दोन धृवावर दोघे आपण

दोन धृवावर दोघे आपण
तूं तिकडे अन मी इकडे
वार्‍यावरती जशी चुकावी
दोन पाखरे दोहिकडे !!धृ!!

दिवस मनाला वैरि भासतो
तरा मोजित रात गुजरतो
युगसम वाटे घडीघडी ही
कालगती का बंद पडे  !!१!!

वसंतासवे धरा नाचते
तांडव भीषण मज ते गमते
गजबजलेल्या जगांत जगतो
जीवन एकलकोंडे  !!२!!

निःश्वसिते तव सांगायाला
पश्चिम वारा बिलगे मजला
शीतल कोमल तुझ्या करांचा
सर्वांगी जणु स्पर्श घडे  !!३!!

स्मृति-पंखांनीभिरभिर फिरते
प्रीतपाखरू तुझ्याच भवती
मुक्या मनाचे दुःख सागरा
सांग गर्जुनी तू तिकडे  !!४!!

तोच असे मी घर हे तेही
तोच सखी संसार असेही
तुझ्यावाचुनी शून्य पसारा
प्राण तिथे अन देह इकडे  !!५!!


कवि - एम. जी. पाटकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा