तेरवी

चार वर्षापासून, शेती पार बुडाली
अवंदाबी चिमणी, अभायात उडाली
दरवर्षी कर्ज, फेडता झाली घान
मिरचीच्या रोपाची लुली पडली मान
कोहळ्याच्या येलाले, दिसत न्हाई कयी
अतिरेक्यावानी पडली, पह्याटीवर अयी
जवारी तं पह्यले, उकरीनंच पाडली
उरली सुरली मुरयीनं, जमिनीत गाडली
मुंगावर चिकटा पडला, तुरीले मूयकिडा
कडू लागते आता मिठ्या पानाचा ईडा
पानीबी मंधातच, देऊन राह्यला झाकोले,
निसर्गबी वरून मारून राह्यला टोले
धुर्र्यावर नाही गवत, दिसत नाही चार
बैलं कुठं चारावं, कुठचा कापावं भारा
कर्जाची होयी अशी, धीरे धीरे पेटते
पेराले मांगतलं,तं सोंगतांनी भेटते
सरकार गुतलं, सत्ता खुर्चीच्या तालात,
वावटयच पुरी घुसली, त्याहिच्या पालात
म्हून म्हणतो पंजाब,भविष्य बरं नाही
तेरवीची सोय कर, बुढीचं खरं नाही
...........डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा