आवाज हुंदक्यांचा

आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !
ओथंब आठवांचा डोळ्यात दाटलेला !!

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी..
रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला !!

बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा...
होता सुगंध श्वासा- श्वासात माळलेला !!

तो तीळ जीवघेणा खांदयावरी सख्याच्या...
मग चंद्र पौर्णिमेचा फ़िकाच वाटलेला !!

भाळावरी सख्याच्या सजतात घर्मबिंदू...
पडता मिठी खुलावा शृंगार राखलेला !!

गालांवरी उमटली होती पहाट लाली
प्राजक्त देठ तेव्हा भाळून लाजलेला !!

कल्लोळ भावनांचा जाणेल रातराणी
भावार्थ मौनतेचा ओठात आटलेला !!

- सुप्रिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा