हत्ती मुंगीला लग्नासाठी प्रपोज करतो.

मुंगी - मीसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते.

हत्ती - मग, लग्नाला नाही का म्हणतेस?

मुंगी - मी तुला किती वेळेस सांगितले, माझ्या घरच्यांचा इंटरकास्ट लग्नाला विरोध नाही परंतु इंटरसाईझला आहे.

गोलकीपर

खेळाचे एक शिक्षक नव्याने रुजू झाले व ग्राउंडवर गेले. ग्राउंडवर मुले फुटबॉल खेळत होती व एक मुलगा एकटाच उभा होता.

गुरुजी : तू त्यांच्यासोबत खेळत का नाहीस? काही अडचण?

मुलगा : नाही मी येथेच बरा आहे.

गुरुजी : अरे पण का एकटाच उभा आहेस?

मुलगा : (चिडून) कारण मी गोलकीपर आहे.

पाऊस अवखळ...

क्षणात सरसर, धावे धरिवर...
खट्याळ कोमल, वारा भरभर..
नभी पसरली, सुंदर झालर...
मेघांमागे, दडला भास्कर...

पाऊस अवखळ, वेड्या तालावर....
बागडतो हा, चराचरावर...
मनही माझे, पडले बाहेर...
गारा घेउन, तळहातावर...

चोहिकडे हे, पाणीच पाणी...
सुरात बेसुर, ओठी गाणी...
चैत्राच्या ह्या उष्ण दुपारी...
अवनी हरली, त्या जलधारांनी...

सळसळ करती, झाडे झुरली...
नेसुन उन्हाची, साडी पिवळी...
थरथरला तो, मातीवरती...
सुवास ओला, हळुच विखुरती...

इन्द्रधनुच्या पंखावरती...
'मेघांच्या' त्या, सुंदर पंक्ती...
मना-मनाच्या, हर्ष-कळ्यांची...
खुलली गाणी, अन संध्या वरती...

दिसं नकळत जाई

दिसं नकळत जाई
सांज  रेंगाळून राहि.
क्षणं एकहि न ज्याला,
तुझि आठवन नाही.

भेट तुझि ती पहिली
लाख लाख आठवितो,
रूप तुझे ते धुक्याचे
कणा कणा साठवितो.

ही वेळ सखी साजणी मज
वेडावून जाई,
दिसं नकळत जाई
सांज रेंगाळून राहि....

असा भरून ये ऊर
जसा वळीव भरवा
अशी हूरहूर जसा
गंध  रानी पसरवा

रान मनातले माझ्या
मगं भिजुनिया जाई..
दिसं नकलत जाई
सांज रेंगाळून राही

किती तरी दिवसात...

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच.

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाऊन निर्भय
गावाकडच्या नदीत
होऊन मी जलमय.

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी.

बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पा-याचा
बरी तोतया नळाची
शिरी धार मुखी ऋचा

रानात श्रावणात

रानात श्रावणात
बरसून मेघ गेला
देहात नि मनात
लावून आस गेला ...

रानात श्रावणात
दिसतात रंग ओले
किलबिल पाखरांत
तरू तृप्त वाकलेले ...

रानात श्रावणात
दाटी नव्या तृणांची
मधु दाटल्या फुलांत
आरास भ्रमरांची ...

रानात श्रावणात
आवाज निर्झरांचे
खडकाळ डोंगरात
चैतन्य जीवनाचे ...

रानात श्रावणात
फुलली अनेक नाती
कुणी पाहिले न हात
घडवून ज्यांस जाती ...

माझे न राहिलेले

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले 

स्वप्नातल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी
होते न सांग कारे, सर्वस्व वाहिलेले

स्वप्नात वाहिलेले, म्हणुनी कसे असत्य
स्वप्नात सत्य असते, सामील जाहलेले

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात फक्त पख
दिवसास पाय पंगु, अन हात शापिलेले

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात घेवुनी जा
हे नेत्र घेवुनी जा, स्वप्नात नाहलेले

जा नेत्र घेवुनी जा, स्वप्नांध आंधळीचे
आता पहावयाचे, काही न राहीलेले