मी आपले सारे सामान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे

 माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच –

 माझ्यापासून अलग होणे रुचले नसावे तिला कदाचित!

  खिडक्या बंद आहेत, दारांनाही कुलपे लागली आहेत

 तर मग ही स्वप्ने पुन्हा पुन्हा घरात कुठून येतात?

 झोपेतही एखादा झरोका खुलाच असतो वाटते?

 झुंबराला हलकेच स्पर्श करीत हवा वावरते घरात

 तेव्हा तुझ्या आवाजाचेच जणू ती शिंपण करत राहाते

 गुदगुल्या केल्या की तू अशीच खुदखुद हसायचीस ना!

 जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक

 माझी किंमत तर चेहऱ्यावरच लिहिलेली आहे

साधे पोस्टकार्डच आहे ना मी?

 अशी काही तुझी आठवण पेटून उठली की बस!

 जशी आगकाडी पेटवावी कुणी गडद काळोखात

 फुंकून टाक ती! नाही तर चटका बसेल बोटाला!

 डोळ्यांचे आरसे असे जागजागी तडकले आहेत

 की कुठलाच चेहरा आता पूर्णपणे दिसत नाही

 लोक तुकड्यातुकड्यातूनच भेटत आहेत तेव्हापासून!

 पूर्वी जंगलातून जायचो तर क्वचित माणसांची वस्तीही भेटायची

 आता वसतीत एखादे झाड दिसले तर भरुन येते हृदय...

 भिंतीवरचे सब्जांचे रोप बघताना आठवते, इथे पूर्वी जंगल होते!