आठवण

या व्याकुळ संध्यासमयीं 
शब्दांचा जीव वितळतो 
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें.... 
मी अपुले हात उजळतों.

तूं आठवणींतून माझ्या 
कधिं रंगित वाट पसरशी 
अंधार - व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं....

पदराला बांधुन स्वप्ने 
एकट संध्यासमयीं 
तुकयाच्या हातांमधला 
मी अभंग उचलुन घेईं...

तूं मला कुशीला घ्यावें
अंधार हळू ढवळावा.....
संन्यस्त सुखाच्या कांठीं
वळिवाचा पाऊस यावा.....

स्वप्न

शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न 
लपवून ठेवण्याचा.
पांडुरंगाच्या चरणाला प्रक्षाळण करणारी 
चंद्रभागा मी पाहिली नाहीं, आत्मसंवादाची
हीच प्रचीति आली माऊलीच्या उरावर 
पाय ठेवतांना.
शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
प्राणांचें मोल देऊन मुक्ति विकत घेत
असतों मी ; देहूच्या बाजारांत अभंग 
विकणाऱ्या तुकारामाप्रमाणें - शापच आहे 
मला संगमरवरांत स्वप्न लपवून ठेवण्याचा. 
चाहुलवेड्या वाटुलीच्या प्रतीक्षेत चरणगंधाच्या 
स्मृतीचें फूल उमलतांना पाहिलें नाहीं मी, 
वाचली नाहीं सांद्र तमगारांत काजव्यानें
रचलेली प्रकाशगाथा ; पण फुटलेल्या
डोळ्यांच्या नीरांजनांत तुला ओवाळणारी शिळा
पाहिली आहे रे....
शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.

छंद

निर्वाण पिणारी रात
नदीचे घाट
पुरातन झिजले
वटवृक्ष भूमिची
कूस घेउनी निजले.

पायांत अडकले पाय
जशी की माय
गर्भगांधारी
रोखिला कुणीं गे
छंद असा लयकारी.

फाटतो तिळानें पाश
घनिल आकाश
तुला वरकरणी
मातीची घागर
फुटतां जैसें पाणी....

हांक

धुकें अतुट दाटले नसुन आसवांचा लळा 
उरीं फुटुन पेटते गहन गारव्याची झळा 
दिशा धरुन वांकले सगुण वृक्ष दुःखांतले 
दिसे इथुन दूरचा क्षितिज - दीप मंदावला. 
नदी वळत चालली व्यथित पावलांच्या परी 
कधीं मधुन उष्णशी लहर उन्मळे बावरी 
नको नयन पाजळूं सजल हांक देऊं नको 
मला प्रहर लागला ढळुनि चंद्र मेघांतला. 
कुठे कळस ठेवुं मी, हळद-वेंचलीं हीं उन्हें ? 
पडे दगड आडवा अधिक आंधळी लोचनें 
अशा भरुन ओंजळी कुठुन सांडती हीं फुलें ? 
घुमे मरणगंध हा हृदयपूर्ण देहांतला !

शिल्प

फुलें मावळून गेलीं आहेत 
जसे सूर्य मावळतात.....
मरणगंधांतून वाहणारी सतारीच्या 
चाकाची देवळें....
आणि या विलक्षण नादाचा एक प्रारंभ, 
एक युग, जशी चांदण्यांत सरकणारी 
स्तनांच्या कोटींतील शिल्पे...... 
डोळे भरून वाहणारा काळोख, जसे 
सूर्य मावळतात.
पुढें, पुढें हलूं लागतात पाऱ्याच्या 
अर्कांतील बदामी डोळे आणि मीच
सामावूं लागतों माझ्या
मनांतील अंधारांत, खोल वितळणाऱ्या 
गुहेसारखा.....

शिलालेख

विराट उग्र गंधांनीं माखलेले
फुलांचे जंगली प्रदेश.
सुगंधानें निर्गुण झालेला जिथून
उतरतो शेवटचा संधिप्रकाश.... 
धुक्यानें विसरलेल्या दिशांत ; क्षितिजाच्या 
एका अतूट दिशेला विश्व-मंदाराची झाडें.... 
बकुळीसारख्या सूक्ष्म नक्षींचा मेणा ; 
माझ्यांतील अंधाराला कापीत जातो आहे, 
जेथे बांधिले आहेत ईश्वरानें माझ्या 
सर्वांगांचे स्पर्श-काहूर शिलालेख.

संभ्रम

ग्रीक पुराणांतील एकांतवासी श्रद्धांसारखी, 
मस्तकाच्या धुळींत रथाची चाकें रुतलीं आहेत. 
शिशिरांतील विझत्या वाऱ्याच्या प्रतिमा,
अंतःकरणावर धूर उजळत आहेत ; भूतकाळाच्या 
तंद्रीत विसावलेल्या एखाद्या प्राचीन शहरासारख्या.... 
शेवटच्या बहरांत पारिजाताला यावीत 
अर्धनग्न संभाराचीं कांहीं फुलें...तसेंच एखादें 
झाड डुलतां-डुलतां करुणेच्या दिगंतपार लयींत 
विलीन व्हावें ! माझ्या हातांना तळवे नाहींत आणि 
तुझ्या पायांना वाटा नाहीत...
क्षितिजाच्या कडेकडेनें उगवणारा एकेक तारा 
अंधाराच्या संभ्रमांत गळून पडतो; वैकुंठाच्या
दाराशीं निजलेल्या कैवल्यपूर्ण अस्तित्वांच्या
रांगाच जशा...