किती तरी दिवसात...

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच.

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाऊन निर्भय
गावाकडच्या नदीत
होऊन मी जलमय.

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी.

बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पा-याचा
बरी तोतया नळाची
शिरी धार मुखी ऋचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा