अनघा ताडकन उभी राहिली. समोर नेमकं काय घडतं आहे हे तिला क्षणभर समजलं नाही पण नंतर मागचा पुढचा कोणताही विचार न करता ती सुसाट धावत घराबाहेर पडली आणि तिने परांजपेमामींची बेल ठणाठणा वाजवली. मामी दार उघडेपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता. मामींनी दार उघडलं तशी ती धडपडतच आत शिरली आणि त्यांच्या सोफ्यात जाऊन पडली.
"अगं काय झालं? अहो बाहेर या, ही अनघा बघा कशी करत्ये." परांजपेमामी काळजीने मामांना बोलवत होत्या. "अगं काय झालं अनघा?” त्यांनी अनघाच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं. मामींच्या प्रेमळ आवाजाने अनघाला धीर आला. आपण स्वप्न पाहिलं असावं... किती हा बावळटपणा!
“क..क..काही नाही मामी. बहुतेक स्वप्न पडलं. चांगलं स्वप्न नव्हतं.” अनघाने सांगितलं.
“अगं तुला चौथा महिना आहे. आतापासून जास्तच सांभाळायला हवं. अशी वेड्यासारखी धावू नकोस. कुठे धडपडली असतीस तर? आणि हे बघ गरोदरपणात अशी वेडीवाकडी स्वप्नं पडतात कधीतरी. आपण वेगळ्या अनुभवातून जात असतो ना म्हणून. त्यात घाबरण्यासारखं काही नसतं.”
एव्हाना मामाही बाहेर आले होते. अनघाची विचारपूस करत होते. अनघाला खरंच बरं वाटत होतं.
“चहा टाक गं. अनघालाही चहा प्यायला की तरतरी येईल. काय गं, काय पाहिलंस स्वप्नात? कोणता आग्यावेताळ आला होता? हाहाहाहा!” मामा स्वत:च्याच विनोदावर गडगडाटी हसत म्हणाले.
“अं! आठवत नाही. विसरले... काहीतरी भयंकर होतं खरं...” अनघाने वेळ मारून नेली आणि ती हळूच मामींच्या स्वयंपाकघरात घुसली.
मामींच्या स्वयंपाकघराच्या खिडकीत छान कुंड्या एका ओळीत लावल्या होत्या. त्यात कसलीतरी झाडं मामींनी मोठ्या हौशीने लावली होती.
“मामी, कधीपासून विचारायचं होतं..ही कसली रोपटी, वेली लावल्यात हो?”
“अगं, तुळस, ओवा, मंजिष्ठा, गुग्गुळ अशी आयुर्वेदीक रोपटी आहेत. घरात असावीत. आपल्या आयुर्वेदात किती उपयुक्त वनस्पती आहेत. मी तुला तो रस काढून देते ना रोज, त्यात या झाडांची पानंही टाकते थोडीशी.”
त्या रसाच्या आठवणीने अनघाला मळमळून आलं पण मामी इतक्या प्रेमाने काळजी घेत होत्या की त्यांना नाराज करणे तिला पटले नाही. मामी जी नावं सांगत होत्या त्या वनस्पती कशा दिसतात हे ही अनघाला माहित नव्हते की त्यांचा उपयोगही माहित नव्हता पण मामी जे करतील ते चांगल्यासाठीच याची तिला खात्री वाटत होती.
चहा पिता पिता मामी अनघाची समजूत घालत होत्या. “तू एकटी असतेस घरात. सांभाळून राहत जा. अशी धावपळ करू नकोस. आम्ही आहोतच बाजूला. घाबरण्यासारखं काही नाही. तुझी जबाबदारी आहे आमच्यावर. काही गडबड झाली तर आम्हाला उत्तर द्यावं लागेल हे समजून घे.” मामींच्या आवाजाला धार चढल्यासारखी वाटत होती.
अनघाने मामींकडे आश्चर्याने पाहिलं. “शब्द दिलाय आईला तुझ्या. माझ्या पोटच्या मुलीसारखी काळजी घेईन अनघाची असा.” बोलता बोलता मामींचा आवाज अचानक हळवा झाला होता. परांजपे मामा-मामींना स्वतःचे अपत्य नव्हते.
दुसर्या दिवशी सोनोग्राफीसाठी गेलेली अनघा हिरमुसून घरी परतली. बाळाचं पहिलं दर्शन घ्यायला ती अगदी मनापासून उत्सुक होती. अनघा आणि मामी सोनोग्राफी करण्यासाठी पोहोचल्या तोच तिथे अचानक लाईटच गेली. काय प्रकार होता कोण जाणे पण डॉ. क्षोत्रींच्या क्लिनिकमध्ये साधा जनरेटरही नव्हता. चांगलं तासभर तिथे ताटकळून दोघी परतल्या. डॉक्टरांनी पुढल्या आठवड्यात पुन्हा बोलावलं होतं पण तिच्या आजच्या उत्साहावर पाणी फिरलं होतं. मामी तिला समजावत होत्या. त्यांच्या मते अनघाची गायनॅक डॉ. क्षोत्री घरापासून फारच लांब होती आणि तरुणही. तिला म्हणावं तेवढा अनुभव दिसत नव्हता. परत येताना मामी अनघाला गळ घालत होत्या की तिने डॉ. मखिजांच्या नर्सिंग होममध्ये जावं. ते या भागात अतिशय प्रसिद्ध होते. डॉ. क्षोत्रींचं नाव अनघाच्या अंधेरीला राहणार्या मामे बहिणीने, श्रद्धाने, सुचवलं होतं म्हणून अनघा तेथे जात होती पण दादर ते अंधेरी प्रवास जरा जास्तच होता हे अनघालाही दोन-चार भेटींत कळलं होतं.
घरी येऊन अनघाने पंखा लावला आणि ती सोफ्यावर टेकली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. उन्हं उतरली होती पण दिवेलागणीची वेळ नव्हती झाली. तिला घरात उगीचच उदास वाटलं. घर..घर...घर डोक्यावरचा पंखा फिरत होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्याचा वारा सुखद नव्हताच. अनघाने नजर फिरवली. या घराला रंग द्यायला हवा. उगीच भकास वाटतंय. भाड्याच्या घरात आपण आपले निर्णय घेऊ नाही शकत; विक्रम आला की सांगायला हवं. तिने क्षणभर डोळे मिटले.
गार वार्याची झुळुक अंगावर शिरशिरी उठवून गेली. हॉलच्या मोठ्या खिडक्या समुद्राकडे उघडत. त्या उघड्या असल्या की त्यातून गार वारा येत असे. अनघा खिडक्या बंद करूनच बाहेर गेली होती पण मग खिडकी उघडली कशी आणि कोणी? अनघाने खिडकीकडे नजर फिरवली. खिडकीशी बाहेर समुद्राकडे तोंड करून कोणीतरी उभं होतं. मगासपेक्षा थोडं जास्तच अंधारलं होतं, अनघाला समोरचं स्पष्ट दिसत नव्हतं. कुणीतरी तरुण बाई होती. तिने सुरेख पांढरा नाईटगाऊन घातला होता. तिच्या घोट्यांपर्यंत तो पोहोचत होता.
“को..ण?” अनघाने धीर करून विचारलं, “कोण आहे तिथे?”
ती मागे वळली. तिशी-बत्तीशीची असावी. तिचे काळेभोर केस अस्ताव्यस्त खांद्यापर्यंत रुळत होते. त्या केसांतून होणारं तिचं दर्शन ती सुस्वरूप आणि देखणी असल्याचं दर्शवत होतं, मात्र तिच्या चेहर्यावर विलक्षण दु:ख दिसत होतं. एक गोष्ट अनघाच्या अगदी नजरेत भरली. तिचं पोट... सहा सात महिन्यांची गरोदर असावी. अनघाने तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या नजरेत दु:खासोबत अविश्वासही दिसत होता. अनघा चकित होऊन बघत होती आणि आसभास नसताना अघटीत घडलं. ती बाई गर्रकन वळली आणि क्षणार्धात तिने स्वत:ला खिडकीतून खाली झोकून दिलं.
"थां....ब!अगं, आई गं!!" अनघाने तोंडावर हात दाबला आणि डोळे उघडले. तिचं सर्वांग घामाने थबथबलं होतं. स्वप्न! पुन्हा एक स्वप्न? ते ही इतकं भयानक; तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं. सोफ्याच्या बाजूला फोन होता. तिने कसाबसा मामींचा नंबर फिरवला. मामा आणि मामी दोघेही ताबडतोब धावत आले.
“अगं अनघा, काय झालं?” मामींच्या आवाजात काळजी होती. त्यांनी अनघाचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवून त्या लगबगीने पाणी आणायला गेल्या. सोफ्याजवळच्या खुर्चीत परांजपेमामा टेकले.
“अगं बाई बरी आहेस ना? काय झालं तुला?” त्यांचा सूरही काळजीचा होता. अनघाने मान डोलावली. मामींनी आणलेला पाण्याचा ग्लास तिने घटाघटा पिऊन संपवला.
“आता सांग काय झालं?”
“काही नाही! काहीतरी विचित्र पाहिलं मी. स्वप्न होतं पण स्वप्नासारखं नाही वाटलं.” अनघाने सर्व प्रसंग मामा-मामींना सांगितला. मामींचा चेहरा उतरल्यासारखा वाटत होता. त्यांची नजर मामांवर खिळून होती. मामा मटकन अनघाशेजारी सोफ्यावर बसले. “अघटीत आहे खरं.”
“तुम्हाला काहीतरी माहित्ये. तुम्ही मला सांगायलाच हवं.” मामामामींचे चेहरे पाहून अनघाने ताडलं होतं की त्यांना काहीतरी माहित आहे.
“अगं... आता काय सांगू तुला? दिलआंटी राहतात ना त्या फ्लॅटमध्ये पूर्वी सोनिया राजपूत म्हणून एक टीव्ही मालिकांची लेखिका राहत होती. तिच्या दोन तीन सिरिअल्स फार प्रसिद्ध झाल्या होत्या. एक तर आजही लागते. तिने तरुण वयात प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवलं होतं पण बाई थोडीशी चंट होती. तिच्याकडे कोण येई, कोण जाई, कसल्या कसल्या पार्ट्या होत कोणास ठाऊक. रात्री बेरात्री वाट्टेल तेव्हा वर्दळ असे. आमचे तिचे फार घरोब्याचे संबंध नव्हते पण मजल्यावर राहतो त्यामुळे बर्यापैकी ओळख होती.
मग एके दिवशी आम्हाला शंका आली की ती प्रेग्नंट असावी. आमची शंका खात्रीत बदलल्यावर आम्ही तिला सहज विचारलंही होतं की हे काय आहे? तिने उडवाउडवीची उत्तरं दिली पण मग हळूहळू पोट दिसायला लागलं आणि ती थोडीशी चिंताग्रस्त दिसत असे. आमच्याशी बोलणंही तिने बंद करून टाकलं आणि मग एके दिवशी कसलाही आसभास नसताना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तिने तिच्या खिडकीतून खाली उडी मारून जीव दिला. दोन वर्षं झाली असतील या घटनेला.” परांजपे मामींचा आवाज हे सर्व सांगताना पडला होता. त्या वारंवार मामांकडे पाहत होत्या.
“पोलिस केस झाली. कसलीही झटापट वगैरे झाल्याची चिन्हे नव्हती. उलट एक चिठ्ठी मिळाली. त्यात तिने आपली चूक झाली... यातून सुटकेचा एकच मार्ग दिसतो असं लिहिलं होतं. पोलिसांनी केस बंद केली. तिच्या त्या मुलाचा बाप कधी पुढेच आला नाही. पुढे मग दिलआंटी त्यांचे मिस्टर गेल्यावर मलबार हिलचा फ्लॅट विकून इथे राहायला आल्या पण त्यांना कधीच असा विपरित अनुभव आला नाही. तुलाच का असं काहीतरी दिसावं... कोडंच आहे.” मामींची नजर पुन्हा मामांवर स्थिरावली होती.
मामांनी घसा खाकरला आणि ते अनघाच्या जवळ आले. “अनघा, एक सांग. या इमारतीतल्या कुणी तुला सोनियाचा किस्सा सांगितला होता का? तुला स्वप्न पडलं आणि ती दिसली हे खरं वाटत नाही.”
“नाही हो मामा! मला कुणीच नाही काही म्हणालं. मी खरंच सांगते, मला दिसली ती..” अनघाचा आवाज नकळत ओलसर झाला होता. तिने नाराजीने मामांकडे पाहिलं. एक गोष्ट चटकन तिच्या डोळ्यांत भरली. तिने या आधी कधी मामांकडे निरखून पाहिलंच नव्हतं. मामांच्या कानाची उजवी पाळी किंचित कापलेली होती.
“अगं हो हो, तुम्ही गप्प बसा हो. उगीच त्या पोरीला आणखी त्रास नको. घाबरू नकोस अनघा. असं कर तू आमच्या बरोबर चल. विक्रम आला की त्यालाही तिथेच बोलवू. मी आज छोले-पुरीचा बेत केला होता. सोबतीला श्रीखंडही आहे. तुम्ही आमच्याकडेच जेवा. आपण दिलआंटींनाही बोलावू.” मामी विषय बदलत म्हणाल्या.
रात्री जेवताना विक्रमच्या आणि परांजपेमामांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. मामा विक्रमला स्वत:च्या व्यवसायातल्या खाचाखोचा समजावून देत होते. दुसर्या खोलीत अनघा, दिलआंटी आणि परांजपेमामींच्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता मामींनी अनघाला पुन्हा डॉक्टर बदलायची गळ घातली.
“हे बघ. डॉक्टर मखिजा अगदी प्रसिद्ध आहेत इथे आणि अनुभवी आहेत. अंधेरी कुठल्या कुठे. तिथे जाणं त्रासाचं आहे.”
“मामी पण अहो मला फिमेल डॉक्टर हवी. अशा गोष्टींसाठी बाई असेल तर बरं वाटतं.”
“अरे डिकरी, डॉक्टरसमोर शरम कस्ली? ते पैले वारची प्रेग्नंसी हाय ना तर चांगल्या डॉक्टरकडेच दाखव.” दिलआंटींनी सल्ला दिला.
“हे बघ आपण उद्या सकाळीच जाऊ. मी येते ना सोबतीला.”
“पण मी डॉ. क्षोत्रींना सांगितलं आहे की बाळंतपणासाठी तिथेच येईन आणि श्रद्धा काय म्हणेल. तिने मला खास सुचवलं होतं या डॉक्टरचं नाव.” अनघा म्हणाली.
“त्यात काय झालं? ही मुंबई आहे. इथे सर्व काही व्यवहार आहे. तू अद्याप काही अॅडवान्स दिलेला नाहीस ना तिथे. मग झालं तर? आपण उद्या सकाळीच डॉक्टर मखिजांकडे जाऊ. आमची ओळख आहे त्यांच्याशी. ते तुला अगदी व्यवस्थित सल्ला देतील.”
अनघाला नाही म्हणता येईना; तिला मामींचा गळेपडूपणा आवडला नाही. त्या रात्री तिने विक्रमला ते स्वप्न सांगितलं आणि मामींनी दिलेला डॉक्टर बदलायचा सल्लाही सांगितला. विक्रमने तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. मामी सांगतील तेच करूया, त्यांना जास्त कळतं असं त्याचं मत होतं. स्वप्नाचं ऐकून मात्र त्याचा चेहरा काळजीत पडल्यासारखा झाला.
“उद्या तू डॉक्टरांकडे जाशील ना तर त्यांना तुझा मूड चांगला राहिल किंवा मन शांत राहिल अशी औषधं द्यायला सांग. प्रेग्नन्सीमध्ये बायकांना मानसिक व्याधी जडल्याची उदाहरणं आपण ऐकली आहेत. तुला काळजी घ्यायला हवी.”
“मला काहीही झालेलं नाहीये आणि तुला इतकी काळजी आहे तर तू चल ना माझ्याबरोबर डॉक्टरकडे. मी आतापर्यंत एकटीच गेली आहे. तू चल की एखाद दिवस. मी आई होणार आहे तर तूही बाप होणार आहेस ना!”
“शांत हो! तुझा त्रागा सांगतोय की तुझं चित्त ठिकाणावर नाही. मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो आहे ना. काळजी घ्यायला हवी.” अनघाला जवळ घेत विक्रम म्हणाला पण अनघाला त्याचा स्पर्श थंडगार वाटला. त्यात नेहमीची जवळीक नव्हती.
"विक्रम, अरे तो ताईत का नाही तुझ्या गळ्यात?" विक्रमच्या गळ्यात ताईत न दिसल्याने कुतूहलाने अनघाने विचारलं.
"अगं त्या ताईताने त्याचं काम केलं आहे. आता त्याची गरज नाही. जे साध्य करायचं होतं ते साध्य केलं ना मी. आता फक्त परतफेड करायची आहे. तू झोप. कशाला नसती काळजी करतेस. नाहीतरी तुझा विश्वास नाहीच ना अशा गोष्टींवर. झोप हं आणि कसलीतरी भलती स्वप्नं बघू नकोस प्लीज." विक्रमने तिच्या अंगावरची चादर सारखी केली आणि अनघानेही पुढे काही न बोलता डोळे मिटले.