रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा

या साजी-या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा


गीत     -     सुधीर मोघे
संगीत     -     पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर     -     महेंद्र कपूर
चित्रपट     -     हा खेळ सावल्यांचा (१९७६)

सुंदर तरुणी दिसल्यावर

कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही
तशी बायको सोबत माझी होती तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन
तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

नकळत जे ओठांवर आले, कसे आवरू?
चुकून मी पत्नीस म्हणालो 'पहा पाखरू'
तिला पाखरू म्हटलो ते म्हटलोच आणि मी
'तिच्यापुढे तू अगदीच गोगलगाय' म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तिला पाहुनी जरी बायको 'अहा' म्हणाली
चला घरी मग तुम्हा दावते, पहा म्हणाली
घडायचे जे घरात, डोळ्यासमोर आले…
(दिसेल माझे नशीब दुसरे काय? म्हणालो!)
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

हाय ऐकुनी तरुणी तर ती हसून गेली
मला पाहण्या पत्नी कंबर कसून गेली!
धावत मी पत्नीच्या मागे जाता जाता…
परिणामांना मी डरतो की काय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

जरी तिला बोलांचा माझ्या तिटकाराही
मला आवडे तिचा असा हा फणकाराही
चिडल्यावरती नेहमीच ती सुंदर दिसते!
म्हणून तर भलत्या तरुणीला हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

ती

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं ..

तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं..

तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..

तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..

तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..

तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..

तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं..

तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं..

जहर खाऊ नका..!


घोर मनाला लाऊ नका..
पाठ जगाला दावू नका..
तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा..
जहर खावू नका..!


आली लग्नाला लाडाची ताई..
हुंड्यावाचून जमेना काही..
असे लाचार होवू नका..
टोपी गहाण ठेवू नका..
ताई तयार आहे लढायला बाबा ..
जहर खाऊ नका..!

कर्ज घेवून दिवाळी आली..
वार यंदाही नापिकी झाली..
नवे कपडे घेवू नका..
काही खायाला देवू नका..
पाणी पिवून दिवाळी करू ना बाबा..
जहर खावू नका..!

आहे साथीला सोन्याची शेती..
घाम गाळून पिकवू मोती
तीर्थ यात्रेला जावू नका,,
चुना खिशाला लावू नका..
आमच्या रुपात देवाला बघा ना बाबा..
जहर खावू नका..!!

... स्पर्श तुझा ...


पाहणे तुझे म्हणजे आभास चांदण्याचा,
स्पर्श तुझा बेधुंदी जीव घेतो माझा..

तुझे हासणे गं फुले मालतीची,


घायाळ करते मजला अदा ही खुणेची... 

हात तुझा हाती घेता विसर जगाचा पडतो,
मिठीत तुझ्या गं सखये, मी सांजवेळी बुडतो... 

फारच जुलमी तुझे, नितळ निळे डोळे,
पाहुन होई वेडे, मन हे माझे भोळे... 
तूच कविता माझी, श्वास जीवनाचा,
पाहणे तुझे म्हणजे आभास चांदण्याचा.....

सोपे प्रश्न

अमेरिकेतील एका शाळेत पहिलीच्या वर्गासाठी इंटरव्ह्यू सुरू होता.
टीचर : बाळा तुझे नाव?
मुलगा : जॉर्ज
टीचर : आणि तुझ्या बाबांचे?
आई (ओरडून) : प्लीज त्याला सोपे प्रश्न विचारा!..

जायचे नाही

कुठल्याच जुन्या धाग्याला उसवून जायचे नाही
मज वसंत आल्यावरही बहरून जायचे नाही

का विपर्यास झाला या माझ्या साध्या स्पर्शाचा
की तूच ठरवले होते समजून जायचे नाही

जर इतका त्रागा होतो तुजला माझ्या शब्दाचा
तू नजरेमधुनी गझला सुचवून जायचे नाही

तव गंध लांघुनी येतो श्वासांच्या अगणित भिंती
त्यालाही बहुधा मजला चुकवून जायचे नाही

ती दरी गोठली आता दोघांमधल्या नात्याची
तू नाव धुक्यावर माझे गिरवून जायचे नाही

मी निवर्तल्याचे तिकडे इतक्यात नका हो कळवू
मज जळता जळता कोणा भिजवून जायचे नाही

वाटल्यास ठेवा काटे, स्वप्नांच्या फुटक्या काचा
माझ्या थडग्यास फुलांनी सजवून जायचे नाही

- अभिजीत दाते