मला शाळेत न्या ना

मला शाळेत न्या ना
बाबा, मी आता मोठा झालो
किलबिल वर्गातून बालवाडीत गेलो
माझ्या इवल्या पाठीवर नवीन दप्तर द्या ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

तुमची जुनीच स्कूटर परत नव्याने हसतेय
पाव्हणं नवीन आहे म्हणून अलगद धक्के सोसतेय
शाळेत नेताना मला पुढयात घ्या ना 
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

मी शाळेत पुन्हा एकदा 'नमस्ते बाssssई' म्हणीन
मधल्या सुटीत रोज मुरांबा पोळी खाईन
माझं 'ध्यान' पाहून तुम्ही खुदकन हसा ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

ते खेळण्यांच दुकान अजूनही तिथेच आहे
तिथले काका तसेच हसरे आणी प्रेमळ आहेत
मी धावेन तिकडे, मला उचलून घ्या ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना      

घरचा अभ्यास मी अजूनही नाहीच केलाय
शाबासकी म्हणून आईने धम्मकलाडू ही दिलाय
ससा कासवाची कविता परत माझ्यासाठी गा ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

रिमझिम आठवणीत सरलेत दिनरात्र
मुर्दाड बनलोय मी अन थकलीयेत तुमची गात्र
ते आधारचं बोट पुन्हा हातात द्या ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

कवी
मकरंद केतकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा