हृदयाची मशाल

हृदयाची मशाल केली...घनदाट किती तम आहे!
डोक्यावर मुळात माझ्या जगण्याची जोखम आहे!!

बेरीज, वजाबाक्यांची आकडेमोड ना केली.....
उरल्यासुरल्या श्वासांची मजपाशी रक्कम आहे!

टोळधाड पडते मजवर त्या अंबट शौकीनांची!
त्यांची न चूक काहीही....मी जात्या कोकम आहे!!

काळीज काढुनी माझे ठेवतो समोरी त्यांच्या....
बोलणे- वागणे ज्यांचे माझ्याशी मोघम आहे!

प्रत्येक मैफिलीमध्ये भरतोच रंग हा माझा!
मी आसपासही नाही, पण, माझा घमघम आहे!!

मज श्वास तरी घेवू दे....मग विचार तू काहीही!
वय उतार झालेला अन् थकलेला मी दम आहे!!

हातांची उशी,नभाचे पांघरूण करतो आम्ही!
अंथरण्यासाठी अवघ्या धरणीचे जाजम आहे!!


गझलकार - प्रा.सतीश देवपूरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा