महेश्वर शहरावर

नाहीं पाहिलें पारखें महेश्वर क्षेत्रपुर ॥धृ०॥

नर्मदा निकट तट घाट । बहुत अफाट । पायर्‍या दाट । चिरे वाट । मुक्तीचीं शिवालयें ।

कैलास साम्यता नानापरिची रचना रचिली । रामकृष्ण मंदिर । बहुत सुंदरें । बांधिलीं घरें ।

रमे रमणूक हवेल्या । नयनीं पाहिल्या । नूतन थाट । प्रताप अहिल्या । किल्यावर तळवटी ।

शहर गुलजार । बहुत बाजार हारज । दुकानें लक्षापति सावकार ।

भारी भारी माल खजीना रस्ता खस्ता सुकाळ नाहीं दुष्काळ बाल वृद्ध प्रतिपाल करीती ।

गरिब गुरिब कंगाल गांजले । अडले भिडले । त्या देखुनियां अन्नछत्र सरी सारखे ।

नाहिं पाहिलें नयानें पारखे । महेश्वर क्षेत्र पूर ॥१॥

दानधर्म करी नित्य शिवार्चन । सत्वशील ऐकुनी धांवती । देशोदेशींचे कर्नाटक । तैलंग द्रावीड ।

वर्‍हाड कर्‍हाड । कोल्हापूर, कृष्णातीर, गंगातीर । कोंकण काशीकर ।

गयावळ, माळवे बिरांगडे येती कावडे, वेडे बागडे । गुजराथी मैथुलीपुरी । भारती दिगंबर जटाधारी ।

बैरागी योगी कानफाडे दर्शना येती । हरिदासाचे प्रेमळ भक्त सांप्रदाय पुष्कळ पाहिले नयनीं । सर्व महेश्वर क्षेत्रपूर ॥२॥


कवी - अनंत फंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा