जनी म्हणे पांडुरंगा

जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥

कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥

कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद कां राहिला ॥३॥

कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा
येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥


रचना - संत जनाबाई 

भोजनासी

माझा हा विठोबा येईल गे केव्हां । जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥१॥

जाउनी राउळा तयासी तूं पाहें । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥

भरलिया रागें क्रोध त्याचा साहे । लवकरी बाहे भोजनासी ॥३॥

ज्ञानेश्वराघरीं असेल बैसला । जाउनी विठ्‌ठला पाहें तेथें ॥४॥

जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा । खोळंबला नामा भोजनासी ॥५॥


रचना -संत जनाबाई
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …(३)
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
त्याशी नाही जाणीव शक्तिची
करील काय कल्पना युक्तिची हा जी जी जी …(३)

महाराजानी निरोप घेतला …(२)
न दंडवत घातला भावानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …(३)

खानाच्या भेटीसाठी ...(२)
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …(२)
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …(२)
रोखून नजर गगनी
जी र जी जी …

पण आपला राजा ...(२)
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी ...

खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …(२)
कट्यारीचा वार त्यान केला …(२)
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …(३)

प्रतापगडाचे युद्ध जाहले ...(३)
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …(२)
लावली गुलामिची हो वाट …(२)
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …(३)


चित्रपट : मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
गीत : शाहीर अद्न्यातदास
संगीत : सुहास बावडेकर
गायक : नंदेश विठ्ठल उमप

लाभले अम्हास भाग्य

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


 कवी: सुरेश भट

माझा मराठीचा बोल

नदीच्या किनारी नदीला म्हणावे
तुझे पूर माझ्या नसातून यावे
अभंगात गोडी तुझ्या भाकरीची
तहानेत माझ्या तुला ओळखावे

माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल

माझी मराठी माऊली
तिची विठोबा साऊली
ज्ञाना, नामा, तुका, एका उभे कैवल्य राऊळी

माझा मराठी गुलाल
त्याला अबीराचा वास
माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास

माझ्या मराठी मातीची
खोलवर रुजे नाळ
सळसळती आतून माझ्या रक्तात पिंपळ


कवी - अशोक बागवे
संगीतकार - कौशल श्री. इनामदार

गेलें उकरून घर

गेलें उकरून घर,
नाही भिंतींना ओलावा;
भर ओंजळीं चांदणें,
करूं पाचूंचा गिलावा.

आण लिंबोणी सावल्या,
नाहीं आढ्याला छप्पर;
वळचणीच्या धारांना
लावूं चंद्राची झाल्लर.

पाय ओढत्या वाळूची
आण तेव्हांची टोपली;
कधी खेळेल अंगणीं
तुझी-माझीच सावली?

गेलें उकरून घर
जाऊं धुक्यांत माघारा,
कधीं पुरून ठेवल्या
आणूं सोन्याच्या मोहरा.


कवी - ग्रेस

इथलेच पाणी

इथलेच पाणी,
इथलाच घडा,
मातीमध्ये –
तुट्ला चुडा.

इथलीच कमळण,
इथलीच टिंबे
पाण्यामध्ये –
फुटली बिंबे.

इथलेच उ:शाप,
इथलेच शाप,
माझ्यापशी –
वितळे पाप.

इथलीच उल्का,
आषाढ-बनात,
मावलतीची –
राधा उन्हांत.


कवी – ग्रेस