माझा मराठीचा बोल

नदीच्या किनारी नदीला म्हणावे
तुझे पूर माझ्या नसातून यावे
अभंगात गोडी तुझ्या भाकरीची
तहानेत माझ्या तुला ओळखावे

माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल

माझी मराठी माऊली
तिची विठोबा साऊली
ज्ञाना, नामा, तुका, एका उभे कैवल्य राऊळी

माझा मराठी गुलाल
त्याला अबीराचा वास
माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास

माझ्या मराठी मातीची
खोलवर रुजे नाळ
सळसळती आतून माझ्या रक्तात पिंपळ


कवी - अशोक बागवे
संगीतकार - कौशल श्री. इनामदार

1 टिप्पणी: