचि छंद लागती अंगासी । तेणें कासावीस जीव होय ॥४॥

चोखा म्हणे याही चोरें नागविलों । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥


  - संत चोखामेळा

 यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥

आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥

उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे नारायण । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥


  - संत चोखामेळा