पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा