शहीद

कृषीप्रधान शब्दापासून, व्हा आता सावधान
शेतीसाठी लवकरच, होणार हाये प्रावधान
शेतकऱ्यां साठी खूप, सवलती येनार हाय
मरासाठी विष, सरकार आनून देणार हाय
विहिरीत जीव द्याचा, इचार करा पक्का
सरकारच मांगून देईन, तुमाले धक्का
जळून मरासाठी, रॉकेल डब्बी सकट
गयफास घ्यासाठी, दोरी घरपोच फुकट
हासू नका, तोंड करू नका हेकडं
सरकारच देईन पाहा, जायासाठी लाकडं
पोस्टमार्टम कराची, झंझट राह्यनार नाही
प्रेताले तुमच्या कापून कोणी पाह्यनार नाही
जीव देनं तुमचं, हराममौत ठरनार नाही
थो कायचा शेतकरी जो आत्महत्या करणार नाही
अन्तयात्रेचा खर्च, सरकार करन सोता
तेरवीसाठी कुटुंबाले, तांदूय एक पोता
प्रेताले सलामी, मंत्री वाह्यतीन पुष्पचक्र
भाषणात सांगतीन, हाना दाबून वखरं
सोनं नानं इका, घर ठेवा गहान
शेती पिकवा बनवा, मेरा भारत महान
लेकराईले शिकवू नका, शेतीतच दाबा
देशाच्या भविष्यासाठी,राब राब राबा
जवानासारखी, किसानाची जय करा
वावरातल्या धुर्र्याचा, हिमालय करा
शेती नाही पिकली तं, आत्महत्या कराची
सैनिकासारखी संधी, देशासाठी मराची
शहीद झाले म्हनून, गौरव तुमचा करू
पुढं चाला गानं म्हनत, जगू कींवा मारू
-डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा