आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास ।

नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥

हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा । 

पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥

जन्म देई संताघरीं । उच्छिष्टाचा अधिकारी । 

आणिक दुजी थोरी । दारीं परवरी लोळेन ॥३॥

नका मोकलूं दातारा । विनंती माझी अवधारा । 

अहो रुक्मादेवीवरा । आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥


  - संत चोखामेळा

 आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥

वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥

अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥

चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें । माझें यांत उणें काय होतें ॥४॥


  - संत चोखामेळा

 धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥

कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हां ॥२॥

बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तों देवा ॥३॥

चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥


  - संत चोखामेळा

 कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥

मी तों कळवळोनी मारितसे हांक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥

बोलोनी उत्तरें करी समाधान । ऐवढेंचि दान मज द्यावें ॥३॥

चोखा म्हणे माझी पुरवावी आस । न करी उदास माझे माये ॥४॥


  - संत चोखामेळा

 जयांचियासाठीं जातो वनाप्रती । ते तों सांगाती येती बळें ॥१॥

जयांचियासाठीं टाकिला संसार । ते तों बलवत्तर पाठीं येती ॥२॥

जयाचिया भेणें घेतिलें कपाट । तो तेणें वाट निरोधिली ॥३॥

जयाचिया भेणें त्यागियेलें जग । तो तेणें उद्योग लावियेला ॥४॥

चोखा म्हणे नको होऊं परदेशी । चिंतीं विठोबासी ह्रदयामाजी ॥५॥


  - संत चोखामेळा

 अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी । 

आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया ॥१॥

हाचि मानिला निर्धार । आतां न करी वाउगा विचार । 

वायां काय बा करकर । धरोनी धीर बैसलों ॥२॥

धरणें घेऊनि तुमचे द्वारीं । बैसेन उगाच मी गा हरी । 

कांही न करीं भरोवरी । नाम हरी गाईन ॥३॥

तुमची लाज तुम्हांसी । आपुलिया थोरपणासी । 

ब्रीद बांधिलें चरणासी । तें चोख्यासी दाखवीं ॥४॥


  - संत चोखामेळा

 अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम । माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥

गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥

या परतें मागणें दुजें नाहीं आतां । पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥

चोखा म्हणे देवा होउनी उदार । ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥


  - संत चोखामेळा