मिसळ - एक रसग्रहण एक अमृतानुभव ( आणि काही उपयोगी टीप्स )

मिसळ खाणे हा एक आनंद सोहळा असतो.

मिसळ हा खरं तर गरीबापासून श्रीमंतांपर्यन्तचा राजमान्य राजश्री बेत. अश्या या मिसळीचा स्वाद घेण्याचे एक शास्त्र आहे.

म्हणजे बघा, उत्तमात-उत्तम मिसळ कुठे मिळेल याची आधी माहिती काढावी. मनात आलं म्हणून कुठेही जावून मिसळ हादडली याला काहीच अर्थ नाही.

मिसळ खायला जाण्याच्या आधी त्या मिसळीचा इतिहास, बनवण्याचं  तंत्र, मिसळीतले घटक पदार्थ, यांचा अभ्यास करावा.

उगाच चिचूंद्रया वाटीत, पातळ बेचव रस्सा देणाऱ्या मिसळीच्या दुकानात पाऊलही ठेवू नये.

अश्या निवडलेल्या मिसळीच्या ठिकाणी शक्यतो कमी गर्दीच्या वेळी पोहोचावे.

चांगली उजेडाची आणि हवेशीर जागा बघुन आपली बैठक मारावी आणि मिसळ ऑर्डर करावी.

काही ठिकाणी मिसळ ऑर्डर केली की आधी कांदा आणि लिंबू याची प्लेट आणून देतात.

काही मुर्ख लगेच त्यातील कांदा तोंडात टाकतात, लिंबु चाखुन बघतात. असं कधीही करु नये.

हे म्हणजे वाग्दत पत्नीला भेटण्यासाठी गेलेलं असतांना, तिच्याच धाकट्या बहिणीवर नजर टाकण्याइतकं आचरटपणाचं आहे.

हे असले पदार्थ मिसळ खाण्याआधी तोंडात टाकून तुम्ही जिभेचा स्वाद ही बिघडवून टाकता.

तर, मिसळ समोर येवु द्यावी. मिसळ शक्यतो आडव्या मोठ्या डिश मध्ये असावी. उगाच छटाकभर गोलाकार डिश मध्ये अजिबात असू नये.

समोर उजव्या बाजूला कमीत कमी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा असावा. त्यात कोथिंबीर असणं क्रमप्राप्त आहे. नसेल, तर सरळ निषेध नोंदवा. कांद्या बरोबर लिंबाच्या फोडी असाव्यात.

डाव्या बाजूला गरमागरम, चमचमित रश्याचं भांडं असावं.

त्यातील लाल-पिवळा, काळसर तर्रीबाज रश्याचा वास नाकाच्या रंध्रा रंध्रात सामावून घेत जीभेला आवाहन करावे. नुसत्या त्या वासाने जिभेत उत्साह सळसळला पाहिजे.

सर्व मांडामांडी झाली की लगेच भसकन मिसळ खायला सुरुवात करू नये.

प्रथम मिसळी मध्ये काय काय आहे याचा अंदाज घ्यावा. ती व्यवस्थित मिसळून घ्यावी. मस्त मिसळून झाली कि त्यातील रस्सा शेव, पापडी, शेंगदाणे इत्यादी पदार्थात शोषला जातो. मिसळ थोडी घट्टही होते.

मग रस्सा चमच्याने व्यवस्थित घुसळून त्यातील उसळीचा भाग या मिश्रणावर नीट पसरवावा. मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे.

त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी.

सर्वात शेवटी, चवी पुरते लिंबू पिळावे. उगाच समोर आहे म्हणून भरमसाठ लिंबू पिळून मिसळीचा स्वाद बिघडू नये.

आता पाव. तो मऊ, लुसलूशित ताजातवाना असावा. कडक झालेला, सुरकुतलेला, काळे ठिपके असलेला पाव लगेच धुत्कारुन लावावा.

पावाची डिश डाव्या बाजूला ठेवावी. आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी.

पावचा छोटा टुकड़ा तोडून तो मिसळ मध्ये बुडवून तोंडात टाकावा, आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा जिभेवर अभिषेक करावा. पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात!

हळूहळू, स्वाद घेत घेत खावे. मधुनच कच्चा कांदा चवी पुरता खावा.

खातांना घाई करु नये. तसंच खात असतांना ऑफिसचं काम, साहेबाचा विक्षिप्त स्वभाव, राजकारण असल्या क्षुद्र गोष्टींची चर्चाही करु नये.

मिसळ खाणं हे एक योगसाधन आहे.

प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये. तो मिसळीचा विनयभंग असतो.

पावामुळे डिश मधले रस्स्याचे प्रमाण कमी होते. मग थोडे खाणे थांबवावे. पुन्हा रस्साचे भांडे समोर आणावे. ते गरम नसेल तर दूसरे आणायला सांगावे. मग पुन्हा तो गरमागरम रस्सा आपल्या मिसळीत टाकून, मिसळून घ्यावा.

हा रस्सा भांडयातून मिसळीवर टाकतांना त्याचे दोन चार थेंब तुमच्या कपड्यावर उडालेच पाहिजेत. नाहीतर तुम्ही मिसळीशी एकरूप झालाच नाही असा अर्थ होतो.

पुन्हा कांदा, लिंबू याचे सोपस्कर करावे. आणि पुन्हा खायला सुरुवात करावी.

आणि असे कमीत कमी दोन ते तीन वेळा करावे.

जास्तीत जास्त दोन पावात मिसळ खावी. आपला उद्देश मिसळ खाणे हा आहे, पाव खाणे नाही. त्यामुळे पाव कमी, मिसळ जास्त असू द्यावी. तरच मिसळीचा मान राखला जातो.

नुसतंच पोट भरेपर्यंत खाऊ नये. आत्मा संतुष्ट होईपर्यंत खावं.

खातांना डाएटींग, ब्लड शुगर, कोलेसटेरॉल असले चिंताजनक विचार डोक्यात आणू नयेत.

खाऊन झालं कि रिकाम्या डिश मध्ये एक मोठा चमचाभर रस्सा ओतून घ्यावा. चमच्या चमच्याने तो रस्सा ग्रहण करावा.

तुमच्या नाकातून, डोळ्यातून पाणी आलं आणि कपाळावर घामाचे दवबिंदु जमले कि मिसळ सुखरूप पोहोचली हे ओळखावं!

आता तुम्ही हात धुवायला मोकळे!

ज्या कोणा अन्नपुर्णेने ही मिसळ बनवली तिचे आभार मानावे, तिला दीर्घायुष्य चिंतावं.

समोरचा चहा घेण्याआधी जरा हाताचा वास घ्यावा.

मिसळ अजूनही आपल्या बोटांवर रेंगाळत असते, पुन्हा येण्याचं वचन मागत असते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा