जायचे नाही

कुठल्याच जुन्या धाग्याला उसवून जायचे नाही
मज वसंत आल्यावरही बहरून जायचे नाही

का विपर्यास झाला या माझ्या साध्या स्पर्शाचा
की तूच ठरवले होते समजून जायचे नाही

जर इतका त्रागा होतो तुजला माझ्या शब्दाचा
तू नजरेमधुनी गझला सुचवून जायचे नाही

तव गंध लांघुनी येतो श्वासांच्या अगणित भिंती
त्यालाही बहुधा मजला चुकवून जायचे नाही

ती दरी गोठली आता दोघांमधल्या नात्याची
तू नाव धुक्यावर माझे गिरवून जायचे नाही

मी निवर्तल्याचे तिकडे इतक्यात नका हो कळवू
मज जळता जळता कोणा भिजवून जायचे नाही

वाटल्यास ठेवा काटे, स्वप्नांच्या फुटक्या काचा
माझ्या थडग्यास फुलांनी सजवून जायचे नाही

- अभिजीत दाते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा