माझा मराठीचा बोल

नदीच्या किनारी नदीला म्हणावे
तुझे पूर माझ्या नसातून यावे
अभंगात गोडी तुझ्या भाकरीची
तहानेत माझ्या तुला ओळखावे

माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल

माझी मराठी माऊली
तिची विठोबा साऊली
ज्ञाना, नामा, तुका, एका उभे कैवल्य राऊळी

माझा मराठी गुलाल
त्याला अबीराचा वास
माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास

माझ्या मराठी मातीची
खोलवर रुजे नाळ
सळसळती आतून माझ्या रक्तात पिंपळ


कवी - अशोक बागवे
संगीतकार - कौशल श्री. इनामदार

गेलें उकरून घर

गेलें उकरून घर,
नाही भिंतींना ओलावा;
भर ओंजळीं चांदणें,
करूं पाचूंचा गिलावा.

आण लिंबोणी सावल्या,
नाहीं आढ्याला छप्पर;
वळचणीच्या धारांना
लावूं चंद्राची झाल्लर.

पाय ओढत्या वाळूची
आण तेव्हांची टोपली;
कधी खेळेल अंगणीं
तुझी-माझीच सावली?

गेलें उकरून घर
जाऊं धुक्यांत माघारा,
कधीं पुरून ठेवल्या
आणूं सोन्याच्या मोहरा.


कवी - ग्रेस

इथलेच पाणी

इथलेच पाणी,
इथलाच घडा,
मातीमध्ये –
तुट्ला चुडा.

इथलीच कमळण,
इथलीच टिंबे
पाण्यामध्ये –
फुटली बिंबे.

इथलेच उ:शाप,
इथलेच शाप,
माझ्यापशी –
वितळे पाप.

इथलीच उल्का,
आषाढ-बनात,
मावलतीची –
राधा उन्हांत.


कवी – ग्रेस

मंदिरे सुनी सुनी

मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीपकाजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा

रात्र सूर पेरुनी
अशी ह्ळूहळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे

गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधूनी असे
क्षितिज झाकिले कुणी

एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनीत हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहू दे..


कवी - ग्रेस

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळे

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मना वेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा


कवी/गीतकार- ग्रेस
गायक : सुरेश वाडकर
संगीतकार : श्रीधर फडके
गीतसंग्रह/नाटक : ऋतू हिरवा

निळाई

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी

निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा

निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले


कवी - ग्रेस

मरण

अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा
विनम्र लपवू कुठे ह्र्दयस्पंदनाचा झरा

उन्हात मन शिंपिले पळसपेटला पारवा
कुडीत जळतो जसा मरणचंदणाचा दिवा

कुशीत जड अस्थिला नितळ पालवीची स्पृहा
भयाण मज वाटतो रुधिर अस्त गांधार हा

उदास भयस्वप्न की समिर येथला कोवळा
गळ्यात मग माझिया सहज घातला तू गळा

सुगंध दडवू कुठे गगन वैरिणीचे वरी
तुडुंब भरले तुवा कलश अमृताचे घरी

जळात जरी नागवी सलग इंद्रियांची दिठी
विभक्त जणु कुंतिला शरण कर्ण ये शेवटी


कवी - ग्रेस