देऊ किती आवाज आता..!

मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येइना अंदाज आता..!

हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!

यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!

प्रेम जे मुदलात होते, माफ केले
राहिले पण आठवांचे व्याज आता..!

पाहता तुज छाटले बाहूच दिसले.
ताज, मी पाहू कुठे मुमताज आता..!

– अभिजीत दाते

'चंद्र' डागाळलेला बरा

विषय हा टाळलेला बरा,
अन्य हाताळलेला बरा ॥

आठवांच्या फुलांतील 'तो'
मोगरा जाळलेला बरा ॥

हट्ट का उत्तराचा उगा?
प्रश्न रेंगाळलेला बरा ॥

विश्व खोटे जरी भोवती,
शब्द मी पाळलेला बरा ॥

लावु दे पेच त्यांनाच, मी
दोर गुंडाळलेला बरा ॥

हौस ना थांबण्याची मला,
पाय भेगाळलेला बरा ॥

मिरव 'सौभाग्य' तू आपुले,
'चंद्र' डागाळलेला बरा ॥

- चैतन्य दीक्षित

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...

पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं..

मौसम... (नज्म)

 मौसम हा आशिकाना, पाउस दाटलेला
 माझ्या उरी ढगांनी, संसार थाटलेला...
 बेधुंद होत तुही, म्हटले सूरेल गाणे
 तुझिया स्वरांत भिजण्या, पाउस थांबलेला...
 मौसम हा आशिकाना...

 ओठांत गीत होते, डोईवरी सरी या
 मल्हार सांडला होता, दोन्हीच अंतरी या
 कळलेच ना कधी ते, हातात हात आला
 क्षण तोच सांगण्याला, पाउस लांबलेला...
 मौसम हा आशिकाना...

 ओलावल्यात येथे, भिंती अता मनाच्या
 भांबावल्यात आणि, जाणिवा इथे तनाच्या
 प्रत्येक पावलाशी, जणू ओल पावसाची
 ओलावल्या उराशी, पाउस साठलेला...
 मौसम हा आशिकाना...

 हातात हात आहे अन साथ ही युगाची
 पाउस साक्ष आहे अन बात ही सुखाची
जेव्हा मला दिलेली, तू वचने सखे गुलाबी
 तेव्हा हवाहवासा, पाउस वाटलेला...

 मौसम हा आशिकाना...

कवी - महेश घाटपांडे

अबोल तुझ्या शब्दातले

अबोल तुझ्या शब्दातले
 बोल तो बोलून गेला
 निरागस तुझ्या डोळ्यातली
  आसवे तो पुसून गेला

 तरंगत्या प्रेमाचे भाव मनी
 उमटवूनी तो निघून गेला
 ओठांवरचे नाजूक काहीतरी
 नकळत तो खूलवून गेला

 कोपर्‍यात हृदयाच्या
 प्रेमाचा हिंदोळा तो झुलवून गेला
 दरवळ सुगंधी फुलांचा तुझ्यात
 पसरवूनी तो निघून गेला

 दडवूनी आस प्रेमाचि खर्‍या
 मैत्रीत तो जगून गेला
 सतत तुझी काळजी करणारा
 तो स्वतःच्याच काळजीत निघून गेला

 आयुष्यभर चित्र काढणारा तो चित्रकार
 अखेर तुझ्यासाठी तो कविता बनवून गेला
 असतानाही प्रेम तुझ्यावर मनापासून
 मैत्री तुटेल म्हणून प्रेमाचे हे गुपित तो कायमचा घेऊन गेला............

मला शाळेत न्या ना

मला शाळेत न्या ना
बाबा, मी आता मोठा झालो
किलबिल वर्गातून बालवाडीत गेलो
माझ्या इवल्या पाठीवर नवीन दप्तर द्या ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

तुमची जुनीच स्कूटर परत नव्याने हसतेय
पाव्हणं नवीन आहे म्हणून अलगद धक्के सोसतेय
शाळेत नेताना मला पुढयात घ्या ना 
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

मी शाळेत पुन्हा एकदा 'नमस्ते बाssssई' म्हणीन
मधल्या सुटीत रोज मुरांबा पोळी खाईन
माझं 'ध्यान' पाहून तुम्ही खुदकन हसा ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

ते खेळण्यांच दुकान अजूनही तिथेच आहे
तिथले काका तसेच हसरे आणी प्रेमळ आहेत
मी धावेन तिकडे, मला उचलून घ्या ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना      

घरचा अभ्यास मी अजूनही नाहीच केलाय
शाबासकी म्हणून आईने धम्मकलाडू ही दिलाय
ससा कासवाची कविता परत माझ्यासाठी गा ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

रिमझिम आठवणीत सरलेत दिनरात्र
मुर्दाड बनलोय मी अन थकलीयेत तुमची गात्र
ते आधारचं बोट पुन्हा हातात द्या ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

कवी
मकरंद केतकर

रडू नकोस उगीच

रडू नकोस  उगीच
चांगले नाही ते  जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….


आभाळं  भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..


अजूनही  जातो त्याच  बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….


झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….


माहीत  नाही पुन्हा  कधी भेटु
वेगळ्या  रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..


विषय  शोधावे लागतील  आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील   का गं
पुन्हा एकत्र असताना…………………


शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग  तु
सोडुनच जायचे असताना……………


सोन्यासारखा  संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….