होता वसंत, होता सुमनात वास बाकी

होता वसंत, होता सुमनात वास बाकी
कोणीच भृंग नव्हता पण आसपास बाकी

येईल परतुनी ती, अद्याप आस बाकी
उरलेत मात्र आता थोडेच श्वास बाकी

का वागलो असा मी? का वागली तशी ती?
हातात फक्त आहे करणे कयास बाकी

ओठांवरी स्मिताची उमटेल खास रेषा
आहे परंतु थोडे होणे उदास बाकी

सुटलेत प्रश्न काही अन्‌ सोडलेत काही
उरला तिचा नि माझा एकच समास बाकी

धुंडाळ नीट माझ्या पश्चात काव्य माझे
असतील काळजाचे अवशेष खास बाकी

अद्याप दूर आहे क्षितिजावरील वस्ती
अद्याप माणसाचा आहे प्रवास बाकी

म्हणुनीच बांधलेली आहेत देवळे की
आहे सहा रिपुंचा हृदयात वास बाकी

होईल नाव मोठे मेल्यावरी तुझेही
आहे मिलिंद सध्या अज्ञातवास बाकी


कवी - मिलिंद फणसे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा