होता वसंत, होता सुमनात वास बाकी

होता वसंत, होता सुमनात वास बाकी
कोणीच भृंग नव्हता पण आसपास बाकी

येईल परतुनी ती, अद्याप आस बाकी
उरलेत मात्र आता थोडेच श्वास बाकी

का वागलो असा मी? का वागली तशी ती?
हातात फक्त आहे करणे कयास बाकी

ओठांवरी स्मिताची उमटेल खास रेषा
आहे परंतु थोडे होणे उदास बाकी

सुटलेत प्रश्न काही अन्‌ सोडलेत काही
उरला तिचा नि माझा एकच समास बाकी

धुंडाळ नीट माझ्या पश्चात काव्य माझे
असतील काळजाचे अवशेष खास बाकी

अद्याप दूर आहे क्षितिजावरील वस्ती
अद्याप माणसाचा आहे प्रवास बाकी

म्हणुनीच बांधलेली आहेत देवळे की
आहे सहा रिपुंचा हृदयात वास बाकी

होईल नाव मोठे मेल्यावरी तुझेही
आहे मिलिंद सध्या अज्ञातवास बाकी


कवी - मिलिंद फणसे

होता खमंग, होता चकणाहि खास बाकी

 होता खमंग, होता चकणाहि खास बाकी
सारेच टुन्न होती पण आसपास बाकी

जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी
उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी

मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही
हातात फक्त काजू करणे खलास बाकी!

फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही
उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी

धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा
अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी

ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा
सांगू तिला कसे मी? करणे कयास बाकी

अद्याप दूर आहे घरचीच वाट माझ्या
अद्याप मारतो हा तोंडास 'वास' बाकी

म्हणुनीच बांधली का 'देशी दुकान धारा'
पिउनी विलायती ही होणेच लास बाकी

आहेच नाव खोटे, मेल्या तरी तुझेही
'रंगा' तुझाच आहे अज्ञातवास बाकी

चतुरंग

काळ्या मातीमधी पिकलंया सोनं

काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||धृ||

औंदाच्याला बरसला बरसला पानी
मातीचा सुवास आला गर्द हिरव्या रानी
पळापळी करतात खोंडं माजेल ओलं वारं पिऊन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||१||

विहीरीच्या पान्यामंदी चाले मोटर तासंतास
पाटामधून पानी जाई खालच्या शेतास
वखरणी करतात बैलं वैरण खावून
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||२||

डोईवर पदर हिरवी साडी लेवून
कारभारणी येईल आता न्याहारी घेवून
घाम गाळून कामं करतो हाती येवूदे धन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||३||

शेतकरी बळीराजा झाला पोरगा धरतीला
अन्नधान्य पिकवून देई आधार देशाला
कणगीत धान्य भरू दे देवा नको काढाया ऋण
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)

आतल्या खोलीत खोलीत

काळ्या मातीत मातीत चे विडंबन!!


आतल्या खोलीत खोलीत, टोळके बसते…
टोळके बसते… नि बसून यथेच्छ ढोसते!
कोणी बाटली काढतो, नि टोळके लाळ गाळते
लाळ गाळते… नि बसून यथेच्छ ढोसते!

गाडी झाडाशी लावून, धावून येतात काहीजण…
कसेबसे हो जमतात, बायकांची नजर चुकवून
एक अनोखे चैतन्य साऱ्यांच्या डोळ्यात दिसते…
डोळ्यात दिसते… नि बसून यथेच्छ ढोसते!
हे बबन्या रं, माझ्या दोस्ता रं, माझ्या पक्या रं माझ्या आहाSSSS… टिडिंग टिंग… टिडिंग टिंग…

बांगडा गरम करून, प्लेट लावतो बबन…
सिगरेटी फुकता फुकता, तिथे डोकावतो कोण
बबन्या गाऊन दाखवतो, नि टोळके कौतूक ऐकते…
कौतूक ऐकते… नि बसून यथेच्छ ढोसते!
हे बबन्या रं, माझ्या दोस्ता रं, माझ्या पक्या रं माझ्या आहाSSSS… टिडिंग टिंग… टिडिंग टिंग…
आतल्या खोलीत खोलीत, टोळके बसते…
टोळके बसते… नि बसून यथेच्छ ढोसते! टोळके बसते… टोळके बसते…

काळ्या पिशवीत पिशवीत

काळ्या मातीत मातीत चे विडंबन!

काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते
बॉटल हालते बॉटल हालते

बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो
घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो

घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला
जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला
तरतरी मना येते मती न्हाती धूती होते
रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते
भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते
दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो

दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या

पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया
तिथे उधार चालेना नगद लागते
अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन
तिथ डोलकर हालती जनू करती भजन
जवा रंगीत पान्यात सोन चांदी लकाकते
सोन चांदी लकाकते आस जिवाला लागते

चाले पानी-चकन्याचा पाठशिवनीचा खेळ
खुर्ची बूडाला लागेना झाला कसला हा गोंधळ
काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो
डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो
काटा लागतो जिवाला स्वप्न पान्यात सांडत
स्वप्न पान्यात सांडत दुकान अन्नाच चालत

`दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास

 १. तिथी
         आश्विन शुद्ध दशमी

२. व्युत्पत्ती आणि अर्थ
         दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

३. समानार्थी शब्द
अ. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.

आ. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला 'नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस' असेही मानतात.'

४. इतिहास
अ. 'श्रीरामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णांचा वर्षाव केला. कौत्साने केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजनांनी नेले.'

आ. 'प्रभु श्रीराम याच दिवशी रावण वधाकरिता निघाला होता. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या घटनांच्या संकेतामुळे या दिवसाला 'विजयादशमी' असे नाव मिळाले आहे.


इ. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तो याच दिवशी.

ई. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.

उ. प्रारंभी दसरा सण एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.

५. महत्त्व
         दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.

६. सण साजरा करण्याची पद्धत
         या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

अ. सीमोल्लंघन
         अपराण्हकाली (तिसर्‍या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात.

आ. शमीपूजन
         पुढील श्लोकांनी शमीची प्रार्थना करतात.

 अर्थ : शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी श्रीरामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, श्रीरामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.

इ. आपट्याचे पूजन
          आपट्याची पूजा करायची असल्यास पुढील मंत्र म्हणतात -
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

इ १. आपट्याची पाने सोने म्हणून देणे
         शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.

ई. अपराजितापूजन
         ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.

उ. शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन

          या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे आणि उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.
उ १. राजविधान
         दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.

७. लौकिक प्रथा
         काही घराण्यांतले नवरात्र (देवी) नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते.

कृषीविषयक लोकोत्सव
            `दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्‍त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा
             दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. . दसर्‍याला श्रीराम व हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्‍ती निर्माण होऊन श्रीरामाचे आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास मदत होते. दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्‍तीरूपी) व तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्‍ती जागृत होण्यास मदत होऊन जिवाच्या नेतृत्वगुणामध्ये वाढ होते.


आपट्याच्या पानांचे महत्त्व


आपट्याचे पान
     'दश-हरा' म्हणजे वाईटाचा अंत…….अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी नवरात्रीनंतर येणारा हा दहावा दिवस………याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून याला 'विजयादशमी' असेही म्हणतात.
         दसर्‍याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देण्याची प्रथा आहे. आपट्याच्या पानांचे महत्त्व येथे देत आहोत.
अ. सर्व जिवांत प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी या दिवशी सर्व जीव एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानात ईश्‍वरी तत्त्व  आकर्षून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात शिवतत्त्वही जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे त्या दिवशी जिवाला आपोआप शिवाचीही शक्‍ती मिळते.
आ. आपट्याच्या पानात श्रीरामतत्त्व १० टक्के प्रमाणात असते.




संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ 'सण, धार्मिक उत्सव आणि व्रते'
साभार - बालसंस्कार डॉट कॉम

हरवलेले दिवस

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा,
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,

नशिबानेच एकदा पुन्हा कुठे तरी भेटू,
आठवणीला एकदा एकत्र मिळून वेचू,

पण तेव्हा सर्व काही बदलेला असेल,
कोणीतरी बोलावताय म्हणून भेट लवकर सुटेल,

लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा-गोष्टी राहणार नाहीत,
आठवणीचा हा झ्हारा मग त्या दिशेने वाहणार नाही,

आज सोबत आहोत वाटेल तितका आनंदी जागून घ्या,
जीवन भर पुरतील अश्या आठवणी जपून घ्या..