संध्येंतील चोवीस नामांवर

अनंत भगवंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥धृ०॥

केशवकरणी अघटित लीला नारायण तो कसा । जयाचा सकल जनावर ठसा ।

माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाचे रसा । पीत जा देह होइल थंडसा ।

विष्णु स्मरतां विकल्प जाती मधुसुदनानें कसा । काढिला मंथन समयीं जसा ।

वेष घरुनि कापटय मोहिनी भाग करि निमेनिम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगबंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥१॥


त्रिविक्रमान त्रिताप हरिले भक्तीचे सर्वही । वामनें दान घेतली मही ।

श्रीधरसत्ता असंख्य हरिती दुष्‍टांचे गर्वही । वंदिल्या ह्रुषिकेशाच्या रही ।

पद्मनाभ धरियेले तेथुनि देव झाले ब्रम्हही । दामोदरें चोरिलें दहीं ।

गाती मुनिजन नारद तुंबर वसिष्‍ठादि गौतम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंतांची नामें ॥२॥

संकर्षण स्मरतांना षड्रिपु नाशातें पावती । स्मरारे वासुदेवाप्रती ।

प्रद्युम्नाचा करितां धावा गजेंद्र मोक्षागती अनिरुद्ध न वर्णवे स्तुती ।

क्षीरसारगरिंचें निधान पुरुषोत्तम हा लक्ष्मीपती । स्मरारे अधोक्षजातें प्रती ।

अपार पापें स्मरतां जाती वाचे पुरुषोत्तम । गाइल्या उद्धरती अधम । अनंत भगवंताचीं ० ॥३॥

प्रल्हादाचे साठीं नरहरि स्तंभी जो प्रगटला । अच्युतें कालनाथ मर्दिंला ।

जनार्दनाची अघटित लीला कीर्तनीं ऐकूं चला । उपेंद्रा शरण जाई तो भला ।

हरिहर स्मरता त्रिबार वाचादोष सर्व हरियला । गोकुळीं कृष्णनाथ देखिला ।

रामलक्ष्मण म्हणे तयाच्या नामें गेला भवभ्रम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंताचीं नामें त्यांतुनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥अ० ॥४॥


कवी - अनंत फंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा