डोळे

तिची सोनियाची काया..
तिचं लाजाळूच झाड..
याचे आतुरले डोळे..
तिची खुलेना कवाडं !

तिच्या देहाला कुंपण..
याचे देहभर डोळे..
तिच्या श्रावणाच्यासाठी..
याच्या देहाचे उन्हाळे..!

जीव नदीकाठी त्याचा..
तहानला सोडू नये..
तिच्या धारेला जगाने..
उगा फाटे फोडू नये !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

मी गाणे म्हणू का?

एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर प्रवचन ऐकण्यास जात असे, पण 'सू..' आली की, तो जोरजोरात ओरडायचा. त्यामुळे इतर लोक त्या बाईंवर रागवत असत.

एकदिवस त्या बाईने मुलास युक्ती सांगितली. की तुला 'सू..' आली की तू मला म्हण 'आई मी गाणे म्हणू का?' दुसर्‍या दिवशी त्याने तसे केले. लोक म्हणाले, बाई इथे प्रवचन सुरू आहे, त्याला बाहेर घेऊन जा.

एकदा तो मुलगा आपल्या बाबांबरोबर परगावी गेला. रात्री सर्व लोक झोपले आणि मुलास 'सू..' आली. तो वडिलांना म्हणाला, बाबा.. बाबा.. मी गाणे म्हणू का?

वडील म्हणाले, अरे सगळे लोक झोपले आहेत. तुला म्हणायचे असेल तर माझ्या कानात म्हण...मुलाने त्यांच्या काणात काय केले असेल हे तुम्हाला आता सांगण्याची आवशक्यता आहे काय?

चांदणे अंथरू..

चांदणे अंथरू..चांदणे पांघरू..
देह माझा तुझा..चांदण्याने भरू !

आज दोघामधे ही हवाही नको..
बांध दोघातले दूर सारे करू !

पाहू दे, वेचू दे हा अजिंठा तुझा..
शोधता शोधता..तू नको थरथरू !

धबधब्याला कशी झेलते ही दरी..
कोसळू कोसळू अन पुन्हा सावरू !

दूर फेकून दे सर्व पाने फुले..
श्वास आता जरा रोखुनीया धरू !

ठेव राखुनिया सर्व खाणाखुणा..
निर्मितीचे उद्याच्या पुरावे ठरू !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

यक्षरात्र

पाण्यासारखेच, वाहते सदाचे
आयुष्य नावाचे, खुळे गाणे

किनारे धरुन, अखंड चालला
दुःखांचा काफिला, मस्तपणे

सुखाचेही तळ, जाताना घासून
अस्तित्वाची खूण, कळे मला

दिव्यापरी आता, प्राक्तन जोडून
प्रवाही सोडून, श्‍वास दिला

आणि रंगगर्द, क्षितिज पेटले
रात्री उजाडले, क्षणमात्र

तमाने टाकली प्रकाशाची कात
झाली काळजात, यक्षरात्र !


कवियत्री - अरुणा ढेरे

लेणी

समोर, धुकं पांघरुन,
कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड
रोज पहातो माझ्याकडे रोखून,
आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस ?
आपणच उत्तर देतो, हो विसरणारच.
मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड !
असं सगळं विसरता येत असतं,
तर तुझी ही भाषा कळली असती का मला ?
अन हे भोळं मन भळभळलं असतं का असं
वेळीअवेळी ? तुझ्या शेजारीच लेणी आहेत की !
मग तुला कसं कळत नाही वेड्या !
की माणसाच्याही मनात
काही सुंदर लेणी असतात म्हणून !


कवियत्री - पद्मा गोळे

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून.
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा आळता लावलेली तुझी पावले.
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता.

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न कण
प्रेमाच्या चेहर्‍यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो !


कवियत्री - अरुणा ढेरे

खंत नाही,खेद नाही ....

नजरेतून श्वासात,
श्वासातून हृदयात,
हृदयातून स्पंदनात,
स्पंदनातून नसानसात
उतरलीस तू तरी तुला
खंत नाही,खेद नाही ....

तुझं गोड गोड बोलणं ,
पद्धतशीर विसरणं,
आशेला तडा देणं ,
हृदयास घायाळ करणं,
जशी तू त्या गावचीच नाही,
खंत नाही,खेद नाही ....

डोळ्यांनी तुला पहावं,
कानांनी तुला ऐकावं,
ओठांनी तुज गुणगुणावं,
मनाने विरघळून जावं
तुला याचा गंधच नाही,
खंत नाही,खेद नाही ....


कवी - अरविंद