काया काया शेतामंधी

काया काया शेतामंधी
घाम जिरव जिरव
तव्हा उगलं उगलं
कायामधून हिरवं !

येता पीकाले बहर
शेताशेतात हिर्वय
कसं पिकलं रे सोनं
हिर्व्यामधून पिवयं !

अशी धरत्रीची माया
अरे, तीले नही सीमा
दुनियाचे सर्वे पोट
तिच्यामधी झाले जमा

शेतामंधी भाऊराया
आला पीकं गोंजारत
हात जोडीसन केला
धरत्रीले दंडवत

शेतामधी भाऊराया
खाले वाकला वाकला
त्यानं आपल्या कपायी
टिया मातीचा लावला

अशी भाग्यवंत माय
भाऊरायाची जमीन
वाडवडीलाचं देवा,
राखी ठेव रे वतन !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

मुक्ताई

माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साचं लेकरू
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरू

"अरे संन्याश्याची पोरं"
कुनी बोलती हिनई
टाकीदेयेलं पोराचं
तोंड कधी पाहू नई

"अरे असं माझं तोंड
कसं दावू मी लोकाले?"
ताटीलायी ग्यानदेव
घरामदी रे दडले

उबगले ग्यानदेव
घडे असंगाशी संग
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभंग

घेती हिरिदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंग
एकाएका अभंगात
उभा केला पांडुरंग

गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसनं
असा भाग्यवंत भाऊ
त्याची मुक्ताई बहीन


कवियित्री  - बहिणाबाई चौधरी

पावसाच्या काय मनात ग.....

उन्हे उलटता, सांजवेळी,,,श्रावण ओल्या घनात ग
दाटून आले आभाळ सारे...पावसाच्या काय मनात ग...


रिमझिम रिमझिम झिरमिरती...इवलेइवले तुषार ग...
हळूच मागून खोडी काढी ...वारा किती हुशार ग...

उघडीप झाली मेघाआडूनी...तळ्यात चमचम बिंब ग...
तिरिप कोवळी पिवळीपिवळी...पानांत टपटप थेंब ग...

श्रावण सा-या चराचरांत...नवचैतन्याचा पूर ग
अलगद जैसे मनात कोणी...छेडत राही सूर ग...


कवयत्री  - अनुराधा म्हापणकर

प्यारे

दगडाला देव मानून
नका तोडू अकलेचे तारे |
माणसातला देव जाणा,
ओसांडतील प्रेम झरे ॥

स्वार्थ अन् हव्यासाने,
माणूसपण विसरले सारे |
आयुष्याचा अटळ अंत
का विसरलास प्यारे ?

माणूसकीचा झरा आटला,
सद्गुणांचा कंठ दाटला |
बेईमानी आणि क्रुरतेत,
मानव नखशिखांत माखला ॥

दुष्कृत्याचे जाळे विणता,
दुर्गुणांचा मंत्र तू जपला |
सद्गुणांची झालर ओढता,
बेईमानीचा कळस गाठला ॥

केसाने गळा कापताना,
इमानीचा बुरखा झाकला |
जैसी करणी वैसी भरणी कळली,
परी तू नाही वाकला ॥


कवी - अनिल शिंदे

अबोल तू ही अबोल मी ही

नात्यांमधले बंध अनामिक
मला उमजले असे अचानक

तटस्थ जरी तू या वळणावर
परतुनी येशील नकळत अवचित,

अभिसारीका तुझ्या मनीची
व्हावे मीच ही आस जीवाची

दूर उभा तू सागर तीरी
तरंग उठता का वळून पाहशी,

तुला ही कळले बंध मनाचे
नाते आपुले युगायुगाचे

अबोल तू ही अबोल मी ही
तरीही घडले लोभस काही,

अशीच असते का रे प्रिती
अमूर्त, निरामय तरी युगांती

तुला उमजले मला ही कळले
शब्दाविण हे बंध अनामिक

अशीच राहो प्रित चिरंतन
भूलोकी या अनंत अविरत...


कवियत्री - अंजली राणे वाडे

माझ्या खिशातला मोर

माझ्याजवळ,
माझ्या खिशात
नेहमी एक मोर असतो
पण माझ्या खिशातला हा मोर
साधासुधा मोर नाही.

कधीमधी उदासलं
किंवा मनावर काळे ढग दाटून आले
की हा शिकवलेला मोर
खिशातून आपोआप बाहेर येतो,
देहभर पिसारा फुलवतो अन नाचतो..
मनसोक्त...मनमुराद.

त्याला नाचताना पाहून
मुसळधार पाऊस पडतो,
उदास काळे ढग निघून जातात
अन माझं मन
पुन्हा शुभ्र होतं...निरभ्र होतं

एक गंमत सांगू?
असाच एक मनकवडा मोर
तुमच्याही खिशात आहे:
फक्त तुम्ही,
त्याला नाचणं शिकवायला हवं !


कवी - प्रशांत असनारे

छोटीसी आशा

झाली तयारी पुर्ण?
तुझा चाकू कुठाय?
हा असा बोथट का?
नीट धार करुन घे-
टेकताच रक्त आलं पाहीजे!

तुझं पिस्तूल व्यवस्थित आहे ना?
साफ केलं?
ठीक आहे,
मग आता लोड करुन ठेव.

तुझा हा वस्तरा असा का?
जुना वाटतोय;
नवीन घे.
उगाच रिस्क नको!
आणि...

...आणि हे काय?
एवढी जय्यत तयारी सुरु असताना
हा कोण मूर्ख
माउथऑर्गन वाजवतोय?

असू दे! असू दे!!
तोही खिशात असू दे.
कुणी सांगावं-
कदाचित तोच उपयोगी पडेल!


कवी - प्रशांत असनारे