एकटा

एकटी स्वप्न माझी ,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा.

ओळखिच्या माणसांना

समजलो सहवास ज्याला तो खरा आभास होता
ओळखिच्या माणसांना ओळखिचा त्रास होता

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता

जन्मभर ओल्याच होत्या पापण्यांच्या ओंजळी अन्
जन्मभर माझ्या तृषेला मृगजळाचा ध्यास होता

पाहिले जेव्हा तुला मी बस् पहातच राहिलो गं
पण किती कोट्यावधीचा अर्थ त्या शून्यास होता


कवी - मयुरेश साने

उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड लढवू

जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेंव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

राष्ट्राचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

कवी - वसंत बापट

निरोप

बाळ, चाललासे रणा
घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा,
मीही महाराष्ट् कन्या
धर्मं जाणते विरांचा.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार.

अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे
अरे मीही सांगते ना
जीजा लक्ष्मीशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरुप
आठवावे रणांगणी.

घन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन.


कवियत्री - पद्मा गोळे

मी एक पक्षिण

मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी

स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन
निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय़ नीडांतुनी अन
विजा खेळती मत्त पंखांतुनी.

गुजे आरुणि जाणुनी त्या ऊषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारीते काय विणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर

कीती उंच जावे कीती सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी

कीती उंच जाईन पोहचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी



कवियत्री - पद्मा गोळे

तक्ता

अननस, आई, इजार आणि ईडलिंबू
उखळ, ऊस आणि एडका
सगळे आपापले चौकोन संभाळून बसलेत

ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा
कप, खटारा, गणपती आणि घर
सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत

चमचा, छत्री, जहाज आणि झबलं
टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण
सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसलेत

तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ
पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका
यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची शक्यता नाही

यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग
षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय
या सगळयांनाच अढळपद मिळालंय

आई बाळाला उखळात घालणार नाही
भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही
टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही

शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही
तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही
आणि एडक्यानं ओणव्याला टक्कर दिली नाही
तर ओणव्याला थडग्यावर कप फोडायची काय गरजाय


कवी - अरुण कोलटकर

गरमा गरम

मक्या : गरम काय आहे ?

वेटर: चाउमीन.

मक्या : आणखी गरम?

वेटर: सूप.

मक्या: आणखी गरम?

वेटर: गरम पानी.

मक्या : आणखी गरम?

वेटर: आगीचा गोला आहे साल्या.

मक्या : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय्ची आहे .