तुळस वेल्हाळ

कसे केंव्हा कलंडते
माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा
दूर पोचतो ओघळ

उरे तुडुंब तयांत
काळोखाचे मृगजळ
रितेपणाच्या डोहाची
आत ओढी उचंबळ

मंत्रविद्ध मध्यरात्र
उभी झुकून काठाशी
जन्मोजन्मीच्या दु:खाचा
राळ धरूनी उशाशी

ओढ घेऊन पाण्याची
सूर मारते सरल
एक गाठायचा तळ
आणि तळींचा अनळ

पेट घेई मध्यरात्र
पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये
उभी तुळस वेल्हाळ


कवी - इंदिरा संत

शब्दारण्य

शब्दारण्याची सैर करण्या
निघालो मी प्रवासी |
उलगडून पाहिले अर्थ
तरी उरले प्रश्न मनाशी ॥

गर्द सावल्यातला अर्थ
शोधण्याचा केला मी यत्न |
काळोख्या कोप-यांना
उजळण्याचा केला मी प्रयत्न ॥

शब्दांच्या अगणिक पारंब्यांनी
वेढले अंतर्मन |
शब्द नगरीच्या स्वैरविहारात
बरसले शब्द घन ॥

शब्दांचे कवडसे कवेत घेण्याचा
केला मी प्रयास |                                                
गर्द सावल्या अंतर्मुख होत
क्षणात पावल्या र्‍हास ॥

कोवळे उन्ह डोळ्यात साठवताना
डोळे दिपले नाही |
सुख-दुःखाचे गर्द आसवे
नयनातून ओसंडत वाही ॥

अलगद काढूनी शब्द कुंचला
ओसांडले शब्दांचे द्रव्य |
आभाळाच्या कॅनव्हासवर
चित्तारले हळवं काव्य ॥


कवी - अनिल शिंदे

तिच्यासाठी

काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी?
द्याल तिच्या तान्ह्या श्वासांना
जखमी न होता मोकळं जगण्याचं एक साधं आश्वासन?
तिचा वाढता बहर वेचण्यासाठी
उतावीळ तुमच्या अभिलाषा,
ठेवाल मुळाशी निरोगी माती घालण्याची मायेची आठवण?
स्वप्नचुटुक वाटेवर चालणारी
तिची तरुण नाचरी पावलं आणू शकाल माघारी,
तुम्ही पेरुन ठेवलेल्या स्फोटक आणि भयकारी वास्तवापासून?
अडवू शकाल तिच्या निरागस इच्छांवर
तुमच्या विषारी स्पर्धांच्या अग्निलोलकांतून कोसळणारं
संवेदनांची ओल गाभ्यापासून नष्ट करणारं उग्र आणि निर्मम ऊन?
रोजच्या रोज घरात बळी जाणारं
सोशिक विवाहितेचं कौमार्य कराल परत
तिच्या अनीह रतिकर्माची दु:सह आठवण पुसून?
उमलण्याच्या आणि दरवळ्ण्याच्या सगळ्या शक्यता सांभाळून
जडवाल तिला तिच्या इच्छांच्या सगळ्या कळ्या, पुन्हा फुलवून
ज्या गळून पडल्या तिच्या देहावरुन?
कसं काही करु शकाल तुम्ही तिच्यासाठी,
हजारो वर्षांच्या संकेताच्या झगमगीनं तुमचे डोळे दिपल्यानंतर?
आणि अंधारात पूर्ण जागी असलेली ती तर जाणूनच आहे
तुमचं मस्तक आणि हृदय यातलं अहंभावाचं अटळ अंतर...


कवियत्री - अरुणा ढेरे

माथ्यावरती उन्हें चढावी

माथ्यावरती उन्हें चढावी
पावलात सावल्या विराव्या
घाटावरती शुभ्र धुण्यांच्या
पाकोळ्या अन् मंद झुलाव्या.


डोंगर व्हावे पेंगुळलेले
पोफळ बागा सुस्त निजाव्या
अंगणातल्या हौदावरती
तहानलेल्या मैना याव्या.


लुकलुकणारे गोल कवडसे
लिंबाच्या छायेत बसावे
खारीचे बावरे जोडपे
बकुळीखाली क्षणिक दिसावे.


कुरणाच्या हिरवळीत ओल्या
ऊनही हिरवे होउन जावे
कुठे कधीचे नांगरलेले
शेत पावसासाठी झुरावे.


कवी - सदानंद रेगे

एक श्वास कमी होतो

नाही विजेचे वादळ, नाही पावसाचा मारा
वारासुद्धा फार नाही, साध्या झुळकीने येतो

दारी सायलीला नुक्ती जरा फुलू येते कळी
कसा कोण जाणे तिचा देठ सुटू सुटू होतो

हाती येणार वाटतो, जातो निसटून क्षण
आणि भिजतात डोळे, उगा हुंदकाच येतो

शोक करावा सा~यानी असा नसतो प्रसंग
फक्त आतल्या सुखाचा एक श्वास कमी होतो.


कवयित्री - अरूणा ढेरे

काया काया शेतामंधी

काया काया शेतामंधी
घाम जिरव जिरव
तव्हा उगलं उगलं
कायामधून हिरवं !

येता पीकाले बहर
शेताशेतात हिर्वय
कसं पिकलं रे सोनं
हिर्व्यामधून पिवयं !

अशी धरत्रीची माया
अरे, तीले नही सीमा
दुनियाचे सर्वे पोट
तिच्यामधी झाले जमा

शेतामंधी भाऊराया
आला पीकं गोंजारत
हात जोडीसन केला
धरत्रीले दंडवत

शेतामधी भाऊराया
खाले वाकला वाकला
त्यानं आपल्या कपायी
टिया मातीचा लावला

अशी भाग्यवंत माय
भाऊरायाची जमीन
वाडवडीलाचं देवा,
राखी ठेव रे वतन !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

मुक्ताई

माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साचं लेकरू
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरू

"अरे संन्याश्याची पोरं"
कुनी बोलती हिनई
टाकीदेयेलं पोराचं
तोंड कधी पाहू नई

"अरे असं माझं तोंड
कसं दावू मी लोकाले?"
ताटीलायी ग्यानदेव
घरामदी रे दडले

उबगले ग्यानदेव
घडे असंगाशी संग
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभंग

घेती हिरिदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंग
एकाएका अभंगात
उभा केला पांडुरंग

गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसनं
असा भाग्यवंत भाऊ
त्याची मुक्ताई बहीन


कवियित्री  - बहिणाबाई चौधरी